स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे नुकतेच निधन झाले. लतादीदींनंतर प्रसिद्ध बंगाली गायिका संध्या मुखर्जी यांच्या निधनाची बातमी आली आणि आता हिंदी कलाविश्वात डिस्कोवर आधारित संगीत साकारत सर्वांनाच आपल्या तालावर थिरकायला भाग पाडणारे संगीतकार, गायक बप्पी लहरी यांनी जगाचा निरोप घेतला आहे. बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पण यापैकी काही कलाकार असेही आहेत जे ट्रेंड सेटर ठरले आहेत. अशाच ट्रेंड सेटरपैकी प्रसिद्ध एक नाव म्हणजे बप्पी लहिरी! बुधवारी बप्पी लहरी यांनी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून बप्पी लहिरी यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर मुंबईतील क्रिटी केअर या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. डिस्को बीट्सवरची उडत्या चालींची गाणी हे बप्पीदांचे वैशिष्ट्य होते. डिस्को डान्सर सिनेमातले ‘आय अॅम अ डिस्को डान्सर’ थानेदार सिनेमातले ‘तम्मा - तम्मा’, द डर्टी पिक्चरमधलं ‘ऊलाला ऊलाला’, साहेब मधले ‘यार बिना चैन कहाँ रे’ ही गाणी गाजली. २०२० साली आलेल्या बागी ३ सिनेमामधले ‘भंकस’ हे त्यांचे शेवटचे गाणे ठरले. संगित विश्वातील सितारे एकामागून एक जग सोडत असल्याने देवाने स्वर्गात स्वरमैफिल तर भरविली नाही ना? असा प्रश्न संगितप्रेमींना पडल्याशिवाय राहणार नाही.
बप्पी लाहिरी यांच्या डिस्कोच्या तालावर संपूर्ण देश थिरकत होता
बप्पी लाहिरी यांचे मूळ नाव अलोकेश लाहिरी. त्यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५२ रोजी पश्चिम बंगालमधील जलपायगुडीमध्ये झाला होता. त्यांचे आई-वडील अपरेश लाहिरी आणि बन्सुरी लाहिरी हे दोघेही बंगाली गायक, तर शास्त्रीय आणि श्यामा संगीतातील संगीतकार होते. वयाच्या चौथ्या वर्षी लता मंगेशकर यांच्या एका गाण्यात तबला वाजवून बप्पीदा प्रसिद्ध झाले होते. १९७३ मध्ये त्यांनी ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटातून आपल्या करियरची सुरुवात केली. १९७६ मध्ये आलेल्या विशाल-आनंद यांच्या ‘चलते-चलते’ चित्रपटातून बप्पी दा यांना ओळख मिळाली. बप्पी लहरी यांनी बॉलिवूडमध्ये मोठा पल्ला पार केला आहे. ५०० पेक्षा जास्त गाणी त्यांनी कंपोज केलीत आणि स्वत:साठी एक लीजंड किताब मिळवला आहे. पॉप म्युझिकला बॉलिवूडचा एक महत्वाचा भाग बनवण्याचे श्रेय बप्पी लहरी यांना जाते. ८० च्या दशकात बप्पी लाहिरी यांच्या डिस्कोच्या तालावर संपूर्ण देश थिरकत होता. त्यामुळे त्यांना डिस्को किंग असे म्हटले जात होते. बॉलीवूडमध्ये संगीत डिजीटल बनवण्यात बप्पीदा यांचे मोठे योगदान होते. बप्पी लाहिरी यांनी जवळपास पाच दशकांपेक्षा अधिक काळ संगीत क्षेत्रात काम केले. १९७० आणि ८०च्या दशकातल्या अनेक चित्रपटांना बप्पी लाहिरींनी संगीत दिले होते. चलते - चलते, डिस्को डान्सर, शराबी, नमकहलाल या सिनेमांमधली त्यांची गाणी गाजली. शराबी चित्रपटासाठी बप्पी लहरी यांनी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. तसेच त्यांना फिल्मफेअरतर्फे जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. १९९०मध्ये बप्पी लाहिरींनी ‘डोक्याला ताप नाही’ नावाच्या मराठी सिनेमाला संगीत दिले होते. तर २०१८ साली ते एका मराठी सिनेमासाठी गायले. ८० आणि ९० च्या दशकात बप्पी लाहिरी यांचा प्रचंड दबदबा होता. बप्पी दा यांनी राजकारणातही नशीब आजमावले होते. २०१४ मध्ये त्यांनी भाजपत प्रवेश केला. बप्पीदा यांना श्रीरामपुर जागेवरून २०१४ च्या निवडणुकीत मैदानात उतरवण्यात आले होते. मात्र, त्यांचा पराभव झाला होता.
