चक्रव्युह की अतिमहत्वाकांक्षा

चक्रव्युह की अतिमहत्वाकांक्षाराजकारणात महत्वकांक्षा ठेवणे चुकिचे नाही, किंबहूना महत्वकांक्षी लोकच यशस्वी होतात, असा आजवरचा इतिहास आहे. मात्र अतिमहत्वकांक्षेने अनेकांचे राजकिय जीवन उद्ध्वस्त देखील झाले आहे. यात काहींनी राजकिय तडजोडी करुन स्वत:चे अस्तित्व ठिकवून ठेवले तर बेरीज - वजाबाकीचे राजकारण करुन ‘पॉवर’फुल खेळी फक्त एकाच व्यक्तीला जमली. महाराष्ट्राच्या राजकारणात दिवंगत विलासराव देशमुखांपासून स्व.गोपीनाथ मुंडेेंपर्यंतच्या ‘मासबेस’ नेत्यांना अग्निपरीक्षेतून जावे लागले! नंबर १ कोण? यासाठी महाराष्ट्राने असे कित्येक राजकिय महाभारत पाहिले आहेत. यामुळे सध्या महसुलमंत्री ना.एकनाथराव खडसे यांच्याबाबत सुरू असलेला वाद नवीन नाही. मात्र याची गरजेपेक्षा जास्त चर्चा होण्याचे मुख्य कारण म्हणजे, सध्या खडसे हे भाजपाचे एकमेव ‘मासबेस’ नेते आहेत (फक्त ओबीसी नव्हे). तसेच मुख्यमंत्री पदाची त्यांची महत्वकांक्षा कधीच लपून राहीलेली नाही. परंतू राजकिय तडजोडीचे राजकारण करतांना दिल्ली दरबारी विशेषत: संघ दरबारी वजन कमी पडल्याने त्यांचे राज्याचे मुख्यमंत्री पद हाताशी येता-येताच थोडक्यात हुकले व त्यांच्यापेक्षा कमी अनुभवी किंबहूना त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तयार झालेलेे युवा नेते देेवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली. (खडसे विधीमंडळ गटनेते व विरोधीपक्ष नेते असतांना विधानसभेत त्यांच्या मागच्या खुर्चीवर बदलेले फडणवीस हे खडसेंचे लाडके होते). येथूनच सत्तासंघर्ष सुरू झाला. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे व मराठा नेते विनोद तावडे हे देखील शर्यतीत होते. हे येथे नमुद करण्याचे कारण म्हणजे भाजप सत्तेत आल्यानंतर केवळ तिन मंत्री वादाच्या भोवर्‍यात अडकले. सर्वात आधी चिक्की घोटाळ्याने पंकजाताईंना रडवले त्यानंतर सेल्फीचा वाद झाला. यानंतर शिक्षण धोेरण व ‘नीट’ वरुन तावडे वादाच्या तावडीत सापडले. यानंतर गजानन पाटीलचे कथित ३० कोटींचे लाच प्रकरण, जावायाची बेकायदेशिर लिमोझिन कार, दाऊदशी झालेल कथित संभाषण, भोसरी येथील जागा बेकायदेशिर रित्या खरेदी प्रकरणे असे एकामागून एक प्रकरणे समोर आल्याने किंवा आणल्याने खडसे अडचणीत आले. यास कोणी मुख्यमंत्र्यांची धुर्त खेळी म्हटले तर कोणी खडसेंची हुकूमशाहीची फळे म्हटली. आपण राजकिय वादाच्या इतिहासाची पाने चाळून पाहिली तर एखाद्या मोठ्या नेत्यावरून वाद निर्माण झाला तर विरोधक त्यांच्यावर तुटून पडतात व स्वकिय बचावासाठी सर्वस्व पणाला लावतात. मात्र या दोन्ही गोष्टी येेथे झाल्या नाहीत. खडसेंच्या बचावासाठी एकही नेता जाहीरपणे समोर आला नाही व काहीच झाले नाही अशा आविर्भावात विरोधी पक्ष वावरला. यामुळे आधीच्या घटनांपेक्षा येथे काहीतरी वेगळे आहे, हे सांगायला कोण्या ज्योतीषाची गरज भासणार नाही. (ज्योतिषी म्हणजे ब्राम्हण नव्हे).
गोपीनाथ मुंडे जेंव्हा नाराज व्हायचे तेव्हा अर्धा महाराष्ट्र राजीनामा द्यायचा व दिल्लीला झुकावे लागायचे पण तसे देखील काहीच घडले नाही. खडसेंची समजूत कोणीच काढली नाही. पक्षात खडसेेंचा जवळचा कोणीच नाही का? खडसेंनी एकाच वेळी सर्वांनाच अंगावर घेतल्याने ही परिस्थिती ओढवली नाही ना? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे येणार काळच देईल! मात्र या सर्व वादामागे विरोधक नव्हे तर हितशत्रू असल्याचे खडसे यांनी नुकतेच म्हटले आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हा निशाणा कोणावर आहे. यावर राज्यभरात तर्कवितर्क सुरु झाले आहेत.
गेल्या आठवड्या मुख्यमंत्र्यांनी ‘नीट’चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेतली. यावेळी खडसेंना हटविण्याची ही योग्य वेळ  असून त्यांना सक्रिय राजकारणातून बाजूला करण्यासाठी राज्यपाल करुन दुर पाठवावे, अशी चर्चा झाल्याच्या वावड्या उठल्या. तर नाराज खडसे भाजपातून बाहेर पडल्यास त्यांच्यासोबत किमान ३० ते ३५ आमदार सोबत येतील व ते शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मदतीने सत्ता स्थापन करतील, असे तर्कवितर्क लढविण्यात आले. या वादामुळे कोणाचे नुकसान होईल? या विषयावरील चर्चेत भाजपाचेच जास्त नुकसान होईल, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. कारण भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या परंतु भाजपाच्या विरोधकांची भुमिका अत्यंत चोखपणे पार पाडणार्‍या शिवसेनला अंगावर घेण्याची ताकद खडसेंकडे आहे, हे सत्य कोणीही नाकारु शकत नाही. यामुळे पक्षश्रेष्टींनी या वादावर लवकर तोडगा काढणे आवश्यक आहे मात्र या विषयावर बोलतांना भाजपाचे केद्रिंय अध्यक्ष अमित शहा यांनी या विषयी निर्णय घेण्याचे अधिकार राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असल्याचे सांगत अंग झटकले आहे. यामुळे हा चेंडू उसळून पुन्हा एकदा फडणविसांकडे आला आहे. यामुळे खडसेंच्या म्हणण्यानुसार स्वकियांनी रचलेल्या या चक्रव्युहातून खडसे कसे बाहेर पडतात? या प्रश्‍नाचे उत्तर येणारा काळच देईल!

Post a Comment

Designed By Blogger