काश्मीर पंडित आजही असुरक्षित

काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची जम्मू आणि काश्मीरमधील बडगाम येथील तहसील कार्यालयात दहशतवाद्यांनी हत्या केली. राहुल भट्ट यांच्या हत्येविरोधात शुक्रवारी बडगाममध्येही निदर्शने झाली. राहुल भट्ट यांच्या हत्येबाबत लोकांमध्ये संताप आहे. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे काश्मिरी पंडितांचे म्हणणे आहे. निदर्शनात महिलांचाही सहभाग आहे. कलम ३७० हटविल्यानंतर काश्मीर शांत होईल, अशी अपेक्षा होती. मात्र काही दिवसांच्या शांततेनंतर काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा तोंड वर काढले आहे. १९ जानेवारी १९९० चा दिवस काश्मीरी पंडीतांसाठी काळा दिवस मानला जातो. कारण त्या दिवशी जे झालं त्याच्या जखमा आजही भरलेल्या नाहीत. नुकताच प्रदर्शित झालेल्या द कश्मीर फाईल्स या चित्रपटात काश्मीरी पंडीतांवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडण्यात आली आहे. तेंव्हाची परिस्थिती वेगळी होती, असे सांगितले जाते. मात्र गत काही दिवसांपासून सुरु असलेल्या काश्मीरी पंडीतांच्या हत्यांना काय म्हणावे? ३२ वर्षांनंतरही काश्मीर खोर्‍यातील हिंदू असुरक्षित आहे, हे गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या हत्यांवरुन अधोरेखीत होत आहे. मोदी सरकारने या विषयी ठोस भुमिका घेवून काश्मीर पंडितांना सुरक्षिततेची हमी व विश्‍वास देण्याची आवश्यकता आहे.काश्मीर पुन्हा एकदा अशांततेच्या मार्गावर 

विशेष दर्जा देणारे ३७० कलम हटवून केंद्रशासित प्रदेश बनविण्याच्या निर्णयानंतर तुलनेने शांत भासणार्‍या जम्मू-काश्मीरमध्ये विशेषतः काश्मीर गेल्या काही दिवसांपासून दहशतवादाने पुन्हा डोके वर काढले आहे. यात प्रामुख्याने काश्मिरी पंडीतांसह आणि बिगर काश्मिरी नागरिकांचे वेचून हत्याकांड झाल्यामुळे पलायनही सुरू झाले आहे. आतापर्यंत सैनिकांवर आणि पोलिसांवर हल्ले होत होते. मात्र आता सामान्य माणसावर हल्ले व्हायला सुरुवात झाल्याचे चित्र या घटनेच्या निमित्ताने दिसून आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानकडून काश्मीरमध्ये घातपाती कारवाया करण्याचे डाव आखले जात होते. हे सर्व डाव भारतीय सैन्याने हाणून पाडले. त्यानंतरही कुठल्या ना कुठल्या मार्गाने अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे चित्र आहे. कलम ३७० रद्द करण्याच्या बेधडक केंद्रीय कृतीने धक्का बसलेले स्थानिक असंतुष्ट आधी दोन पावले मागे गेले. भारतीय सैनिकांच्या कणखर कारवाईने हिंसाचारातही घट झाली. अलीकडे मात्र सामान्य नागरिकांना लक्ष्य करून असंतोष उफाळून आणण्याची खेळी खेळली जात आहे. दहशतवाद्यांची ही खेळी प्रचंड घातक असून यामुळे काश्मीर पुन्हा एकदा अशांततेच्या मार्गावर दिसून येत आहे. काश्मिरातील हिंसाचाराने पुन्हा डोके वर काढले आहे. श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील दहशतवादी सामान्य लोकांना लक्ष्य करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषतः बिगर मुस्लिम आणि बिगर काश्मिरींना लक्ष्य केले जात आहे. सुरक्षा दलांकडून वाढता दबाव आणि जनतेचा पाठिंबा कमी झाल्यामुळे, दहशतवादी आता त्यांची उपस्थिती सिद्ध करण्यासाठी निरपराधांचे रक्त सांडत आहेत. काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्थिरता निर्माण करण्यासाठी मोठे षड्यंत्र रचले गेले आहे. या अंतर्गत सुमारे २०० लोकांना लक्ष्य करून त्यांची हत्या करण्याची तयारी करण्यात आल्याची माहिती काही महिन्यांपुर्वीच समोर आली होती. त्यामध्ये सरकारशी जवळीक असणारे, माध्यम व्यक्ती, काश्मिरी पंडित आणि सुरक्षा दलांच्या संपर्कात असलेले लोक आहेत. बिगर मुस्लिम आणि बिगर काश्मिरींना लक्ष्य केले जात आहे. आयएसआयच्या सांगण्यावरून हा कट रचण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आयएसआयने गेल्या दीड वर्षात अनेक नवीन संघटना निर्माण झाल्या आहेत. 

