आता मिनी मंत्रालय मानल्या जाणार्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होवू घातल्या आहेत. यासाठी अनेकांनी जोरदार फिल्डींग लावली आहे. मात्र राज्य पातळीवरील युती-आघाडीच्या निर्णयाचे पडसाद जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही पडण्याची शक्यता आहे. कारण या निवडणूका स्वबळावर लढवणार का युती-आघाडीत! हा प्रश्न अनेक कार्यकर्ते स्थानिक पदाधिकार्यांना विचारु लागले आहेत. आधीच महिला राखीव व आरक्षणाच्या चाळणीतून निघाल्यानंतर अनेक आजी-माजी पदाधिकार्यांसह सदस्यांची अडचण झाली आहे. त्यातच युती किंवा आघाडीचे वारे वाहु लागल्याने अनेकांच्या स्वप्न व आकाक्षांना सुरुंग लागल्यासारखे वाटू लागले आहे. यामुळे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसची गोची झाली आहे.
विरोधी पक्षापेक्षा स्वकियांमुळेच डोकंदुखी
जळगाव जिल्हा परिषदेत गेल्या तिन पंचवार्षिक पासून भाजप-सेनेची निर्विवाद सत्ता आहे. (प्रत्येकवेळी स्वबळावर निवडणूक लढवल्यानंतर सत्तेसाठी भाजप-सेना एकत्र आली आहे.) आता भाजपा २४, शिवसेना १४, राष्ट्रवादी २० व कॉंग्रेसचे १० असे पक्षिय बलाबल आहे. यंदाची मिनी मंत्रालयाची निवडणूक वेगवेगळ्या करणांमुळे चर्चेत आहे. यात प्रामुख्याने उल्लेख करावयाचा म्हटल्यास भाजपाचे ज्येष्ठ नेते आ.एकनाथराव खडसे यांचे गेलेले मंत्री पद व दुसरीकडे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांची वाढती राजकिय महत्वकांक्षा! चालु पंचवार्षिकमध्ये जिल्हा परिषदेचा लालदिवा जामनेर तालुक्यात आहे. पहिल्या अडीच वर्षात ना.महाजन यांचे कट्टर समर्थक दिलीप खोडपे व आता ना.प्रयागताई कोळी यांना अध्यक्षपदी बसण्याची संधी मिळाली. हा लाल दिवा जामनेर तालुक्यातच कायम ठेवण्यासाठी ना.महाजन यांनी आधीपासूनच डाव खेळायला सुरुवात केली आहे. त्या तुलनेत आ.खडसे गटात शांतता दिसून येत आहे. कारण मुक्ताईनगर तालुक्यातील चारही गट राखीव झाले आहेत. यामुळे तेथील अभ्यासू जि.प.सदस्य तथा माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर यांचा कुर्हा वढोदा गट अनुसूचित जाती (महिला)साठी राखीव झाल्याने ते देखील रिंगणाच्या बाहेर फेकले गेले आहेत. माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांचा पळासखेडे-नेरी दिगर हा गट सर्वसाधारण (स्त्री)साठी राखीव झाल्याने त्यांनीही इतरत्र चाचपणी सुरु केली आहे.
शिवसेनेची व्यथा वेगळीच आहे. सेनेचे ज्येष्ठ सदस्य प्रकाश सोमवंशी हे गेल्या वेळी नगरदेवळा - बाळद गट महिला राखीव झाल्यामुळे ते लोहटार - खडकदेवळा गटातून उभे राहिले व निवडणूनही आले. याच वेळी नगरदेवळा-बाळद गटातून माजी आमदार आर.ओ.पाटील यांचे निकयवर्तीय रावसाहेब पाटील यांच्या पत्नी मिनाताई पाटील निवडणून आल्या व त्यांची कृषी सभापतीपदी वर्णीही लागली. आता नगरदेवळा-बाळद गट ओबीसी खुला झाल्याने या गटावर प्रकाश सोमवंशी यांनी दावा केला आहे. मात्र विद्यमान सभापती हा गट सोडण्यास तयार नाही. यामुळे प्रकाश सोमवंशी व रावसाहेब पाटील यांच्याची शितयुध्द आता पेटण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे विद्यमान उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले यांचा तळई-उत्राण गट अनुसूचित जमाती(स्त्री)साठी राखीव झाल्याने त्यांनी शेजारी कासोदा-आडगाव गटामध्ये संपर्क वाढविला आहे. मात्र येथे माजी उपाध्यक्ष मच्छींद्र पाटील यांची भाजपाकडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे. यागटासाठी श्री.आमले यांना नानाभाऊ महाजन, वासूभाऊ पाटील यांनाही सांभाळावे लागणार आहे. कॉंग्रेसचे गटनेते प्रभाकर सोनवणे यांचा भालोद - पाडळसा हा गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने त्यांचीही सुरक्षित मतदार संघासाठी शोधमोहिम सुरु झाली आहे. ते यावल तालुक्यातील न्हावी - बामणोद गटामधून रिंगणात उतरू शकतात. या व्यतिरिक्त जि.प.चे शिक्षण व आरोग्य समिती सभापती सुरेश धनके यांचा पाल-केर्हाळा गट व समाजकल्याण सभापती दर्शना घोडेस्वार यांचा सायगाव-उंबरखेड हे गट नागरीकांचा मागासप्रवर्ग(स्त्री)साठी राखीव झाल्याने त्यांची ही अडचण झाली आहे. निवडणुकित सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या भुमिकेकडेही जिल्ह्याचे लक्ष आहे. आधीच धरणगाव तालुक्यात राष्ट्रवादीचे झालेले पाणीपत व माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या भाजपप्रेमामुळे तेथील राष्ट्रीवादीचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. मात्र दुसरीकडे भाजपाचे नेते पी.सी.पाटील यांनीही सावध भुमिका घेतली आहे. अन्य गटांमध्येही सारखीच परिस्थिती आहे. चारही पक्षातील अनेक दिग्गज सदस्यांचे गट राखीव झाल्याने त्यांनी नजिकच्या गटात चाचपणी सुरु केली असल्याने तेथील इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. यामुळे आतापासूनच जिल्हाध्यक्षासह पक्षश्रेष्ठीकडे लॉंबिग करणे सुरु झाले आहे. गत पंचवार्षिकप्रमाणे सर्व पक्ष स्वबळावर लढल्यास इच्छुकांना संधी असतील मात्र निवडणूकीआधीच युती किंवा आघाडीची घोषणा झाल्यास सर्वच पक्षामध्ये उमेदवारीसाठी स्वकियांचाच वाद उफाळण्याची शक्यता आहे.
Post a Comment