खान्देशला मुख्यमंत्रीपद का मिळाले नाही ?

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदावरुन सुरेशदादा जैन यांचा उल्लेख केला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपाचे गिरीश महाजन मुख्यमंत्री होत असतील, तर त्यास आपला पाठिंबा असेल, असे विधान केल्याने खान्देशच्या मुख्यमंत्री पदाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. खान्देशने राज्याला अनेक दमदार राजकीय नेते दिले आहेत. प्रतिभाताई पाटील यांनी तर थेट राष्ट्रपतीपदापर्यंत मजल मारली. मात्र अजूनपर्यंत खान्देशला मुख्यमंत्रीपद मिळालेले नाही, हे शल्य अनेकांना वाटते.

पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व कोकण विभागालाही मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे. मात्र उत्तर महाराष्ट्राला अद्यापही मुख्यमंत्रीपद मिळाले नाही. त्यातही खान्देशला नेहमीच मुख्यमंत्री पदाने हुलकावणी दिली आहे. राज्याच्या राजकारणात जळगाव व खान्देशातील स्व. मधुकरराव चौधरी, प्रतिभाताई पाटील, जे.टी.महाजन, अरुणभाई गुजराथी, रोहिदास पाटील, सुरेशदादा जैन, एकनाथ खडसे, गिरीश महाजन असे रथीमहारथी नेते दिले आहेत. यापैकी काहींचे नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत देखील होते, मात्र आतापर्यंत खान्देशला मुख्यमंत्री पद मिळालेले नाही, हेच कटू सत्य आहे.

खडसेंचे मुख्यमंत्रीपद थोडक्यात हुकले

२०१४ ला भाजप-शिवसेना युतीने सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत एकनाथराव खडसे यांचे नाव आघाडीवर होते. निवडणुकीवेळी ते भाजपातील सर्वात वजनदार, अनुभवी नेते व तत्कालीन विरोधीपक्ष नेते देखील असल्याने मुख्यमंत्री पदाची माळ त्यांच्यांच गळ्यात पडेल, असे चित्र होते. मात्र भाजापाच्या पक्षश्रेष्टींनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. यावेळी खडसेंची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना क्रमांक दोन मानले जाणारे महसूल मंत्रपद देत तब्बल आठ खात्यांची जबाबदारी सोपवली.

मराठी माणूस नसल्याने सुरेशदादांची संधी गेली

१९९९ मध्ये पहिल्यांदा युती सरकार आले तेंव्हा शिवसेनेकडून सुरेशदादा जैन यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे आले होते. मात्र राज्याचा मुख्यमंत्री मराठी माणूसच हवा, अशी भुमिका बाळासाहेब ठाकरे यांनी घेतल्याने सुरेददादा व पर्यायाने खान्देशची मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली. तेंव्हा त्यांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्रीपद देण्यात आले. याबाबतचा गौप्यस्पोट राज ठाकरे यांनी नुकताच एका कार्यक्रमात केला आहे. सुरेशदादा जैन मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती, असा दावा खडसेंनी नुकताच पत्रकारांशी बोलतांनाही केला आहे.

हे चार नेतेही होते मुख्यमंत्री पदासाठी पात्र

काँग्रेसच्या एकनिष्ठ नेत्या म्हणून प्रतिभाताई पाटील यांना पक्षाने मंत्रीपद, राज्यपाल व त्यानंतर राष्ट्रपतीपदाची संधी दिली. मात्र त्यांना मुख्यमंत्री पद मिळाले नाही. तसेच काँग्रेसचे मधुकरराव चौधरी हे देखील जळगावमधून मोठे प्रस्थ होते. त्यांनी विविध खात्यांचे मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. शिवाय त्यांना विधानसभा अध्यक्षपदही मिळाले. त्यानंतर राष्ट्रवादीचे अरुणभाई गुजराथी यांनाही विधानसभेचे अध्यक्षपद मिळाले. मात्र या तिन्ही नेत्यांचा मुख्यमंत्री पदासाठी विचार झाला नाही, हे खान्देशचे दुर्दव्यच म्हणावे लागेल. धुळ्याचे रोहिदास दाजी यांनाही मुख्यमंत्री पदाची संधी चालून आली होती, मात्र काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे खान्देशच्या हातातून ही संधी देखील निसटली.

आता गिरीश महाजनांच्या नावाची चर्चा का?

भाजप नेते गिरीश महाजन व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे दोघेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. असे असतानाही आमदार एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन मुख्यमंत्री होत असतील, आपला पाठिंबा राहील, असे विधान करून राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. मला जो मुख्यमंत्री पाहिजे आहे, तो कार्यक्षम, दूरदृष्टीचा व सामाजिक हिताचा निकष पूर्ण करणारा पाहिजे या निकषात गिरीश महाजन बसत असतील, तर मला त्यांच्या मुख्यमंत्रिपदासाठीही कोणतीही अडचण नाही. गिरीश महाजन यांनाही माझा पाठिंबा राहिलच. माझ्या भागाचा विकास व्हावा, हीच आपली अपेक्षा आहे, असे विधान खडसेंनी केल्याने खान्देशच्या मुख्यमंत्री पदाची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.


Post a Comment

Designed By Blogger