गोर्‍या इंग्रजांनी संपूर्ण भारताला लावली चीनच्या चहाची सवय; वाचा काय आहे इतिहास

भारतीयांचे सर्वात मोठे व्यसन कुठले? असा प्रश्‍न विचारल्यावर सर्वांचेच एकमत होते चहावर! व्यसन हा शब्द या करिता वापरला की, सकाळी व संध्याकाळी चहा पहिल्याशिवाय अनेकांना राहावतच नाही. पाहूणे मंडळी, मित्र-मैत्रिणी किंवा ओळखीचे कुणीही घरी आहे की चहा पाजलाच जातो. एखाद्या घरी गेल्यावर चहा विचारला नाही तर तो मोठा अपमान समजला जातो. लेमन टी, ब्लॅक टी, हर्बल टीसह गुळाचा चहा, अद्रकचा चहा, कुल्लड चहा, तंदूरी चहा अशा कितीतरी प्रकारच्या चहा आज कोट्यावधी भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाल्या आहेत. चहा पिणार्‍यांच्या संख्येत भारत हा जगात पहिल्या क्रमांकावर असून, चहाच्या खपाचे प्रमाण वर्षाकाठी ८० कोटी किलो एवढे आहे. तसेच भारतातून सर्वाधिक प्रमाणात चहाची निर्यात होते. आपल्या सर्वांचे आवडीचे पेय चहा ही ब्रिटीशांची देण आहे, हे आपणास माहित आहे का?



असा लागला चहाचा शोध

चहाच्या शोधामागे एक रंजक कथा आहे. या कथेनुसार ख्रिस्तपूर्व २७३ मध्ये प्राचीन चीनच्या एका प्रांताचा राजा शेनॉग एकदा दुपारी बागेत विश्रांती घेत असतांना वार्‍याच्या झुळकेने काही पाने त्याच्या पाण्याने भरलेल्या तबकात येऊन पडली. काही वेळाने पाण्याचा रंग बदलला. राजाला कुतूहल वाटले. त्याने ते पाणी पिऊन पाहिले. त्याबरोबर त्याला तरतरी आली. इथूनच चहाचा शोध लागला. दुसर्‍या एका कथेनुसार चहाचा शोध साधारण ख्रिस्तपूर्व १५०० ते १०४६ लागला. चीनमध्ये शेंग राजघराण्याने औषधी पेय म्हणून चहा वापरायला सुरुवात केली आणि चहाचा शोध लागला. चीनमधून चहा बिटनला गेला व त्यानंतर त्याचा प्रसार संपूर्ण जगभरात झाला.

म्हणून चहा भारतात...

चहा हे ब्रिटिशांचे पेय मानले जात असले तरी त्याचे मूळ चीनशी जुळलेले आहे. चीन आणि भारतात प्राचीन काळापासून व्यापार होत असला तरी चीनचा चहा आपल्या भारत देशात पोहचण्यासाठी १७-१८ वे शतक उजाडावे लागले. त्याला ब्रिटीश कारणीभुत आहेत. ब्रिटीशांनी चहा भारतात आणला. बिटीशांच्या या शोधामागे खूप मोठे आर्थिक गणित दडलले आहे. त्या काळी चहा निर्मितीत चीनची मोठी मक्तेदारी होती. ब्रिटीशांना चीन कडून चहा खरेदीसाठी मोठी रक्कम मोजावी लागत होती. अनेकवेळा चीनी ब्रिटीशांची अडवणूक करायचे, चीनची ही मक्तेदारी मोडून काढण्यासाठी ब्रिटीशांनी भारतात चहा लागवडीला प्राध्यान्य दिले. त्यानंतर दिडशे-दोनशे वर्षांनंतर ब्रिटीश भारत सोडून गेले. परंतु, त्यांनी भारतात आणलेला चहा मात्र येथेच राहिला. आज चहा भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होऊन बसला आहे. आज भारत चीननंतरचा म्हणजे दुसर्‍या क्रमांकाचा चहा उत्पादक देश आहे. 

दोन गोर्‍या भावांचे मोठे योगदान

उपलब्ध माहितीनुसार, आसाममधील सिंगफो जमातीचे लोक चहाशी साधर्म्य असणारे एक पेय अनेक वर्षांपासून पीत हाते. रॉबर्ट ब्रूसने या इंग्रज अधिकार्‍याने त्या पेयाची चव घेतल्यानंतर ती चहाशी मिळतीजुळती आहे, असे त्याच्या लक्षात आले. त्याचा शोध घेण्यासाठी त्याने पाठपुरावा सुरु केला मात्र दरम्यानच्या काळात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर रॉबर्टचा भाऊ चार्ल्सने पुढे पाठपुरावा केला. चीनमधून आणलेल्या चहाच्या बिया भारतात रुजत नव्हत्या मात्र या दोन्ही गोर्‍या इंग्रज भावांमुळे चहाच्या बियांची नवी जात सापडलली. त्यानंतर १८४० नंतर खर्‍या अर्थाने आसामध्ये चहाचे व्यावसायिक उत्पादन घेण्यास सुरुवात झाली. याचे श्रेय गोर्‍या इंग्रज भावांनाच जाते.

भारतात उत्तम दर्जाचा चहा

ईशान्येकडची राज्ये ही चहा उत्पादक म्हणून प्रसिद्ध आहेत. यात आसाम, नागालॅण्ड, मणिपूर, त्रिपुरा इत्यादी राज्यांचा समावेश आहे. आसाम या सर्वात पुढे आहे. कारण, गेल्या १८० वर्षांपासून आसामात चहाचे मळे बहरत आहेत. म्हणूनच आसामला भारतातील चहाचे उगमस्थानच समजले जाते. आज भारतात दार्जिलिंग, आसाम, पश्चिम बंगाल, तामीळनाडू आणि केरळमध्ये चहाच्या महत्त्वाच्या बागा आहेत. इथे सगळीकडेच उत्तम दर्जाचा चहा तयार होतो आणि या चहा उत्पादकांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. भारतातून उत्पादन होणार्‍या एकूण चहापैकी ५१ टक्के तर जगभरातील चहाच्या उत्पादनात आसामचा वाटा सुमारे १३ टक्के आहे. 

आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा करण्यामागे भारताची भूमिका महत्त्वाची 

जगभरातील चहा उत्पादक देश २००५ पासून दरवर्षी १५ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा करत होते. कारण तोपर्यंत याला संयुक्त राष्ट्राने मान्यता दिली नव्हती. या संदर्भात, भारत सरकारने एक मोठा पुढाकार घेतला आणि संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या माध्यमातून २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय चहा दिवस अधिकृतपणे साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला. जे स्वीकारले गेले. त्यानंतर आता २१ मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजारा केला जातो.

Post a Comment

Designed By Blogger