संपूर्ण देशात प्रसिध्द खान्देशातील काठीची होळी कशी साजरी होते, माहित आहे का?

रंगांची मुक्त उधळण करणारा तसंच एकमेकांमधील प्रेम वृद्धिंगत करणारा होळी सणाचा उत्साह सर्वत्र ओसंडून वाहत आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी धुलिवंदनाच्या दिवशी रंग खेळून होळी साजरी केली जाते तर काही ठिकाणी होळीनंतर येणार्‍या पाचव्या दिवशी म्हणजे रंगपंचमीला होळीचा सण साजरा केला जातो. यात खान्देशातील काठीची राजवाडी होळीने देशभरतील अनेकांना भूरळ घातली आहे. काठीची होळी पाहण्यासाठी संपूर्ण राज्यातून नव्हे तर देशभरातून अनेक लोक खान्देशात येतात. खान्देशात वेगवेगळ्या ठिकाणी होळी कशी साजरी केली जाते? याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.सातपुड्यातील दर्‍याखोर्‍यांत राहणार्‍या आदिवासी बांधवांसह देशभरातील अनेकांना भूरळ घालणार्‍या काठी (ता. अक्कलकुवा) येथील राजवाडी होळीला विशेष महत्व असते. काठीच्या होळीला सुमारे ७५० वर्षांची परंपरा आहे. पांरपरिक वेशभूषा, नृत्य, गीते आणि त्याला पांरपरिक वाद्यांची रात्रभर साथ लाभत असल्याने होळीच्या दिवशी सातपुड्यात वेगळाच उत्साह पहायला मिळतो. घुंगरू, मोरपिसांचा टोप, ढोलकी, मोठा ढोल, बासरी, शस्त्र असा साज परिधान करून आणि अंगावर विविध रंगांचे नक्षीकाम करून होलिकोत्सवात सामील झालेले आदिवासी बांधव येणार्‍या प्रत्येकाला भूरळ घालतात. पंधरा दिवस चालणार्‍या होलिकोत्सवात आदिवासी बांधवांचे जीवन, संस्कृती आपल्याला अनुभवास येत असते. 

ऐतिहासिक वारसा लाभलेली काठी संस्थानची राजवाडी होळी प्रसिद्ध असून, या होळीसाठी देशभरातील आदिवासी बांधव एकत्र जमून तो साजरा करतात. सातपुड्यातील काठी संस्थानचे बाराव्या शतकातील राजे उमेदसिंह यांनी १२४६ पासून या ऐतिहासिक परंपरेला सुरुवात केली असून, ही परंपरा आजही टिकून आहे. काठी संस्थानचे वारस महेंद्रसिंग पाडवी व ग्रामस्थ ही परंपरा चालवीत असून, सातपुडा परिसरातील व आदिवासी संस्थानात पारंपरिक पद्धतीने हा शाही क्षण परंपरेनुसार मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. कुणालाही आमंत्रण दिले जात नाही की कुणाला मानसन्मान दिला जात नाही. तरी या काठीच्या होळी उत्सवाला हजारो आदिवासी बांधव पारंपरिक वेशभूषेत सामील होतात. 

होळीसाठी लागणार्‍या दांड्यालाही आदिवासींमध्ये विशेष महत्त्व असते. काठी येथील राजवाडी होळीसाठी ७० फूट उंचीचा बांबूचा दांडा आणला जातो. या दांड्याचा शोध हा महिनाभर आधीच लावला जातो. त्यासाठी विशिष्ट तरुणांवर ही जबाबदारी सोपवली जाते. त्यांच्यासाठी विशेष नियम आखून देण्यात आलेले आहेत. जंगलातून विधीवत पूजा करून होळीच्या दिवशी हा दांडा गावात आणला जातो. दांडा जमीनीत गाडून रात्री जागरण करून पहाटे पाचला होळी पेटवितात. होळीचा दांडा ज्या दिशेला झुकला किंवा खाली पडला, त्या दिशेला जास्त सुख-समृद्धी नांदते होते अशी धारणा आहे.

धुळे जिल्ह्यात डोल होळी

धुळे जिल्ह्यात डोल होळीचा उत्साह असतो. यात डोलचीचा वापर करुन पाण्याचे फटके एकमेकांना मारले जातात. गेल्या अनेक वर्षांची परंपरा या डोलचीला आहे. डोलजी म्हणजे पत्र्यापासून तयार केलेलं भांडं असतं. होळी खेळताना यात पाणी भरुन एकमेकांच्या पाठीवर वार करतात. पाण्याचा सपासप वार उघड्या शरीरावर बसल्याने अंगाची लाहीलाही होते. डोलीचीने होळी खेळताना जणू आखाड्याचंच वातावरण होतं.

भोंगर्‍या बाजार

आदिवासी खेड्यापाड्यांमध्ये शेकडो वर्षांपासून होळीचा सणाला भोंगर्‍या बाजाराची परंपरा चालत आली आहे. होळीच्या एक दिवस अगोदर भरणार्‍या या बाजारात आदिवासी बांधवांची जीवन संस्कृती आपल्याला अनुभवास येत असते. होलिकोत्सवाच्या पंधरा दिवस आधी ठिकठिकाणी हा बाजार भरतो. दहा ते बारा आदिवासी पाड्यांच्या मध्यवर्ती भागातील एका गावात हा बाजार सर्वानुमते भरविला जात असतो. आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील आदिवासी बांधव ढोल, पावरी घेऊन बाजाराच्या गावी नाचायला येतात. जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सातपुडा पर्वत रांगांच्या पायथ्याशी असलेल्या काही आदिवासी बहुल गावात भोंगर्‍या बाजार भरवण्यात येत असतो. या बाजाराच्या निमित्ताने खास आदिवासी शैलीमध्ये ढोल ताशांच्या गजरात अनोख्या पद्धतीने नृत्य करण्याचीही परंपरा आदिवासी समाजात पाहायला मिळते.

पंजाब, उत्तरप्रदेश व राजस्थानमधील होळी

रंगांचा सण अर्थात होळीचा सण देशभरात उत्साहात साजरा होत असला तरी प्रत्येक ठिकाणी त्याची वेगळी परंपरा आहे. पंजाबमध्ये होला मोहल्ला हा तीन दिवसांचा शीख उत्सव पंजाबमधील आनंदपूर साहिब येथे आयोजित केला जातो. या दिवशी, संगीत आणि कविता स्पर्धा आणि त्यानंतर मॉक बॅटल आयोजित केल्या जातात. उत्तर प्रदेशमध्ये लाठमार होळी नावाप्रमाणेच बरसाना, मथुरा आणि वृंदावनमध्ये स्त्रिया पुरुषांना काठीने मारतात आणि पुरुष ढालींनी स्वतःचा बचाव करतात. उदयपूरमधील रॉयल होळीला विशेष महत्व असते. हा उत्सव मेवाडच्या राजघराण्याद्वारे आयोजित केला जातो, ज्यामध्ये शाही घोडे आणि बँडसह मिरवणूक काढली जाते. पारंपारिक शेकोटी पेटवली जाते आणि होलिकाचा पुतळा आगीत टाकला जातो.


Post a Comment

Designed By Blogger