अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपला पराभव स्वीकारण्यास तयार नव्हते. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून ट्रम्प सातत्याने निवडणूक आणि मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत होते. डेमोक्रॅटिक पार्टीचे ज्यो बायडन यांनी बहुमताचा आकडा ओलांडल्यानंतरही सत्ता न सोडण्याचे संकेत ट्रम्प यांनी दिले होते. यामुळे अमेरिकेच्या इतीहासात प्रथमच सत्ता हस्तांतरणाचा तिढा निर्माण झाला होता. ट्रम्प यांनी न्यायालयाचा दरवाजा देखील ठोठावला परंतू तेथेही निराशाच पदरी आल्याने ट्रम्प यांनी दोन पाऊल मागे जात पराभव मान्य करत अखेर सत्ता हस्तांतरणाला हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे मागील काही दिवसांपासून अमेरिकेत सुरू असलेला सत्ता पेच सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ज्यो बायडन हे अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. तर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत. बायडन यांच्याकडून मंत्रिमंडळाची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे अमेरिकेत एका नव्या अध्यायाला प्रारंभ होईल.
सत्ता हस्तांतरणाला होकार
जगातील सर्वात शक्तीशाली राष्ट्र म्हणून ओळख असणार्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक यंदा अनेक कारणांनी वैशिष्ठपूर्ण ठरली. कोरोना व्हायरसपुढे अमेरिकेसारखी महासत्ता हतबल झाली असल्याच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक झाली. यात सर्वाधिक चर्चा झाली ती ट्रम्प यांच्या लहरीपणाची! निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांच्या सत्ताग्रहणासाठी अडथळे उभे करण्याचे प्रयत्न सुरू होते. ट्रम्प यांचा लहरी व आक्राळस्त स्वभाव पाहता ते सहजासहजी सत्ता सोडणार नाहीत, जाता जाता ते बायडन यांच्या मार्गात अनेक हडर्ल्स उभे करतील, संस्थात्मक बदल करतील, परराष्ट्र धोरणात विशेषत: चीन विरोधात आक्रमक भूमिका घेतील, अशी अटकळ बांधली जात होती. सत्ता हस्तांतरणाच्या वादात अमेरिकेवर एखादी युध्ददेखील लादले जाण्याची भीती तज्ञांनी वर्तवली होती. उत्तर कोरिया व चीन विरुध्द मोठी कारवाई करण्याचा निर्णय ट्रम्प घेवू शकतात, अशी शक्यता काही अमेरिकन माध्यमांनी वर्तवली होती. असे झाले असते तर अमेरिका काही वर्ष मागे फेकला गेला असता. यामुळे हा सत्तासंघर्ष टाळण्यासाठी त्यांचे जावाई व काही वरिष्ठ नेते त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आता त्यांनी शहाणपण सुचले असून राष्ट्राध्यक्षपदाच्या नावलौकीकास शोभणारी कृती करत सत्ता हस्तांतरणाला होकार देत प्रक्रिया सुरु केली आहे.
दोन खाती भारतीय वंशाच्या व्यक्तींकडे
अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आपल्या मंत्रिमंडळाची घोषणा केली आहे. बायडन यांच्या मंत्रिमंडळात विविध घटकांना प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे. कमला हॅरीस या उपराष्ट्रपती असणार असून त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती असणार आहे. तर, गुप्तचर विभागाची जबाबदारी पहिल्यांदाच महिलेकडे सोपवण्यात आली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याची धुरा एंटनी ब्लिंकेन यांच्याकडे असणार आहे. ब्लिंकेन हे ओबामा यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात राजनयिक अधिकारी होते. बायडन यांच्या निवडणूक प्रचार मोहिमेत त्यांनी परराष्ट्र धोरणाचे सल्लागार म्हणूनही काम केले. ब्लिंकेन हे कायम भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध असावेत या मताचे आहेत. बायडन यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध सध्या आहेत तसेच राहतील आणि त्यापेक्षाही पुढच्या स्तरावर जातील, याची दाट शक्यता आहे. बायडन हे अमेरिका-भारत संबंधांचे खंदे समर्थक मानले जातात. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात उप राष्ट्राध्यक्ष म्हणून बिडेन यांनी आठ वर्ष काम केले आहे. भारत-अमेरिका नागरी अणुकराराच्या मंजुरीसाठी आणि द्विपक्षीय व्यापारातील ५०० अब्ज अमेरिकन डॉलर्सचे उद्दीष्ट ठेवण्यात बायडन यांचा मोलाचा वाटा होता. बायडन यांच्या कोअर टीममध्ये भारतीयांची संख्या मोठी आहे. त्यांच्या वतीने, उपराष्ट्रपतीपदाची उमेदवार कमला हॅरिस भारतीय वंशाच्या आहेत, तर बायडन यांचे दोन महत्त्वाचे सल्लागारदेखील भारतीय वंशाचे आहेत. बायडेन यांच्या मंत्रिमंडळात दोन खाती भारतीय वंशाच्या व्यक्तींकडे येण्याची शक्यता आहे.
