भारतीयांनो सावधान!

कोरोनाचा जन्म चीनमध्ये झाल्यानंतर कोरोनाची पहिली लाटा अमेरिका व युरोपमध्ये धुमाकुळ घातल्यानंतर भारतात येवून धडकली. ही लाट भारतात काहीशी नियंत्रणातच राहिली. मात्र त्याचवेळी दुसर्‍या लाटेने अमेरिका व संपूर्ण युरोपमध्ये हाहाकार माजविला. भारतात परिस्थिती सामान्य होत असतांना दुसरी लाट भारतातही धडकली. या लाटेने लाखों लोकांचा जीव घेतला. ही दुसरी लाट इतकी भयावह होती की त्याची आठवण देखील काढली की अंगावर काटा उभा राहतो. देशात लसीकरणाचा वेग वाढल्यानंतर कोरोनाचा वेग मंदावला. आता महाराष्ट्रासह देशातील कोरोना नियंत्रणात आला आहे. ही निश्‍चितपणे आनंदाची बाब आहे. मात्र याचवेळी कोरोनाने युरोपला पुन्हा विळखा घातला आहे. युरोप पुन्हा महामारीचा केंद्रबिंदू बनला आहे. जगातल्या रुग्णसंख्येच्या जवळपास निम्मी रुग्णसंख्या तसेच मृत्यू युरोपतले आहेत. संक्रमणाच्या चौथ्या लाटेने युरोपची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीला राष्ट्रीय आपत्कालीन स्थितीत आणले आहे. ऑस्ट्रिया कोरोना विषाणूच्या नवीन लाटेला तोंड देण्यासाठी लॉकडाउन पूर्णपणे पुन्हा लादणार आहे. ऑस्ट्रियाच्या पूर्ण लॉकडाऊनपासून ते नेदरलँड्समधील आंशिक लॉकडाउनपर्यंत अनेक युरोपीय सरकारांनी निर्बंध पुन्हा लादण्यास सुरुवात केली आहे आणि जर्मनी, झेक प्रजासत्ताक आणि स्लोव्हाकियाच्या काही भागांमध्ये लसीकरण न केलेल्यांवर निर्बंध आहेत. या सगळ्या परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर भारतानेही लवकरच सावध होऊन कोरोना रुग्णसंख्या अधिक वाढणार नाही ना याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी लसीकरण पूर्ण करुन घेण्यासह मास्क वापरणे, स्वच्छता राखणे, सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचे स्वयंप्रेरणेने पालन करणे आवश्यक आहे.



अनेकांना दुसर्‍या डोसचा विसर

दिवाळीपूर्वी राज्य सरकारकडून कोरोनाचे एक-एक निर्बंध शिथिल करण्यात आले. शाळा-महाविद्यालये, धार्मिक स्थळे, रेस्टॉरंट, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मुंबई लोकल, आता रेल्वेसेवा देखील पुर्ववत होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे आता देशात खर्‍या अर्थाने कोरोनापूर्व काळातील स्थिती झाली झाली आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. राज्यासह देशभरात कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होत असल्याने सर्व बंधने उठवली जात असली तरी कोरोना विरुध्दची लढाई अजूनही संपलेली नाही, याचे सर्वांनी भान ठेवायला हवे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनंतर कोरोनाचे म्यूटेशन झाले नसून नवा व्हेरिएंटही आलेला नाही. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले जात असले तरी, देशात लसीकरणाचा वेग काहिसा मंदावलेला दिसून येत असल्याने आरोग्य व प्रशासकीय यंत्रणांचे टेन्शन वाढू लागले आहे. पहिला डोस घेतलेल्यापैकी अनेकांना दुसर्‍या डोसचा विसर पडला असल्याचे आकडेवारी सांगते. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असून, पॉझिटिव्हिटी दर कमी होत असल्याने एकप्रकारे दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने कोरोनाबाबत जिल्हावार आढावा घेऊन बिगिन अगेनचा नारा दिला आहे. एप्रिल आणि मे महिन्यास संपूर्ण देशात धुमाकूळ घालणारी, कोट्यवधी जणांना बाधित करणारी आणि लाखो जणांचा बळी घेणारी कोरोना विषाणूची दुसरी लाट आता बर्‍यापैकी ओसरल्याचे चित्र आहे. दहीहंडी, ईद, गणेशोत्सव, नवरात्री, दसरा, दिवाळीसारखे महत्वाचे सण पार पडल्यानंतरही गत आठवड्यात समोर आलेल्या कोरोनाच्या आकडेवारीमुळे संपूर्ण देशाला दिलासा मिळण्याची शक्यता दिसू लागली आहे. महाराष्ट्रातही दोन-तीन जिल्हे वगळता बहुतांश जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात दिसून येत आहे. आगामी काही दिवस आव्हाने कायम राहणार आहेत. मात्र राज्य सरकारच्या निर्णयानंतर आता शाळा महाविद्यालये गजबजणार आहेत. पण विद्यार्थी दीड वर्षाहून अधिक काळ घरात आहेत. शाळा, महाविद्यालये सुरु होणे आणि मोठ्या कालावधीनंतर शाळेत जाणे हा विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा क्षण असला तरी कोरोना वाढण्याचा धोकाही आहे. यामुळे येणार्‍या काळात प्रत्येकाला जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. 

