अलीगड मुस्लिम विद्यापीठाला १०० वर्षे पूर्ण होत असल्याने आयोजित करण्यात आलेल्या शताब्दी सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली. पंतप्रधान मोदींच्या या उपस्थितीवरुन वादविवादाचा मोठा धुराळा उडाला. अर्थात त्यात आश्चर्य वाटण्याचे नवे असे काहीच नाही, काही धार्मिक मुस्लिम कट्टरपंथीयांनी अलीगड मुस्लिम विद्यापीठात आपला अड्डा जमविला असल्याने या विद्यापीठात भारताच्या फाळणीस कारणीभुत असणारे पाकिस्तानचे संस्थापक मोहंम्मद अली जीना यांचा उदोउदो करणे, भारतविरोधी नारे लावणे किंवा दहशतवादी कृत्यात सहभागी असणार्यांच्या समर्थनार्थ आंदोलने करणे, यासारख्या घटनांमुळे अलीगड मुस्लिम विद्यापीठाची नकारात्मक प्रतिमा तयार झाली आहे. निर्मितीपासूनच अलिगढ विद्यापीठ चर्चा, वाद-विवाद, चळवळी यांचे केंद्र राहिले आहे. अलिगढ विद्यापीठाबद्दल अनेक समज-गैरसमज समाजात रूढ आहेत. काहींच्या मते, द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताची बीजे अलिगढमध्ये रोवली गेली आहेत; तर काहींच्या मते, स्वातंत्र्यचळवळीत या विद्यापीठने मोठे योगदान दिले असून ते मुस्लिम समाजाच्या ज्ञानसाधनेचे महत्त्वाचे केंद्र ठरले आहे. एकूणच अलिगढ विद्यापीठाबाबत दोन टोकाची मते दिसून येतात.
विद्यापीठाला गौरवशाली इतीहास
शताब्दी वर्ष साजारे करणारे अलीगड मुस्लिम विद्यापीठ अलीकडच्या काही वर्षात नकारात्मक विषयांवरुन चर्चेत राहत असले तरी या विद्यापीठाला गौरवशाली इतीहास आहे. अलिगढने जागतिक कीर्तीचे विद्वान, इतिहासकार, राजकारणी, पत्रकार देशाला दिले. सरहद्द गांधी, डॉ.झाकीर हुसेन, जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला, इरफान हबीब, प्रख्यात गीतकार जावेद अख्तर ही त्यांपैकी काही प्रातिनिधिक नावे. ‘इन्कलाब झिंदाबाद’ या घोषणेचे निर्माते व पूर्ण स्वराज्याची मागणी काँग्रेसच्या व्यासपीठावरून पहिल्यांदा करणारे मौलाना हसरत मोहानी अलिगढ विद्यापीठातूनच शिकलेले होते. इतकेच नव्हे तर पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान व पाकिस्तानचा हुकुमशहा अयुब खान हे देखील याच विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. इतीहासाची पाने उलगडल्यास असे लक्षात येते की, विद्यापीठाच्या थिंकटँकमध्ये जीना यांचा मोठा वाटा होता अर्थात स्वातंत्र्यापूर्वी! जेंव्हा स्वातंत्र्याचे वारे वाहत होते तेंव्हा हे विद्यापीठ बाळसे धरत होते. त्याकाळी ‘डॉन’ या मोहम्मदअली जीना यांनी सुरू केलेल्या वर्तमानपत्रात अलिगढमधील बातम्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळत होती. त्याचे प्रमाण इतके वाढले की, पुढे ‘डॉन’ हे वृत्तपत्र अलिगढ विद्यापीठाचे मुखपत्रच बनले. तिथे होणार्या बैठका, कार्यक्रम यांच्यासाठी ‘अलिगढ न्यूज’ नावाने विशेष स्तंभ रोज प्रसिद्ध होत असे. जीना यांना १९३८ मध्ये अलिगढ विद्यार्थी संघाचे आजीवन सभासदत्व देण्यात आले आहे. जीना यांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या अलिगढ विद्यापीठाची विश्वसनीयता विभाजनानंतर ढासळणे नैसर्गिक होते.
