पाच पांडवांचा जळगाव जिल्ह्याशी संबंध आला होता का? इतिहासाच्या पाऊलखुणा म्हणतात…

जळगाव शहरापासून २७ कि.मी. अंतरावर एरंडोल हे तालुक्याचे गाव आहे. हे गाव म्हणजे महाभारतकालीन एकचक्रनगरी असल्याचे म्हटले जाते. एरंडोलचे प्राचीन नाव ऐरणवेल किंवा अरुणावती असे होते. ते अंजनी नदीच्या काठी वसले आहे. महाभारताच्या आधी पांडव अज्ञातवासात असतांना ते याच एक चक्रानगरीमध्ये वास्तव्यास होते. ते ज्या वाड्यात राहिले, तो वाडा म्हणजे पांडववाडा! आजही एरंडोलमध्ये ऐतिहासिक वास्तू म्हणून पांडववाडा प्रसिद्ध आहे. एरंडोल येथे भीमाची वाटी अजूनही दिसते. वाड्याच्या जवळच असलेल्या विहिरीला द्रौपदीकूप असेही म्हणतात. अनेक पर्यटक महाभारतकालीन पांडववाडा आणि पद्मालय येथे भेट देतात. या महाभारतकालीन पांडववाड्याचा शासकीय गॅझेटमध्ये (राजपत्रामध्ये) पांडववाडा असा उल्लेख आहे.पांडववाडा ही वास्तू ४५१५.९ चौरस मीटर क्षेत्रफळात उभी आहे. पांडववाड्याच्या प्रवेशद्वाराच्या अलीकडेच दगडांमध्ये प्राचीनकालीन कोरीव नक्षीकाम आहे. यात कमळफुलांची नक्षी स्पष्ट दिसते. आत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला मोकळी जागा आहे. तेथील भिंतींना अनेक खिडक्या आहेत. या प्राचीन खिडक्यांना समईच्या, तसेच कमळाच्या आकाराचे नक्षीकाम आहे. वाड्याच्या शेवटी मंदिराप्रमाणे गर्भागृह आहे. महाभारतकाळात एकचक्रनगरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या एरंडोल या शहराला ऐतिहासिक दरवाजे व खिडक्यांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. शिल्पकलेतून साकारलेले अनेक दरवाजे विविध भागात आहेत. बाहेरून दगडी कोटबांधणी असलेल्या अंजनी नदीच्या तिरावर वसलेल्या या शहरात बुधवार दरवाजा, अमळनेर दरवाजा, देवगिरी दरवाजा, कासार दरवाजा उर्फ कासोदा दरवाजा, चार दरवाजा, रंगारी खिडकी यांचेसह इतर काही दरवाजे इतिहासाचे साक्षीदार आहेत.

भिम व बकासुराचे युद्ध!

देशभरात प्रसिध्द असलेल्या गणपती मंदिरापैकी एक महाभारत कालीन श्री क्षेत्र पद्मालय गणपतीचे मंदिर. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल गावापासून केवळ अकरा किलोमीटर अंतरावर असलेले श्री क्षेत्र पद्मालय देशभरात प्रसिध्द आहे. श्री गणेशाच्या साडेतीन पिठांपैकी एक हे श्री क्षेत्र आहे. महाभारताच्या काळात पांडव अज्ञातवासेत असतांना या ठिकाणी तलावात आंघोळीसाठी येत असत अशी काल्पनिक अख्यायिका आहे. तसेच पांडवकाळात भिम व बकासुराचे युद्ध झाल्याची दंतकथा आहे. बकासुराचा वध केल्यानंतर भिमाला तहान लागल्याने त्याने आपल्या मुठीचा जोरदास प्रहार खडकावर केल्याने त्या ठिकाणी खोल खड्डा पडला; त्यास भिम कुंड म्हणून ओळखले जाते. भिम कुंड परिसरात आजही भाताचा कण असल्याच्या पांढर्‍या खुणा आढळून येतात.Post a Comment

Designed By Blogger