युरोपात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर.....

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यासारखे आशादायक चित्र जरी दिसत असले, तरी अजूनही धोका टळलेला नाही. पहिली लाट ओसरत असतांना लोकांनी मुक्त वातावरणात आपली कामे करण्यास सुरुवात केली. लोक काहींसे निर्धास्त झाल्यासारखे वागत होते. त्यांना मास्क वापरणे नकोसे वाटू लागले होते. पहिली लाट ओसरत असतांना जी चूक झाली तीच चूक आता पुन्हा व्हायला नको. मी लस घेतली आहे, आता मला कोरोनाची काय भीती? अशा आविर्भावात वावरणे निश्चितपणे धोकादायक आहे. आताही कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली असली तरी कोरोनाचा धोका संपलेला नाही. उलट आपण जेवढे बेफिकिरपणे वागू तेवढा कोरोना आपल्या जास्त जवळ येणार आहे. देशात विक्रमी वेगाने लसीकरण होतेय, ही जमेची बाजू आहे. यामुळे कोरोनाविरुध्दच्या लढाईत मोठे यश मिळतांना दिसत असले तरी कोरोनाचा लढा अजून संपलेला नाही. महत्वाचे म्हणजे दुसरा डोस घेण्यासाठी होणारी टाळाटाळ ही धोक्याचीच घंटा म्हणावी लागेल! ही लढाई दीर्घकालीन निश्चितच आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. महाराष्ट्रात खरोखरच कोरानाचा आलेख खाली येत आहेत हे निश्चितच चांगले संकेत असून रुग्णसंख्या घटविण्यासाठी या स्थितीत जिल्हा आणि राज्य पातळीवर सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. तरच कोरोनाला अटकाव करता येईल, आताही आपण गाफिल राहिलो तर तिसरी लाट आल्याशिवाय राहणार नाही. आजवरचा अनुभव पाहता युरोपमध्ये धुमाकुळ घतल्यानंतर कोरोना भारतात हातपाय पसरतो. आता सध्यस्थितीला कोरोनाची चौथी लाट संपूर्ण युरोपला विळखा घालून बसली आहे. यामुळे ती तिसर्‍या लाटेच्या रुपाने भारतात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आपल्याकडे सर्वजण पूर्णपणे निर्धास्त व बेफिकीर झाल्याचे दिसून येत आहेत. जणू काही कोरोना नष्टच झाला आहे. या आविर्भावात जवळपास सर्वांनी आपला जीवनक्रम सुरु केला आहे. ही खरी धोक्याची घंटा म्हणावी लागेल. कारण गत दोनवेळेचा अनुभव असाच काहिसा आहे. यामुळे किमान आता तरी भुतकाळात झालेल्या चुका टाळता येवू शकतात. युरोपात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर भारतानेही लवकरच सावध होऊन कोरोना रुग्णसंख्या अधिक वाढणार नाही ना याची काळजी घेणे आवश्यक आहे. 

Post a Comment

Designed By Blogger