हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सन १९६६ मध्ये मराठी माणसांच्या हक्कासाठी शिवसेनेची मुहुर्तमेढ रोवल्यानंतर अवघ्या दोन वर्षातच बाळासाहेबांच्या विचारांचे वादळ जळगाव जिल्ह्यात पोहचून सन १९६८ मध्ये शिवसेनेची पहिली शाखा उघडण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील ढाण्यावाघ म्हणून ओळखले जाणारे श्री.नेहेते यांच्याकडे जिल्हाप्रमुख पदाची सुत्रे सोपविण्यात आली. त्यांनी तत्कालीन शिवसैनिकांना सोबत घेवून घराघरात बाळासाहेबांचा विचार पोहचविला. यानंतर राणाजींकडे जिल्हाप्रमुख पद सोपविण्यात आले. हे राणाजी म्हणजे माजी जिल्हाप्रमुख गणेश राणा यांचे वडिल! राणाजी यांच्यानंतर सदाशिव ढेकळे, ऍड जगदिश कापडे, राजेंद्र दायमा गणेश राणा, गुलाबराव वाघ, आ. गुलाबराव पाटील, आ. किशोर पाटील, चंद्रकांत पाटील यांनी टप्प्याने जबाबदारी पेलली. यामध्ये राजेंद्र दायमा यांनी सर्वाधिक १६ वर्ष म्हणजे १९९४ ते २००९ दरम्यान हे शिवधनुष्य पेलले. याच काळात सेनेने सत्तेची फळे चाखली.
सन १९९० जिल्ह्यातुन पहिले आमदार म्हणून हरिभाऊ महाजन यांनी विधानसभेत बाळासाहेबांचे सैनिक म्हणून एन्ट्री केली. त्यानंतर १९९५ मध्ये दिलीप भोळे हे देखील विधानसभेवर निवडून गेले. १९९९ ची विधानसभा निवडणूकीने जिल्ह्यातील शिवसैनिकांना शक्तीवर्धक डोस दिला! यावर्षी गुलाबराव पाटील, आर.ओ.पाटील, दिलीप भोळे, कैलास पाटील व चिमणराव पाटील असे पाच आमदार निवडून आले. सहा पैकी पाच उमेदवार निवडून आल्याने हा जिल्हा शिवसेनाचा बालेकिल्ला म्हणून नावारूपाला आला. सन २००४ मध्ये चिमणराव पाटील, गुलाबराव पाटील, आर.ओ.पाटील व कैलास पाटील असे चार उमेदवार निवडून आले.यावेळी एक आमदार कमी झाले असले तरी सेनेची ताकद वाढली होती, हे सत्य कोणीही नाकारू शकणार नाही. यानंतर झालेल्या २००९ च्या निवडणूक मात्र केवळ दोन आमदार निवडून आले. खान्देशची मुलुख मैदान तोफ व उपनेते गुलाबराव पाटील यांच्यासह अन्य दिग्गज पराभुत झाले. यावर्षी चिमणराव पाटील व पुन्हा स्वगृही परतलेले सुरेशदादा जैन हे निवडून आले. यानंतर चालु पंचवार्षिकला झालेल्या निवडणूकीत गुलाबराव पाटील यांनी पुन्हा दमदार पुनरागमन करत विद्यमान जिल्हाप्रमुख किशोर पाटील व प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनाही निवडून आणले. मात्र या निवडणूकीत सुरेशदादा जैन व चिमणराव पाटील यासारख्या दिग्गज नेत्यांसह दुसरे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील थोड्या मतांनी पराभुत झाले.
जिल्हा परिषदेत निर्विवाद सत्ता
जिल्ह्यात सर्वातप्रथम जि.प.सदस्य म्हणून निवडून यायचा बहुमान भुसावळचे दिलीप भोळे यांच्या नावावर आहे. ते खडका गटातून १९९१ मध्ये जिल्हा परिषदेवर निवडून गेले. याकाळात शिवसेना हळुहळू घराघरात पोहचत होती. हा काळ प्रचंड संघर्षाचा होता. याकाळातही जिल्हा परिषदेचे पहिले पदाधिकारी म्हणून विद्यमान आ. गुलाबराव पाटील हे कृषी सभापती म्हणून निवडून गेलेले आहेत. यानंतरही जि.प.त सेनेचे प्रतिनीधीत्व होते. शिवसेनेतर्फे पहिले उपाध्यक्ष होण्याचा मान के.एस. पाटील यांना मिळाला. यानंतर हिंमत पाटील, दिलीप पाटील, प्रकाश सोमवंशी, जानकीराम पाटील, मच्छिंद्र पाटील व आता ज्ञानेश्वर आमले हे उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.
सन २००७ ते २०१२ या पंचवार्षिकमध्ये सेना सत्तेमध्ये वाटेकरी होती. सन २००७ मध्ये झालेल्या निवडणूकीत शिवसेनेचे १५ सदस्य निवडून आले. या काळात उपाध्यक्ष म्हणून प्रकाश सोमवंशी व जानकीराम पाटील, गटनेते म्हणून विश्वनाथ पाटील, सभापती म्हणून डॉ.दिनकर पाटील, कांताबाई मराठे, रेखाताई राजपूत यांनी दमदार कामगिरी करत ग्रामीण भागातही सेनेचा विचार पोहचवला. याचा फायदा चालू पंचवार्षिकच्या निवडणुकीतही सदस्यांना झाला. यंदाही गट बदलल्यानंतर सुध्दा १५ सदस्य निवडून आले. शिवसेनेची ही दमदार घोडदौड अजूनही दमदारपणे सुरु आहे. येणार्या काळात संघटना बांधणीसह संख्याबळ वाढविण्याचाही प्रण शिवसैनिकांनी केला आहे.
Post a Comment