कोथळीचे सरपंच ते महसुलसह आठ वजनदार खात्यांचे मंत्री व्हाया विधानसभेचे विरोधीपक्षनेते असा २५ पेक्षा जास्त वर्षांचा राजकीय प्रवास ना. एकनाथराव खडसे यांचा राहिला आहे. महाराष्ट्रातील मोजक्या लोकनेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतोे. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत भाजपाला घवघवीत यश मिळाल्यानंतर नाथाभाऊच मुख्यमंत्री होतील अशी सर्वांनाच अपेक्षा होती. किंबहूना उत्तर महराष्ट्रासह राज्यातील अनेक मतदार संघात नाथाभाऊंना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजपाला मतदान करा असा प्रचार झाला होता. या सर्व ठिकाणी भाजपाचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले. मात्र काही राजकीय तडजोडींमुळे नाथाभाऊंच्याच पठडीत तयार झालेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. मात्र महसुल, कृषी, राज्य उत्पादन शुल्क, अल्पसंख्याक विकास, औकाफ, मत्स्यपालन, पशुसंवर्धन व दुग्धविकास या वजनदार खात्यांसह विधानपरिषदेतील सभागृह नेता पद देवून पक्षाने ना. खडसे यांना मुख्यमंत्र्यांच्या समकक्ष मान दिला आहे. यावरून त्यांचे पक्षातील वजन दिसून येते.
एकनाथराव खडसे यांचा राजकीय प्रवास कोथळी ग्रामपंचायतीपासून सुरू झाला असला तरी, त्यांच्यातील नेतृत्व गुण महाविद्यालय जीवनातच समोर आले होते. अकोला येथे एल.आर.टी. महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना जी.एस. निवड झाल्यानंतर नाथाभाऊंनी सर्वप्रथम नेतृत्वाची झलक दाखवली. शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या नाथाभाऊंनी शिक्षण पुर्ण झाल्यानंतर नोकरी न करता कोथळीत येवून शेती करण्याचा निर्णय घेतला. गावात परतल्यानंतर शेतीसह दूधचा व्यवसाय करतांना त्यांना राजकीय क्षेत्र खुणावत होते. त्यांनी गावातील तरूणांना सोबत घेवून कोथळी ग्र्रा.प.मध्ये स्वत:चे पॅनल उभे केले. मात्र पॅनल पडले! पहिल्याच प्रयत्नात अपयश आल्यानंतर नाऊमेद न होता त्यांनी शेतकी संघाची निवडणूक लढवली. यात दणदणीत यश मिळविल्याने त्यांना चेअरमनपदाची संधीही मिळाली. चेअरमन हे पंचायत समितीचे पदसिध्द सदस्य असल्याने नाथाभाऊ यांची पंचायत समितीमध्ये एन्ट्री झाली. यानंतर पुन्हा एकदा त्यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवली व यात यश मिळवून ते कोथळीचे सरपंच झाले. याकाळात जळगाव जिल्हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र नाथाभाऊंनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून नव्या इंनिंगची सुरूवात केली. याकाळातील पक्षाचे नेते अशोक फडके यांच्या दुर्देवी निधनामुळे नाथाभाऊंना १९९० मध्ये विधानसभा लढविण्याची संधी मिळाली. पहिल्याच प्रयत्नात ते विधानसभेत पोहचले वकृत्व व बुध्दीमत्ताच्या जोरावर त्यांनी विधानसभेवर छाप पाडली. पक्षाने त्यांच्यातील नेतृत्व गुण हेरल्यानंतर १९९२ साली त्यांना भाजपाचे प्रतोत म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. १९९५ साली युती शासनाच्या काळात त्यांना राज्यमंत्री पद मिळणार असा निरोप कार्यकर्त्यांना मिळाल्याने जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते मुंबईला पोहचले. मात्र पक्षाच्या यादीत त्यांचे नाव नसल्याचे समोर आल्यानंतरही नाऊमेद न होता कार्यकत्यार्ंची समजूत काढली मात्र पक्षावर विश्वास कायम ठेवला. कारण त्यांच्या नशिबात राज्यमंत्री नव्हे तर कॅबीनेट मंत्रीपद लिहीले होते! अवघ्या काही दिवसात त्यांना पुन्हा मुंबईला बोलविण्यात आले व उच्च व तंत्रशिक्षण, अर्थ, पाटबंधारे आणि पाटबंधारे व लाभक्षेत्र विकास अशा विविध खात्यांची मंत्रीपदे त्यांना मिळाली. या काळात त्यांनी जिल्ह्यातील विकासकामांचा अनुशेष भरून काढण्याचा सपाटाच लावला. जी कामे वर्षानुवर्षे रखडली होती ती हळुहळु पुर्ण होण्यास सुरूवात झाली. या काळातच जिल्ह्यात अच्छे दिन येण्यास खर्या अर्थाने सुरूवात झाली. सिंचनाचा अनुशेष भरण्यासाठी त्यांनी तापी पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना केली. वाघुर धरणाच्या कामालाही भाऊंनी मोठ्या प्रमाणात निधी मिळवून दिला. यामुळे जळगाव व जामनेर तालुक्यातील गावांना मोठा फायदा झाला. १९९९ मध्ये झालेल्या निवडणूकीत नाथाभाऊ पुन्हा निवडून आले मात्र भाजपाला सत्ता मिळाली नाही. मात्र विरोधात राहूनही भाऊंच्या आक्रमकतेची धार कमी झाली नाही. २०० मध्ये भाजपाचे विधीमंडळ गटनेते पदी त्यांची निवड झाली. २००९ च्या विधानसभा निवडणूकीनंतर त्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणून काम करण्याची संधी देण्यात आली. आक्रमकता व अभ्यासू वृत्तीमुळे विधानसभेतील ते सर्वाधिक प्रभावी विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची गणती केली जाते. त्यांच्या मुद्यांवर तत्कालीन मुख्यमंत्र्यांसह मंत्रीमंडळाने निर्णय घेतल्याचेही उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. हा प्रवास सुरू असतांना दोन वेळा प्रदेशाध्यक्ष पदाच्या संधीने हुलकावणी दिली. विरोधी पक्षनेते पदाच्या कार्यकाळात त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी जिल्ह्यात खेचून आणाला. बोदवड परिसर सिंचन योजनेला निधी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला.
आता भाजपाचे सर्वाधिक वजनदार मंत्री असलेल्या नाथाभाऊंकडून बोदवड उपसा सिंचन योजना पुर्ण करण्यासाठी लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. तापी नदीचे पुराव्दारे वाहून जाणारे पाणी लिप्ट करून साठवण बंधार्यात साठविण्यात येणार आहे. यामुळे बोदवड व मलकापूर तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्यांना नवसंजीसनी मिळणार आहे. यासह मुक्ताई सुतगिरणी व कारखाना, मुक्ताईपार्क, कुर्हा उपसा सिंचन योजना पुर्ण करण्यास प्राधान्य क्रम देण्यात आला आहे. जळगाव विमानतळावरून प्रवासी विमान सेवा सुरू होणे, बंद पडलेल्या उद्योगांना पुर्नसंजीवनी, शिक्षणाचा अनुशेष आदी वर्षानुवर्ष प्रलंबित विषय मार्गी लागून भाऊंच्या दुरदृष्टीने विकासगंगा जिल्ह्यात येणार असल्याचेही आता स्पष्ट झाले आहे.
Post a Comment