हवामान खात्याचे ‘अंदाजपंचे’ अंदाज

‘मला हवामान खात्यातल्या नाकरीचं खुप अप्रुप वाटतं...कुठलं टारगेट नसतं, अंदाज खोटे ठरले तरी, कोणी राजीनामा मागत नाही,कोणतीही कारवाई नाही...विशेष म्हणजे कोणी सिरियसली घेतच नाही.’ हा मेसेज गेल्या आठवडाभरापासून व्हाट्सअप, फेसबुकसह अन्य सोशलमीडियावर व्हायरल होत आहे. यातील गमतीचा भाग सोडला तरी ही गम्मत कटू सत्यावर आधारीत आहे. आपण लहानपणापासून शिकत आलो आहे की भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून आहे. मात्र संपुर्ण देशाचा अन्नदाता असलेला बळीराजा गेल्या तिन वर्षांपासून संकटांच्या दृष्टचक्रात अडकला आहे. कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी वाढत्या महागाईमुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणात वाढत आहे. यंदा दमदार पाऊस होईल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. सरासरीपेक्षा जास्त पाऊस, ११० टक्के पाऊस, १३० टक्के पाऊस... अशा घोषणांचा व अंदाजांचा पाऊस मे महिन्यांपासून पडत आहे. यामुळे यामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. चांगल्या पावसाच्या वृत्ताने बाजारपेठेतही आनंदी वातावरण पसरुन शेअर मार्केटने देखील मोठी उसळी घेतली होती. मात्र जून महिना निम्मा संपत आला तरी पाऊस बेपत्ता असल्याने हवामान खात्याच्या अंदाजांवर आता विचार करण्याची वेळ आली आहे.

हवामान खात्यातील तज्ञांमध्ये वादळ

देशातील मान्सूनबाबत सर्वत्र उत्सुकता असताना ‘स्कायमेट’ने यंदा मान्सून लवकर दाखल होणार असल्याचे भाकीत दोन महिन्यांपूर्वी केले होते. स्कायमेटच्या अंदाजात अंदमानात मान्सून १८ ते २० मेदरम्यान तर केरळात २८ ते ३० मेदरम्यान दाखल होईल असे म्हटले होते. यामुळे शेतकर्‍यांनी खरीप हंगामाची जोरदार सुरुवात केली. काही ठिकाणी मे महिना अखेर लागवड करण्यात येणार्‍या कापसाची मोठ्याप्रमाणात लागवड करण्यात आली. भारतीय हवामान खात्यानेही मॉन्सून लवकर येणार असल्याचे जाहीर केले होते. ३० मे पर्यंत पाऊस न आल्याने भारतीय हवामान खात्याने आपला सुधारीत अंदाज जाहिर करत जूनच्या पहिल्या आठवड्या मॉन्सून वर्दी देईल असे जाहीर केले. मात्र प्रत्यक्षात १५ जून उजाडला तरी पावसाचा पत्ता नाही! दरम्यान काही दिवसांपुर्वी केरळमध्ये दमदार पाऊस झाला. मात्र हा मॉन्सून आहे का अवकाळी पाऊस यावरूद स्कायमेट ही खाजगी संस्था व भारतीय हवामान खात्यात वाक्युध्द सुरु झाले आहे.

‘स्कायमेट’च्या मते, केरळातही मान्सून २८ ते ३० मेदरम्यानच दाखल झाला आहे. त्यासाठी या संस्थेने वेळोवेळी निकषांशी संबंधित आकडेवारीही दिली. मात्र, हवामान खात्याने केरळात त्या वेळी मान्सून आलेला नसल्याचे जाहीर केले. अखेर आठ जून रोजी हवामान खात्याने केरळात मान्सून दाखल झाल्याचे जाहीर केले. त्यावरून स्कायमेटचे सीईओ जतीन सिंह यांनी हवामान खात्यावर जोरदार टिका केली. ‘जी फॉर गव्हर्नमेंट, जी फॉर गॉड, इट माइट रेन, इट माइट नॉट, व्हेन आयएमडी सेज इट्स मान्सून, अँड व्हेन स्कायमेट सेज इट्स नॉट,’ अशा शब्दांत नाराजी व्यक्त करत ‘आमचा पाऊस मान्सूनचा नव्हता, तर तुमचा तरी कसा?’ असा सवाल सिंह यांनी उपस्थित केला आहे. हवामान खात्याने जाहीर केलेला मान्सूनही अनेक निकष पूर्ण करत नसल्याचेे सिंह यांचे म्हणणे आहे. सिंह यांच्या मते, केरळात २८ ते ३० मे रोजी मान्सून दाखल होईल, असे भाकीत केले होते. त्यासाठी आवश्यक असणार्‍या विशिष्ट काळात विशिष्ट पर्जन्यमान, वार्‍याची स्थिती, आर्द्रता आणि दीर्घ तरंग किरणोत्सर्ग (ओएलआर) या निकषांवर आधारित भाकीत केले होते. केरळात २८ ते ३० मे दरम्यान मान्सून दाखल झाल्याचे आम्ही म्हटले तेव्हाही यातील बहुतेक निकष जुळले होते. मात्र, हवामान खात्याने तेव्हा निकष जुळत नसल्याचे म्हटले होते. आता हवामान खात्याने मान्सून केरळात दाखल झाला असे जाहीर केले असले तरी ओएलआरचा निकष पूर्ण होतो आहे का? असा सवाल जतीन सिंह यांनी केल्याने हवामान खात्याचे अंदाजपंचे अदांज तर नाही ना? असे म्हणण्याची वेळ आली आहे. देशात पावसाचे वादळ अपेक्षित असतांना हवामान खात्याच्या तज्ञांमधील या वादळामुळे शेतकरी संभ्रमात पडला आहे. आधीच हवामान खात्याचे नैऋत्य मोसमी वारे व अग्नेय मोसमी वारे असे जड शब्द सर्वसामान्यांच्या पचनी कधीच पडत नाही. येत्या २४ तासात दमदार पाऊस पडेल असा अंदाज तर्वविल्यानंतर कडक ऊनं पडतं व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे किंवा कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊस लांबला... असा सुधारित अंदाज जाहीर करण्यात येतो. या यंत्रणेवर शासन कोट्यावधी रुपये खर्च करत असतांना अशा अंदाजपंचे अंदाजांवर किती दिवस अवलंबून राहावे लागेल याचाही गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. नाहीतर शेतकर्‍यांना ‘अच्छे दिन’ कधीच येणार नाही. एकी कडे शेतकरी आत्महत्या वाढत असतांना देशाच्या पोशींद्याला पिकं पेरण्या कधी करायच्या या बाबत योग्य मार्गदर्शन मिळत नाही! हे आपल्या देशाचे दुर्भाग्य आहे.


Post a Comment

Designed By Blogger