गाण्यातील वेगळेपण आणि दुसरे सोने
बप्पी लहिरी यांचे नाव नेहमी दोन गोष्टींशी जोडण्यात आले आहे. एक गाण्यातील वेगळेपण आणि दुसरे सोने! बप्पीदांचे सोन्याप्रति असलेले प्रेम सर्वांनाच माहित आहे. बप्पी दा गळ्यात आणि हातात भारी भक्कम ज्वेलरी घालत असत. बप्पी लहरी सोन्याला त्यांच्यासाठी लकी मानत होते. अंगावर भारी भक्कम सोनं घालण्याविषयी एकदा एका मुलाखतीत त्यांनी त्यामागचे रहस्य सांगितले होते. ते म्हणाले होते कि, ‘मला हॉलिवूड कलाकार एल्विस प्रेस्ली फार आवडत होता. मी पाहिले होते की, तो नेहमी एक सोन्याची चेन घालत होते. मी त्यांच्या या अंदाजाने इम्प्रेस झालो होतो. एल्विस प्रेस्लीला बघून मी ठरवले होते की, जास्त सक्सेसफुल बनून राहतील. त्यावेळी मी सोने घालेल.’ तेंव्हापासून शेवटच्या क्षणापर्यंत सर्वांनी त्यांना सोन्यात मढलेलेच पाहिले आहे. २०२० मध्ये एप्रिल महिन्यात बप्पी लाहिरी यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यांना सौम्य लक्षणे होती. ब्रिच कँडी रुग्णालयात काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मातही केली होती. मात्र झोप पूर्ण न झाल्यामुळे होणार्या एक आजारामुळे त्यांची प्राणज्योत मालवली आहे. बप्पी लाहिरी यांच्या पश्चात पत्नी चित्रानी लाहिरी आणि त्यांची मुलगी - गायिका रेमा लाहिरी बन्सल असा परिवार आहे. भारतात डिस्को म्युझिक आणणारे म्हणजेच बप्पीदा अशी त्यांची खास ओळख होती. त्यांनी १९८० ते २००० या तीन दशकात आपल्या संगीताने लोकांना भारावून टाकले. किशोर कुमार, लता दीदी, आशा ताई, उषा उथुप, सुरेश वाडकर, सुदेश भोसले या अनेक गायकांसोबत काम केले. बप्पी दा यांच्या आवाजाचे आजही लाखो फॅन्स आहेत. आजही त्यांच्या गाण्यांवर संपूर्ण जग थिरकते. बप्पीदा हे बॉलिवूडमधील पहिले सिंगर आहेत की, त्यांनी प्रसिद्ध पॉप सिंगर मायकल जॅक्सनला आपल्या शोमध्ये निमंत्रित केले होते. त्यांच्या जाण्यानी रेट्रो म्युझिकचे पर्व संपलेले आहे असचे म्हणावे लागेल. यांच्या निधनामुळे तात्पुरता जरी हा स्वर निःशब्द आणि शांत झाला असला तरी त्यांच्या हजारो गाण्यांच्या माध्यमातून हा स्वर यापुढेही कायमच गुंजत राहणार आहे यात शंका नाही. हजारो रसिकांच्या मनावर राज्य करणार्या या महान ट्रेंड सेटरला भावपूर्ण श्रद्धांजली.
Post a Comment