टीम इंडियाचा कर्णधार व रन मशिन विराट कोहलीला ओळखत नाही? असा एकही क्रिकेट प्रेमी संपूर्ण जगाच्या पाठीवर शोधून देखील सापडणार नाही. सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी या खेळाडूंनंतर विराट असा खेळाडू आहे ज्याने भारतीय क्रिकेट संघाला मजबुती दिली आणि आपले स्वतःचे स्थान निर्माण केले. इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल म्हणजे आयसीसीने दशकातील सर्वोत्तम खेळाडूंची नावे जाहीर केली. यात टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीला सर्वात प्रतिष्ठेचा दशकातला सर्वोत्तम खेळाडूसाठी देण्यात येणारा सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर दशकातील सर्वोत्तम वन-डे खेळाडू म्हणून देखील विराटचीच निवड झाली आहे. आयसीसी पुरस्कारांच्या या कालावधीत कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. यासह त्याने या काळात सर्वाधिक शतके आणि सर्वाधिक अर्धशतकाही ठोकले आहेत. या दशकात कोहलीच्या फलंदाजीमध्ये २०,३९६ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये ६६ शतके आणि ९४ अर्धशतकांचा समावेश होता. विराट कोहलीने हे संपूर्ण दशक त्याच्या बॅटिंगने गाजवले आहे.
उजव्या हाताने फलंदाजी करणार्या कोहलीचा जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून उल्लेख केला जातो. आज विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असून तरुणाईचा युथ आणि स्टाईल आयकॉन आहे. ५ नोव्हेंबर १९८८ ला दिल्ली येथील एका पंजाबी कुटुंबात जन्मलेला विराट जेंव्हा अवघ्या तीन वर्षांचा होता अगदी तेंव्हापासून त्याच्या आवडत्या खेळांमध्ये क्रिकेट फार आवडीचा खेळ होता. तो जसा-जसा मोठा होत गेला, क्रिकेटची त्याची आवड वाढत गेली. त्याच्या वडीलांनी त्याचा क्रिकेटकडचा कल ओळखला होता, ते त्याला रोज क्रिकेट प्रशिक्षणासाठी घेऊन जात असत. शिक्षणात सर्वसामान्य विद्यार्थी असणार्या विराटचे संपूर्ण लक्ष कायम क्रिकेटकडेच होते. त्यामुळे त्याच्या वडिलांनी देखील त्याची आवड पहाता अवघ्या ९ व्या वर्षी त्याला क्रिकेट क्लबमधे पाठविण्यास सुरुवात केली. विराटने १२वी पर्यंत शिक्षण घेऊन त्यानंतर आपले पूर्ण लक्ष क्रिकेट वर केंद्रित केले. त्याच्या मेहनतीने रंग दाखविला व २००२ मधे अंडर-१५ स्पर्धा तो खेळला. त्यानंतर २००६ साली त्याची निवड अंडर-१७ मधे झाली. त्यानंतर त्याच्या खेळात मोठा बदल अनुभवायला मिळाला, २००८ ला विराट ची निवड अंडर-१९ करता झाली. विराटची अंडर-१९ विश्वकप स्पर्धा मलेशिया इथे पार पडली आणि या स्पर्धेत त्याने भारताला विजय मिळवून दिला. या सामन्या नंतर विराटची निवड वन डे आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरता झाली होती. त्यानंतर २०११ ला त्याला क्रिकेट विश्वकप खेळण्याची सुवर्ण संधी मिळाली आणि त्यात देखील भारताला विजय मिळाला. २०११ साली विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले. नंतर त्याने एकदिवसीय सामन्यात ६ व्या स्थानावर फलंदाजीस सुरुवात केली. त्या दरम्यान त्याला दोनदा पराजयाचा देखील सामना करावा लागला परंतु आपल्या पराजयाने तो कधीही खचला नाही किंवा निराश देखील झाला नाही. उलट तो पराजयातून शिकत गेला आणि आपल्या खेळात तो अधिकाधिक उत्कृष्ट बनत गेला.