‘मिनी भारत’ असे म्हणत एएमयूचा गौरव
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या विद्यापीठाला भारतीयांच्या रोषाला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागले. विद्यापीठावर लोकांनी हल्ला करू नये, म्हणून कुमाऊ बटालियनची एक तुकडी अलिगढ विद्यापीठ परिसरात वर्षभर तैनात करण्यात आली होती. विद्यापीठाचा अपराधभाव निघून जावा, म्हणून तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरूंनी या वेळी मोठी भूमिका पार पाडली. जानेवारी १९४८ मध्ये अलिगढ विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात त्यांनी केलेल्या भाषणात त्यांनी इतिहासात घडलेल्या चुकांची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली. स्वातंत्र्योत्तर काळात अलिगढ विद्यापीठाने आपली जुनी प्रतिमा बदलण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले व त्यात त्यांना मोठे यश मिळाले. अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या भिंतींवर देशाचा इतिहास कोरलेला आहे. येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी जगात देशाचे नाव उज्ज्वल करीत असतात. हिच बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा अधोरेखीत केली आहे. हे विद्यापीठ म्हणजे ‘मिनी भारत’ असे म्हणत त्यांनी एएमयूचा गौरव केला आहे. मागील शतकात मतभेदांच्या नावावर बराच काळ वाया गेला. आता आपण वेळ गमवायला नको. प्रत्येकाला एका ध्येयासोबत आत्मनिर्भर भारत घडवायचा आहे. समाजात वैचारिक मतभेद आहेत, पण जेव्हा राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करण्याची वेळ येते, तेव्हा मतभेद बाजूला सारायला हवे. हाच विचार आपली तरुण पिढी पुढे नेईल, तेव्हा असे कोणतेही उद्दिष्ट राहणार नाही, जे आपण साध्य करू शकणार नाही. राजकारणात समाजाची महत्त्वाची भूमिका आहे, हे आपल्याला समजून घ्यायला हवे. मात्र, समाजात राजकारणाशिवाय इतरही अनेक मुद्दे आहेत. राजकारण आणि सामर्थ्याच्या विचारांपेक्षा एखाद्या देशाचा समाज खूप मोठा असतो, अशा शब्दात पंतप्रधानांनी राष्ट्रवादाचे धडे दिले.
नव्या भारताची बीजे रोवली
नव्या भारताचे आणि येथील आधुनिक विचारांचे अलिगढ हे केंद्र बनले आहे. अलिगढ विद्यापीठातील मुस्लिम तरुणांची नवी पिढी स्वतःला धार्मिक चौकटीत मर्यादित करू इच्छित नाही. इतिहासाबद्दल ते अनभिज्ञ जरी नसले, तरी त्या इतिहासाचे जोखड वाहण्यास नव्या पिढीने साफ नकार दिला आहे. यामुळे मोजक्या कट्टरपंथियांच्या भुमिकेमुळे अलिगढ विद्यापीठ व त्यात शिकणार्या ३६००० विद्यार्थ्यांच्या देशभक्तीवर शंका उपस्थित करणे योग्य नाही. विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रांगणात होणार्या या राजकारणाला राजकीय पक्षदेखील तितकेच कारणीभूत आहेत. विद्यार्थ्यांचा उपयोग स्वत:चे हित साधण्यासाठी राजकीय पक्ष करतात आणि विद्यार्थी त्यांच्या भूलथापांना बळी पडतात. राजकीय विचारांवरून विद्यार्थ्यांचे गट पडतात, त्यातून संघटना निर्माण होतात आणि या संघटनांमधील वैचारिक मतभेद केवळ वैचारिक न राहता एकमेकांच्या जीवावर उठण्याइतपत हिंसक स्वरूप धारण करतात. काही जण राष्ट्रविरोधी कृत्येसुद्धा करू लागतात. जेएनयू व एएमयू बाबत असेच काहीचे घडतांना दिसते. भारत हा जगातील सगळ्यात मोठा युवकांचा देश आहे. भारतात ६५ टक्के युवकांची संख्या आहे, असे म्हटले जाते. युवा पिढीच्या क्षमतेवर, ताकदीवर भारत जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत आहे. अशात युवाशक्तीचा विधायक वापर करायला हवा. अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या मंचावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विषद केलेली भुमिकेतच नव्या भारताची बीजे रोवली जाणार आहेत.
Post a Comment