भारताशी मजबूत संबंधांना प्राधान्य
आरोग्य मंत्री म्हणून महाशल्यविशारद डॉ. विवेक मूर्ती, तर उर्जा मंत्री म्हणून स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक अरुण मजुमदार यांच्या नावांची चर्चा आहे. मूर्ती ४३ वर्षांचे असून कोरोना सल्लागार मंडळाचे संयुक्त अध्यक्षपद त्यांच्याकडे यापूर्वीच सोपवण्यात आले आहे. मुजुमदार हे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतील प्रिकाउंट इन्स्टिट्युट ऑफ एनर्जीचे संचालक आहेत. आण्विक शस्त्रांचे डिझाइन, उत्पादन आणि चाचणी करणार्या उर्जा विभागाशी काम करणार्या संघाचे ते प्रमुख असणार आहेत. त्यांच्या संचात कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या भौतिक विज्ञान प्राध्यापक राममूर्ती रमेश यांचा समावेश आहे. तर किरण आहुजा हे नागरी हक्क विषयक कायदेतज्ञ आहेत. त्यांनी यापूर्वी बराक ओबामा यांच्या अध्यक्षपदाच्या काळात ऑफिस ऑफ पर्सनल मॅनेजमेंटचे चीफ ऑफ स्टाफ, आशियाई अमेरिकन लोकांबाबत आणि पॅसिफिक बेटांबाबत व्हाइट हाउसच्या पुढाकाराचे कार्यकारी संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. याशिवाय सुमोना गुहा, पुनीत तलवार, दिलप्रित सिधू, पवनीत सिंग, अरुण वेंकटरमण, प्रविणा राघवन, आशा जॉर्ज, सुभश्री रामनाथन, भाव्य लाल आदी भारतीय वंशाच्या विविध क्षेत्रांमधील तज्ञांना विविध उच्च पदांसाठी निवडण्यात आले आहे. याखेरीज बायडन यांनी निवडणुकीदरम्यान सांगितले आहे की, ओबामा-बायडन प्रशासनाने नेहमीच भारताशी मजबूत संबंधांना प्राधान्य दिले. त्यामुळे आता त्यांच्या निवडीमुळे भारत आणि अमेरिका समन्वय अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा आहे. असे असले तरी बायडेन यांचे चीनसोबतचे व्यावसायिक संबंध जगजाहीर आहेत. मात्र अमेरिकच्या अध्यक्षपदी जो बायडन आल्यानंतर, अमेरिका-चीन संबंध सुधारतील असे स्वप्न बघू नये, असा सल्ला चीन सरकारच्या एका सल्लागाराने दिला आहे. तसेच, चीनने अमेरिकेच्या कडक धोरणांना तयार राहायला हवे, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. झेंग योंगनियान असे या सल्लागाराचे नाव असून, ते ’अॅडव्हान्स्ड इन्स्टिट्यूट ऑफ ग्लोबल अँड कन्टेम्पररी चायना स्टडीज’ या अभ्यासगटाचे अधिष्ठाता आहेत. यामुळे चीन-भारत-अमेरिका या तिन मोठ्या शक्तींमधील संबंध कसे असतील, हे आगामी काळात कळेलच परंतू सत्ता हस्तांतरणाचा संघर्ष टळला, हे केवळ अमेरिकेच्याच नव्हे तर जगाच्या दृष्टीने चांगलेच झाले आहे.
Post a Comment