कुटुंब आणि निकटवर्तीयांमुळे आजी माजी मंत्र्यांची प्रतिष्ठापणाला

जळगाव जिल्ह्यातील ६७ जिल्हा परिषद गट व १३४ पंचायत समिती गणामध्ये राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. गेल्या २ वर्षापासून वायुवेगात दौडणार्‍या भाजपाच्या विजय रथाला रोखण्यासाठी यंदा प्रथमच कॉंग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी केली आहे. मात्र सत्तेची फळे चाखणारे भाजपा व शिवसेना स्वबळावर निवडणूकीला सामोरे जात आहे. यंदा सर्वच पक्षांच्या नेत्यांनी निष्ठावान कार्यकत्यांना डावलून कुटुंबिय व निकटवर्तीयांना तिकिट दिल्याने सुरुवातीलाच नाराजीचे फटाके उडणारी ही मिनी मंत्रालयाची निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. या निवडणूकीत जिल्ह्यातील दोन आजी व दोन माजी मंत्र्यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे.

जलसंपदामंत्री गिरीष महाजन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपआपल्या पक्षातील उमेदवारांना निवडणून आणण्यासाठी कंबर कसली आहे. राज्यात व केंद्रात भाजप-सेनेची सत्ता असल्याने दोन्ही मंत्र्यांवर जास्तीत जास्त उमेदवार निवडणून आणण्याचा दबाव आहे. गेली अनेक वर्ष सर्व निवडणूका एकहाती सांभाळणारे माजी महसूल मंत्री आ.एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील चार व बोदवड तालुक्यातील दोन गटांवर लक्ष केंद्रीत केले आहे. माजी पालमंत्री आ.सतीष पाटील यांना राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त उमेदवारांसह चिरंजिव रोहन यांनाही निवडणून आणण्याचे आव्हान आहे.

यंदाच्या निवडणुकित तिकीट वाटप करतांना भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादीने कुटूंबियांवर मेहरनजर ठेवली आहे. निवडणूकीत कुटूंबियाना तिकीट न देता निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी द्यावी असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले असतांना भाजपाने नेत्यंाच्या निकटवर्तीयांनाच तिकीट दिले आहे. यात प्रामुख्याने धरणगाव तालुक्यातील सोनवद पिप्री गटातून भाजपा नेते पी.सी.पाटील यांच्या पत्नी वैशाली पाटील, भुसावळ तालुक्यातील कुर्‍हा वराडसिम गटातून आ.संजय सावकारे यांच्या वहिणी पल्लवी प्रमोद सावकारे, जामनेर तालुक्यातून माजी जि.प.अध्यक्ष दिलीप खोडपे यांच्या पत्नी विद्या दिलीप खोडपे, जामनेर तालुक्यातील वाकोद पहुर गटातून माजी जि.प.सदस्य राजधर पांढरे यांचे जावई अमित देशमुख, धरणगाव तालुक्यातील साळवा बांभोरी गटातून भाजपा नेते व भुसावळचे नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे यंाच्या पत्नी माधुरी अत्तरदे यांना संधी देण्यात आली आहे.

शिवसेनेमध्ये सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांना पाळधी-बांभोरी गटातून उमेदवारी देण्यात आली आहे. आ.चंद्रकांत सोनवणे यांच्या लहान भावाच्या पत्नी रुपाली किरण सोनवणे यांना आसोदा-ममुराबाद गटातून तिकीट देण्यात आले आहे. माजी आ.चिमणराव पाटील यांनी पारोळा तालुक्यातील देवगाव-तामसवाडी गटातून पुतणे समीर पाटील यांना रिंगणात उतरविले आहे. शिरसोली - चिंचोली गटातून शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादीमध्ये जिल्हाध्यक्ष आ.सतिष पाटील यांचे चिरंजीव रोहन पाटील यांना पारोळा तालुक्यातील देवगाव - तामसवाडीमधून रिंगणात उतरविण्यात आले आहे. माजी आ.दिलीप वाघ यांच्या लहान बंधूची पत्नी ज्योती संजय वाघ यांना पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा - लोहटार गटातून संधी देण्यात आली आहे. माजी खा.वसंतराव मोरे यांचे चिरंजीव पराग मोरे यांना अमळनेर तालुक्यातील मंगरूळ - शिरसमणे गटातून रिंगणात उतरविण्यात आले आहे. माजी आ.राजीव देशमुख यांचे बंधू अतुल देशमुख यांना चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव-देवळी गटातून उमेदवारी देण्यात आली आहे. माजी जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांच्या स्नुषा अंकिता पाटील यांना बोदवड तालुक्यातील साळशिंगी-शेलवड गटातून संधी देण्यात आली आहे. माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार असले तरी या राजकिय कुटुंबातील उमेदवारी निश्‍चित असल्याने स्वत:ची प्रतिष्ठा जपण्यासाठी तिन्ही पक्षातील नेत्यांची कसोटी लागणार आहे.

Post a Comment

Designed By Blogger