रेकॉर्ड बनविणारा सर्वात वेगवान भारतीय खेळाडू
२०१२ मध्ये कोहलीची भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्ती झाली. त्याने अनेकदा कर्णधार महेन्द्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारीही पार पाडली. धोनी यांची क्रिकेटमधून निवृत्ती झाल्यानंतर, २०१४ मध्ये कोहली भारतीय संघाचे कर्णधार झाला. विराट कोहली हा खेळाडू १०००, ३०००, ४०००, आणि ५००० धावांचा रेकॉर्ड बनविणारा सर्वात वेगवान भारतीय खेळाडू आहे. शिवाय रिचर्ड समवेत रेकॉर्ड ची तुलना करता विराट ५००० धावा काढणारा सर्वाधिक वेगवान आंतरराष्ट्रीय खेळाडूंपैकी देखील एक ठरला आहे. सलग चार कॅलेंडर वर्षांत प्रत्येक वर्षी किमान १००० धावा करणारा तो जगातील केवळ दुसरा फलंदाज आहे. विराट हा तिन्ही खेळाच्या प्रकारात धावांचा वर्षाव करतो म्हणून त्याला ‘विराट द रन मशीन’ म्हटले आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून तो खेळतो. २०१३ पासून तोे त्या संघाचा कर्णधार आहेत. कोहलीला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यात आयसीसी सर्वोत्कृष्ट एकदिवसीय खेळाडू २०१२ आणि २०११-१२ व २०१४-१५ साठीचा बीसीसीआय आंतरराष्ट्रीय क्रिकेटरचा पुरस्कारसुद्धा समाविष्ट आहे. २०१३ मध्ये त्याला त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. विराट कोहली याने मागील दहा वर्षात (२०११ ते २०२०) कसोटी, एक दिवसीय आणि टी-२० मध्ये मिळून २० हजार २९६ धावा फटकावल्या आहेत. यात त्याच्या ६६ शतकांचा आणि ९४ अर्धशतकांचा समावेश आहे. २०११ मध्ये टीम इंडियाने जिंकलेल्या एक दिवसीय वर्ल्डकप संघाचा तो सदस्य होता.
दशतकातील सर्वोत्तम खेळाडू
मागील दहा वर्षात फक्त एक दिवसीय क्रिकेटचा विचार केल्यास त्याने ६१.८३ च्या सरासरीने १० हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. यात त्याच्या ३९ शतकांचा आणि ४८ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने ११२ झेलही घेतले आहेत. त्यामुळे एकूण चार गटातील पुरस्कारासाठी त्याला नामांकन मिळाले होते. दशतकातील सर्वोत्तम खेळाडू, दशकातील सर्वोत्तम टेस्ट खेळाडू आणि दशकातील सर्वोत्तम वन-डे खेळाडू, दशकातील सर्वोत्तम टी-२० खेळाडू अशा चार गटात विराटला नामांकन मिळाले होते. त्यापैकी दोन पुरस्कार विराटला मिळाले आहेत. या पुरस्कारासाठी ऑनलाईन पद्धतीने निवड करण्यात आली आहे. आयसीसीने ट्विटरवर गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन व्होटिंग पद्धत सुरु केली होती. या ऑनलाईन पद्धतीने नामांकन मिळालेल्या आपल्या आवडत्या खेळाडूला मतप्रक्रिया सुरु ठेवली होती. यात विराटच अव्वल ठरला. यापूर्वी विराटचा दशकातील तीन्ही फॉरमॅटमधील सर्वोत्तम टीममध्ये समावेश करण्यात आला होता. तीन्ही टीममध्ये समावेश झालेला विराट हा एकमेव खेळाडू आहे. विराट कोहली याच्यासह टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि खेळाडू महेंद्रसिंग धोनी याला ‘स्पिरिट ऑफ क्रिकेट अवॉर्ड ऑफ द डिकेड’ने पुरस्कार देण्यात आला. दशकातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून विराटची निवड होणे ही निश्चितपणे सर्व भारतीयांसाठी मोठ्या अभिमानाची बाब आहे. येणार्या २०२१ मध्ये विराटची बॅट अशीच तळपत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...
Post a Comment