वाघाच्या ताकदीला संख्या‘बळा’ची गरज

कॉंग्रेस व राष्ट्रवादीला धोबीपछाड देत व भाजपालाही जोरदार टक्कर देत शिवसेनेच्या वाघाच्या पंज्याची पकड जिल्ह्यावर मजबूत बसली आहे. ग्रामीण भागात शिवसेनेचे संख्याबळही वाढले आहे मात्र शहरीभागात शिवसेना अजूनही पिछाडीवर आहे. विशेषत: रावेर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे संख्याबळ अत्यंत कमी आहे. येथे एकून ३४ जिल्हा परिषद सदस्यांपैकी शिवसेनेचे केवळ ३, ६८ पंचायत समिती गणांपैकी केवळ ३ तर एकूण १८२ नगरसेवकांपैकी केवळ १ शिवसेनेच्या अधिकृत चिन्हावर निवडून आले आहे. त्या तुलनेत जळगाव लोेकसभा मतदारसंघात ११ जि.प.सदस्य, २७ पं.सं. सदस्य व ४५ पुरस्कृत नगरसेवकांव्यतिरीक्त १३ नगरसेवक धनुष्यबाणावर निवडून आले आहेत.

१९९९ च्या विधानसभा निवडणूकीत गुलाबराव पाटील, आर.ओ.पाटील, दिलीप भोळे, कैलास पाटील व चिमणराव पाटील असे पाच आमदार निवडून आल्यानंतर जळगाव जिल्ह्यातीची शिवसेनचा बालेकिल्ला अशी नवी ओळख निर्माण झाली. मात्र यानंतर या बालेकिल्याचे बुरुज एकएक करून ढासळत राहीले आहेत. सन २००४ मध्ये चिमणराव पाटील, गुलाबराव पाटील, आर.ओ.पाटील व कैलास पाटील असे चार उमेदवार निवडून आले.यावेळी एक आमदार कमी झाली. सन २००९ च्या निवडणूक चिमणराव पाटील व सुरेशदादा जैन हे केवळ दोन आमदार निवडून आले. खान्देशची मुलुख मैदान तोफ व उपनेते गुलाबराव पाटील यांच्यासह अन्य दिग्गज पराभुत झाले. यानंतर चालु पंचवार्षिकला झालेल्या निवडणूकीत उपनेते गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण)यांच्यासह किशोर पाटील (पाचोरा-भडगाव) व प्रा.चंद्रकांत सोनवणे (चोपडा) निवडून आले. तर सुरेशदादा जैन व चिमणराव पाटील यासारख्या दिग्गज नेत्यांसह जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील थोड्या मतांनी पराभुत झाले.

जळगाव लोकसभा मतदारसंघ

ग्रामीण भागात मुसंडी - जळगाव लोकसभा मतदार संघात अमळनेर, भडगाव, चाळीसगाव, धरणगाव, एरंडोल, पारोळा, पाचोरा व जळगाव असे ८ तालुके आहेत. याभागात शिवसेनेची ताकद जास्त असून ३४ जि.प.गटांपैकी ११ गटांमध्ये व ६८ गणांपैकी २७ शिवसेनेचे सदस्य निवडून आले आहे. पाचोरा, धरणगाव,एरंडोल व जळगाव पंचायत समितींमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. या व्यतीरिक्त जिल्हा परिषदेत उपाध्यक्षपदी शिवसेनेचे ज्ञानेश्‍वर आमले तर कृषी सभापती मिनाताई पाटील व महिला बालकल्याण सभापती निताताई चव्हाण विराजमान आहेत. शहरी भागात पिछाडीवर - जळगाव लोकसभा मतदार संघातील ७ नगरपालिकांमधील २४३ नगरसेवकांपैकी केवळ १३ जण धनुष्यबाण या चिन्हावर निवडून आले आहे. यात अमळनेर येथे १, भगडगाव - ८ व पारोळा येथील ४ नगरसेवकांचा समावेश आहे. या व्यतीरिक्त ४५ नगरसेवक वेगवेगळ्या आघाड्यांमध्ये शिवसेना पुरस्कृत म्हणून निवडून आले आहे. यात एरंडोल- १६, चाळीसगाव - ४, धरणगाव- ६, पाचोरा - १९.

रावेर लोकसभा मतदार संघ

जळगाव लोकसभा मतदार संघाच्या तुलनेत रावेर लोकसभा मतदार संघात शिवसेना कमकुवत दिसून येत आहे. चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ व जामनेर या ७ तालुक्यांमधील ३४ जि.प. गटांमध्ये शिवसेनेचे केवळ ३ सदस्य निवडून आले असून ६८ जणांमधील देखील ३ सदस्य निवडून आले आहे. शहरी भागातही अशीच परिस्थिती असून वरणगाव नगरपालिकेतून धनुष्यबाण या चिन्हावर केवळ १ नगरसेवक निवडून आले आहे. या व्यतीरिक्त यावल तालुक्यातील पुरस्कृत निवडून आलेले ४ व भुसावळ मधील ८ नगसेवकांनी शिवसेनेची साथ सोडली आहे. फैजपूर, रावेर, सावदा व जामनेर नगरपालिकांमध्ये शिवसेनेचा एकही नगरसेवक नाही, हे कटू सत्य आहे.

सन १९६८ मध्ये पहिली शाखा

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सन १९६६ मध्ये मराठी माणसांच्या हक्कासाठी शिवसेनेची मुहुर्तमेढ रोवल्यानंतर अवघ्या दोन वर्षातच बाळासाहेबांच्या विचारांचे वादळ जळगाव जिल्ह्यात पोहचून सन १९६८ मध्ये शिवसेनेची पहिली शाखा उघडण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील ढाण्यावाघ म्हणून ओळखले जाणारे श्री.नेहेते यांच्याकडे जिल्हाप्रमुख पदाची सुत्रे सोपविण्यात आली. त्यांनी तत्कालीन शिवसैनिकांना सोबत घेवून घराघरात बाळासाहेबांचा विचार पोहचविला. यानंतर राणाजींकडे जिल्हाप्रमुख पद सोपविण्यात आले. हे राणाजी म्हणजे माजी जिल्हाप्रमुख गणेश राणा यांचे वडिल! राणाजी यांच्यानंतर सदाशिव ढेकळे, ऍड जगदिश कापडे, राजेंद्र दायमा गणेश राणा, गुलाबराव वाघ, आ. गुलाबराव पाटील, आ. किशोर पाटील, चंद्रकांत पाटील यांनी टप्प्याने जबाबदारी पेलली. यामध्ये राजेंद्र दायमा यांनी सर्वाधिक १६ वर्ष म्हणजे १९९४ ते २००९ दरम्यान हे शिवधनुष्य पेलले. याच काळात सेनेने सत्तेची फळे चाखली. सन १९९० जिल्ह्यातुन पहिले आमदार म्हणून हरिभाऊ महाजन यांनी विधानसभेत बाळासाहेबांचे सैनिक म्हणून एन्ट्री केली. त्यानंतर १९९५ मध्ये दिलीप भोळे हे देखील विधानसभेवर निवडून गेले.


Post a Comment

Designed By Blogger