आरएसएस आणि भाजपाशी संबंधित लोकांना लक्ष्य

संघटना दहशतवाद्यांना सामान्य लोकांना लक्ष्य करण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे जेणेकरून दहशत पसरली जाईल. आरएसएस आणि भाजपाशी संबंधित लोकांनाही लक्ष्य केले जात आहे. त्याचबरोबर इतर राज्यांच्या लोकांनाही विनाकारण लक्ष्य केले जात आहे. एकंदरीत गेल्या दीड -दोन वर्षात काश्मीर विकासाच्या प्रवाहात येतांना दिसत असल्याने पाकिस्तान समर्थक दहशतवाद्यांनी त्यांची रणणीती बदलल्याचे दिसते. मागील काही आठवड्यांपासून काश्मिरातील गैरकाश्मिरी हिंदूंना वेचून ठार करण्याची दहशतवाद्यांची ही कृती भयावह आहे. हे दहशतवाद्यांचे आव्हान कठोरपणाने मोडून काढावे लागेल. प्रसंगी पाकिस्तानलाही त्याच्या या चिथावणीची किंमत मोजायला लावायला हवी. जम्मू आणि काश्मीर येथील जनजीवन कधीही सुरळीत होऊ नये, तेथील हिंदू-मुस्लिमांतील तेढ वाढतच राहावी, असे दहशतवाद्यांना वाटते. त्यांचे हे मनसुबे यशस्वी होता कामा नयेत. तिथला दहशतवाद निपटणे, यालाच प्राथमिकता हवी. मध्यंतरी पाकिस्तानने शांततेची भाषा सुरु केली होती. मात्र या हल्ल्यांच्या निमित्ताने पाकिस्तानने काश्मीरमध्ये उपद्रवी कारवाया सुरुच ठेवल्याचे सिद्ध होत आहे. यामुळे भारतालाही आता स्वत:ची रणणीती बदलावी लागेल. आज तीन दशकांनंतर पुन्हा एकदा संपूर्ण काश्मीर खोर्‍यात भयाण शांतता आहे. अज्ञात भीती नागरिकांच्या मनात आहे. गेल्या आठवडाभरात काश्मीर खोर्‍यात दहापेक्षा जास्त नागरिकांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं आहे. त्यातले बहुतांश हिंदू होते. श्रीनगरमध्ये आश्रय घेतलेले इस्लामी दहशतवादी आपला संदेश पोहोचवण्यासाठी सॉफ्ट टार्गेट्सना लक्ष्य करत आहेत.  काश्मिरियतच्या नावाखाली अनेकदा ढोंग केलं जातं. काश्मिरियत हा एक प्रकारे खोटी बंधुता दाखवण्यासाठी आणि त्याखाली इस्लामी मूलतत्त्ववादी विचारसरणी व काश्मीर खोर्‍यातले हिंदू, शीख यांच्यावर केल्या जाणारा दहशतवाद दडवण्यासाठी वापरला जाणारा शब्द आहे, असे आता वाटू लागले आहे. हिंदू आणि शीखांच्या अंत्यसंस्कारांवेळीच मीडियातल्या पब्लिसिटी स्टंटसाठी काश्मिरियत दिसते. मुस्लिमेतरांना गेल्या तीन दशकांप्रमाणेच आजही लक्ष्य केलं जात आहे, हे कटू सत्य नाकारता येणार नाही!

Post a Comment

Designed By Blogger