ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रतिनीधीत्व करणार्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने अल्पवधीतच आंतरराष्ट्रीय पातळीवर केवळ ओळखच निर्माण केली नसून गुणवत्तेच्या जोरावर दबदबाही निर्माण केला आहे. इंडिया टूडे या नियतकालीकाने देशभरातील ६२० विद्यापीठांचा अभ्यास करून सर्वोत्तम ५० विद्यापीठांमध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा समावेश केल्याने खान्देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
जागतिकीकरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात निर्माण झालेल्या जीवघेण्या स्पर्धेत उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थी टिकावा यादृष्टीने उमविच्या अभ्यासक्रमांची रचना करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय पातळीवरील शिक्षण आणि स्थानिक म्हणजे खानदेशातील गरजा लक्षात घेऊन काही इंटिग्रेटेड कोर्सेस राबविले जातात. विद्यापीठाचे नंदूरबार, अमळनेर आणि धुळे येथे उपकेंद्र आहेत. या उपकेंद्रांना सक्षम करण्यात आले आहे. प्रताप तत्वज्ञान केंद्र अमळनेर, नंदूरबार येथील एकलव्य प्रशिक्षण केंद्र आणि धुळे येथील महात्मा गांधी केंद्र या तीनही ठिकाणी ऍडव्हान्स डिजीटल सिस्टीमचा वापर सुरू केला आहे. यासाठी डिजीटल पोडीयम, इंटरऍक्टीव स्मार्ट बोर्ड, डिसप्ले बोर्ड आदी तंत्रज्ञानांच्या सुविधा देण्यात आल्या आहेत.
विद्यापीठाने १४ प्रशाळा निर्माण केल्या आहेत. या प्रशाळांमध्ये विभाग निर्माण केले आहेत. त्यामुळे हे विभाग आणि प्रशाळा सक्षम होतील असा आशावाद आहे. विद्यापीठाची वाटचाल गंभीरपणे सुरू असून, देशाच्या पातळीवर विद्यापीठाच्या संशोधनाची नोंद घेतली जात आहे. संशोधनामध्ये गती यावी यासाठी महाविद्यालयीन शिक्षकांना समाजपयोगी संशोधन प्रकल्प राबविण्यासाठी २ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. अविष्कार या संशोधन स्पर्धेत पारितोषिक प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना देखील प्रोत्साहन दिले जात आहे. याशिवाय, क्रीडा, एनसीसी, एनएसएस या उपक्रमांमध्ये भाग घेणाज्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारची मदत विद्यापीठाकडून दिली जाते. ग्रंथालयात विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारची पुस्तके उपलब्ध व्हावीत यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील असते.
शिकत असताना विद्यार्थ्यांमध्ये एकोपा निर्माण व्हावा, जातीधर्माच्या पलिकडे जाऊन ऐक्याची भावना वृीध्दगत व्हावी यासाठी बहूविध शिक्षण पध्दती देण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय एकात्मता यातुनच निर्माण होईल असा आम्हाला विश्वास आहे. ग्रामीण आणि दूर्गम भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे आव्हान विद्यापीठाने स्वीकारले आहे. त्यादृष्टीने काही प्रयत्न केले जात आहेत. विद्यापीठाला आता समाजापर्यंत पोहोचावे लागणार आहे याचे भान असल्यामुळेच प्रयोगशाळा ते जमीन हा अभिनव उपक्रम विद्यापीठाने हाती घेतला आहे. यातुन शेतकर्यांशी संवाद साधून जौवतंत्रज्ञानाद्वारे शेतीचे उत्पादन अधिक वाढविण्यासाठी काय करता येऊ शकेल याबाबत शेतकर्यांच्या शंकांचे निरसन केले जाते. या उपक्रमासोबतच विद्यापीठाच्या मोबाईल व्हॅनद्वारे शाळकरी विद्यार्थ्यांना विज्ञानाची रूची निर्माण केली जात आहे.
परदेशी विद्यापीठांशी उमविने सामंजस्य करार केले असून या विद्यापीठाचा विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर इतर शैक्षणिक संस्थांसोबत याद्वारे जोडला जात आहे. विद्यापीठासोबत या भागातील उद्योजकही जोडले जावेत यासाठी उद्योजक आंतरसंवाद कक्ष स्थापन करण्यात आला आहे. याद्वारे उद्योजकांची मते जाणून घेऊन त्यांना हवे असणारे मनुष्यबळ आपल्या अभ्यासक्रमातुन कशा प्रकारे तयार करता येईल याचा विचार केला जाणार आहे. रोजगाराभिमूख अभ्यासक्रम तयार करण्यावर विद्यापीठाचा भर आहे.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने देश विदेशातील तज्ज्ञांना सोबत घेऊन थिंक टँक तयार केला आहे. अशा प्रकारचा थिंक टँक तयार करणारे उमवि हे पहिले विद्यापीठ आहे. पायाभूत सुविधा थेट पुरविताना विद्यार्थ्यांंच्या निवासाचा प्रश्न सोडविण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून एक हजारापेक्षा अधिक क्षमता असलेले चार वसतिगृहे विद्यापीठात उभे राहात आहेत. कमवा व शिका योजना च्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. राष्ट्रीय सेवा योजनेत विद्यापीठाने ३ पुरस्कार नुकतेच प्राप्तकरून सामाजिक बांधिलकीमध्ये येथील विद्यार्थी मागे नाहीत हे दाखवून दिले आहे. स्पर्धात्मक परीक्षांमध्येही या विद्यापीठाचा विद्यार्थी मागे राहाणार नाही याची काळजी घेतली जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण आणि संशोधन संस्थेद्वारे विद्यापीठात अनुसुचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण देण्यासाठी निवासी स्पर्धात्मक परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू झाले आहे. नंदूरबार येथील उपकेंद्रातही आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांबाबत सातत्याने मार्गदर्शन केले जात आहे. बाराव्या पंचवार्षिक योजनेत विद्यापीठाने विविध प्रकारचे प्रस्ताव सादर केले आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाकडे ७५ कोटींचे तर राज्य सरकारकडे ८० कोटी रूपयांचे प्रस्ताव सादर केले आहेत.
या तीनही जिल्हयांमध्ये आदिवासी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांंची संख्या अधिक आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची ओळख करुन देताना मुख्य प्रवाहासोबत जोडणे तसे जिकीरीचे होते. मात्र आकांक्षा आणि जिद्द मनात ठेवून या विद्यापीठाच्या सर्व घटकांनी प्रयत्न केले. म्हणूनच या विद्यापीठाने काही नवे मानदंड निर्माण केले. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील इतर विद्यापीठाच्या तुलनेत या विद्यापीठाने फार पूर्वीच नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर सुरु केला. माहिती तंत्रज्ञानाचा वापर अध्ययन,अध्यापन आणि प्रशासन या तीनही मध्ये विद्यापीठाने केला आहे. पेपरलेस ही कल्पना चांगल्या पध्दतीने राबविली जात आहे. यामुळे खान्देशातील विद्यार्थी उद्याच्या स्पर्धेसाठी सज्ज होत आहेत.
Post a Comment