रासायनिक खतांचा वापर करणारा राज्यातील प्रथम तर देशातील दुसर्‍या क्रमांकावरील जळगाव जिल्हा

जळगावच्या केळी व कापसाचा डंका केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही वाजतो. तापी व गिरणा या दोन प्रमुख नद्यांच्या काठावरील जमीन सुपिक असली तरी गेल्या काही वर्षात रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे या कसदार जमीनीला विविध किडरोगांचा ‘व्हायरस’ लागला आहे. कृषी विभागाच्या माहिनीनुसार व केंद्र शासनाच्या फर्टिलायझर मॉनिटरिंग सिस्टिमच्या आकडेवारीनुसार जळगाव जिल्हा हा रासायनिक खतांचा वापर करणारा राज्यातील प्रथम तर देशातील दुसर्‍या क्रमांकावरील जिल्हा आहे. दर वर्षी खरिप व रब्बी हंगामात सरासरी ५ लाख ३० हजार मेट्रीक टन खतांचा वापर जळगाव जिल्ह्यात होतो.

गेल्या तिन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी कधी चक्रीवादळ व दुष्काळा सारख्या नैसर्गिक आपत्तींसह बनावट बियाणे-खतांच्या विक्री सारख्या मानवनिर्मित संकटांमुळे अडचणीत येत आहे. गेल्या वर्षी बनावट बियाणे विक्री प्रकरणी महाराष्ट्रातून सर्वाधिक कारवाया जळगाव जिल्ह्यातच झाल्या आहेत! या वर्षी हंगाम सुरु होताच बनावट बियाणे विक्री प्रकरणी भुसावळ, चाळीसगाव व जामनेर येथे धाडी टाकून लाखों रुपयांचे बनावट बियाणे जप्त करण्यात आले आहे. यामुळे बळीराजा धास्तावलेला आहे. यंदा काहीसा लांबलेला पाऊस काही प्रमाणात जिल्ह्यावर बरसल्यामुळे पेरण्यांना वेग येत आहे. कृषि विभागाकडील माहितीनुसार, खरिप हंगाम २०१६ मध्ये जिल्ह्यात तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य तसेच कापूस व ऊस या पिकाखाली ७ लाख ५७ हजार ७७१ हेक्टर क्षेत्र असेल आणि त्यातून १६ लाख ९६ हजार ८४४ मेट्रीक टन उत्पादन अपेक्षित आहे. जिल्ह्यात या हंगामात २० लाख ६० हजार ४२० कपाशी बियाण्यांच्या पाकीटांची आवश्यकता असून ती ४ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड होतील. ज्वारी बाजरी, मका, मूग, उडीद, तूर, तिळ, सोयाबीन, सूर्यफूल, भुईमुग, व कपाशी ही सर्व बियाणे एकूण ५९ हजार १५४ क्विंटल इतकी लागतील. खरीप हंगामात ३ लाख ४७ हजार ३०० मेट्रिक टन रासायनिक खतांची आवश्यकता भासणार आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी मधुकर चौधरी म्हणाले की, खरिप हंगामात ४ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रफळावर कापसाचा पेरा अपेक्षित आहे. अन्य जिल्ह्याच्या तुलनेत हे क्षेत्रफळ निश्‍चितच मोठे आहे. या व्यतिरिक्त सुमारे ५० हजार हेक्टर क्षेत्रफळावर केळी व १ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रफळावर मक्याचा पेरा होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षा रासायनिक खतांचा वापर वाढला आहे, हे खरे असले तरी आता रासायनिक खतांच्या अतिवापराचे दुष्य:परिणाम शेतकर्‍यांना दिसू लागले आहेत. यामुळे यंदा बदल होईल, असा विश्‍वास वाटतो. यंदा हवामान खात्याने सकारात्मक अंदाज वर्तविल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अशातच जलयुक्तशिवार योजनेअंतर्गत जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात कामे झाली आहेत. यामुळे सिंचनाचे क्षेत्र वाढण्यास मदत होईल. सध्या सिंचनाचे क्षेत्र २२ टक्के असून ते वाढून २८ ते ३० टक्क्यांपर्यंत जाईल, असा विश्‍वास श्री.चौधरी यांनी व्यक्त केला. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे दर चांगले राहतील असा अंदाज वर्तविण्यात येत असल्याने शेतकरी मागील दुख: विसरुन जोमाने कामाला लागला आहे.

जिल्ह्याला बनावट बियाण्यांचा शाप

खरीप हंगामाला ४ हजार कोटींची बियाणे बाजारपेठ असलेल्या महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्याचा हिस्सा २३० कोटी रूपयांचा आहे. यात कापसाचा वाटा मोठा आहे. कापूस हे नगदी पिक असल्याने जिल्ह्यात खरीप हंगामात सरासरी चार ते साडेचार लाख क्षेत्रफळावर कापसाचा पेरा होतो. यासाठी सुमारे २० ते २२ लाख बियाणे पाकिटांची विक्री होते. बियाणे खरेदीसाठी कृषी केंद्राबाहेर रात्रीपासून लागलेल्या लांबच-लाब रांगा,पोलीस बंदोबस्त, लाठीमार व गोळीबारात झालेला शेतकर्‍यांचा मृत्यु हे जिल्ह्याने पाहिलेले आहे. हीच बाब हेरुन बियाणे विक्रेत्यांकडून बियाण्यांची ‘ऑन’ने विक्री सुरु असत.(एमआरपी पेक्षा जादा दराने)


1 comment :

  1. रासायनिक शेतीतून मुक्त होवून नैसर्गिक शेती करा. अधिक माहितीसाठी whats app / telegram messenger LLP वरिल महाराष्ट्र नैसर्गिक शेती समुहात सामिल होण्यासाठी संपर्क करा. 9890512564 विलास सनेर

    ReplyDelete

Designed By Blogger