छत्रपती शिवाजी महाराजांचा खान्देशशी संबंध…वाचा जाज्वल्य इतिहास

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने जळगावची भूमी देखील पावन झाली आहे. शिवजयंती निमित्ताने आज आपण महाराजांचा जळगाव जिल्हा आणि खान्देशी आलेला संबंध याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. ही माहिती वाचल्यानंतर तुम्ही खान्देशी असण्याचा प्रत्येकाला गर्व वाटल्याशिवाय राहणार नाही.छत्रपती शिवाजी महाराजांचा खान्देशशी प्रथम संबंध आला तो आग्रा भेटीला जाताना महाराज ५ मार्च १६६६ रोजी राजगडावरून संभाजीराजेंना बरोबर घेऊन निवडक ४००-५०० सैनिकांसह औरंगाबादमार्गे खान्देशातून बर्‍हाणपूरला पोहोचले. प्रवास खर्चासाठी बादशहाने राजांना एक लाख रुपये बर्‍हाणपूरच्या शाही खजिन्यातून देण्याचे आदेश दिले. मुघल शहाजाद्यांची बडदास्त ठेवण्यात येते तशीच वाटेत शिवाजी महाराजांची बडदास्त ठेवावी असे सरपत्र बादशहाने प्रांतिक अंमलदारांना पाठविले होते. प्रवासात गाजीबेग नावाचा आपला अधिकारी महाराजांच्या तैनातीस दिला होता, असा उल्लेख इतिहासाची पाने उलगडल्यास दिसून येते.

पुरंदरच्या तहात गमावलेला मुलूख परत घेण्यासाठी महाराजांनी १६७० मध्ये मुघलांविरुध्द युध्द पुकारले. फेब्रुवारी १६७० मध्ये महाराजांनी बर्‍हाणपुराजवळील बहादरपुरा शहरावर चढाई करून तेथून बरीच संपत्ती हस्तगत केली. या दरम्यान, खान्देशचा दिवाण आश्रफखान याने बादशहाला लिहून कळविले की, ‘शिवाजीची फौज वर्‍हाड प्रांत लुटीत आहे व बादशाही प्रांतातून शिवाजीने २० लाख रक्कम गोळा केली.’ यावरुन महाराजांची मुघलांनी किती धास्ती घेतली होते, हे दिसून येते. १६७१ च्या आरंभापासून दीड वर्ष पावेतो मोठमोठे मुघल सरदार व प्रचंड फौजा शिवाजी महाराजांवर लोटल्या असतानाही, त्यांनी शौर्याने सामना केला आणि मुघलांना हरवून खान्देश, बागलाण, वर्‍हाड इत्यादी समृध्द प्रांतावर आपली सत्ता प्रस्थापित केली.

जळगाव जिल्ह्याला महाराजांचा पावन पदस्पर्श झाल्याची मोठी नोंद म्हणजे, महाराष्ट्र राज्य गॅझेटियर जळगाव जिल्हा यातील नोंदीनुसार, महाराजांच्या राज्यभिषेकानंतर राजेंनी १६७४ मध्ये मोहिमेवर निघाले बहादुरखानाच्या औरंगाबाद जवळील छावणीवर हल्ला केला व पुढे बागलाण आणि खानदेशात निघून गेले. सुरत फॅक्टरीच्या दुसर्‍या पत्रावरुन स्पष्ट होते की, मराठा सेनेने १ जानेवारी १६७५ मध्ये धरणगाव व तेथील इंग्रजांच्या वखारी लुटून संपत्ती हस्तगत केली. धरणगाव वखारीचा इंग्रजी अधिकारी सॅम्युअल ऑस्टिन यास कैद केले. शिवाय बर्‍हाणपूर पर्यत जात बरीच संपत्ती हासील केली.

धरणगाव प्रमाणेच चोपडा देखील मोठे सधन केंद्र होते. सुरतच्या इंग्रजी फक्टरी रेकॉर्डनुसार धरणगावची वखार काही दिवस चोपडा येथे स्थलांतरित करण्यात आली होती. (१६७८) व वखारीचे पुन्हा धरणगाव येथे पुर्रस्थापना केली. ऑस्टीन हा १६७५ मध्ये सप्टेबर महिन्यात महाराजांना रायगडावर जाऊन भेटला आणि धरणगाव वखार लुटली त्याची भरपाई मागितली तथापि महाराजांनी नाकारले. धरणगाव येथील पहिल्या छाप्यानंतर जानेवारीला १६७५ चार वर्षांनंतर १६७९ मध्ये वर्‍हाडातील मदतीने बर्‍हाणपूरच्या हल्ल्यांचा मनसुबा केला. परंतु परत एकदा फौज धरणगाव आणि चोपड्यावर तुटून पडली. बहादरपुरा लुटले. आणि मलकापूर येथे निघून गेली, अशीही शासन दप्तरी नोंद आहे.

Post a Comment

Designed By Blogger