दुरितांचे तिमिर जावो

दिवाळी म्हणजे दीपोत्सव, दिव्यांचा सण, पणत्या, आकाशकंदील, फराळाची देवाण-घेवाण आणि फटाक्यांची आतषबाजी करत आनंदाची उधळण करणारा हा सण आहे. यंदाची दिवाळी गतवर्षाच्या दिवाळीपेक्षा पूर्ण वेगळी आहे. गत आठ महिन्यांपासून कोरोना आणि लॉकडाऊनच्या दृष्टचक्रात अडकून पडलेल्यांना प्रगतीचा मार्ग खुला करण्याचा सण म्हणून यंदाच्या दिवाळीला विशेष महत्त्व आहे. देशाचे अर्थचक्र मंदीच्या चक्रव्ह्यूवात रुतले आहे. या दिवाळीत अर्थचक्राला गती मिळेल अशी आशा सर्वसामान्यांना आहे. आठ महिन्यांपासून अनेकांच्या जीवनात अंधकार पसरला आहे व अंध:कारावर नित्यनेमे मात करणार्‍या या दीपोत्सवाचा प्रारंभ हा निश्‍चितच आनंददायी आहे. दिवाळीत विशेष आकर्षण असणार्‍या फटक्यांवरुन यंदाही जोरदार आतषबाजी सुरु आहे. अनेक शहरात फटाके विक्री व फटाके फोडण्यावर बंदी घालण्याच्या मुद्यावरुन राजकारण तापले आहे. काहींनी तर आणखी एक पाऊल पुढे टाकत त्याला धार्मिक रंग देण्याचाही प्रयत्न चालविला आहे. दिवाळीतच फटाकेबंदी का? असा त्यांचा सवाल आहे तर दुसरीकडे पर्यावरणवाद्यांची प्रदूषणमुक्त उत्सवासाठी धडपड सुरु आहे. तसे बघता हे चित्र काही नवे नाही. दिव्यांच्या प्रकाशात अंधःकाराला दूर करण्याचा सण

दीपावली हा आपल्या देशातील सर्वांत मोठा सण. दिवाळीचा हा सण प्रकाशपर्व म्हणून ओळखले जाते. या दिवसांत सगळीकडे दिवे लावले जातात. दीप हे मानवमात्राला उर्जा व प्रकाश देऊन त्यांचे जीवन सुखदायी करतात. म्हणूनच दिव्याला आपल्या संस्कृतीमध्ये असाधारण महत्त्व आहे. अश्‍विन कृष्ण द्वादशीपासून कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत साजरा केला जाणारा लक्ष लक्ष दिव्यांच्या प्रकाशात अंधःकाराला दूर करण्याचा सण म्हणजे हा दिवाळी सण. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या विविध दिवसात दिवाळी सणाच्या परंपरा, संस्कार सामावलेले आहेत. हा दीपोत्सव सण प्राचीन काळापासून साजरा केला जातो. प्रभू राम रावणाचा पराभव केल्यानंतर अयोध्येला परतत असताना त्यांच्या वाटेवर लोकांनी दिवे लावून स्वागत केल्याचे त्रेतायुगात सांगितले आहे तीच ही दिवाळी. दुसर्‍या एका पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्णांनी अत्याचारी नरकासुराचा वध केल्यानंतर गोकुळवासियांनी आपला आनंद दिवे लावून व्यक्त केल्याची कथा प्रचलित आहे. एका कथेनुसार, देवीने महाकालीचे रूप धारण करून राक्षसांचा वध केला होता. त्याचा वध केल्यानंतरही महाकालीचा क्रोध कमी झाला नव्हता, तेव्हा भगवान शंकराने स्वत: देवीच्या चरणी लोटांगण घातले. शंकराच्या शरीर स्पर्शाने महाकालीचा क्रोध शांत झाला. त्याची आठवण म्हणून लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी तिच्या रौद्ररूपाची पूजा करण्याची प्रथा आहे. तर  एका कथेनुसार, बळी नावाच्या बलाढ्य राजाला पाताळात दडपण्यासाठी विष्णूच्या वामनावताराने आश्‍विन वद्य त्रयोदशीचा मुहूर्त निवडला, तीच ही दिवाळी, असे कितीतरी संदर्भ दिले जातात. 

यंदाची दिवाळी अनेक अथार्र्ंनी वेगळी 

दुर्दैवाने आज या सणवारांनाही इव्हेंटचे स्वरूप प्राप्त झाले असल्याने त्यांच्या मूळ उद्देशांपासून आम्ही केव्हाच भरकटलो आहोत, हा भाग वेगळाच! कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर साजरी होत असलेली यंदाची दिवाळी अनेक अथार्र्ंनी वेगळी आहे. देशात लॉकडाउन शिथिल झाले असले तरी कोरोना अजून संपलेला नाही. लॉकडाउन शिथिलीकरणाच्या मागच्या तीन-चार महिन्यांत शाळा-महाविद्यालये, मंदिरे सोडून जवळपास सर्व व्यापार-व्यवहार सुरु झाले आहेत. परंतू या शिथिलीकरणात काही नियमांचे सर्वांनी कडक पालन करायचे असताना बहुतांश नागरिकांचे त्याकडे दुर्लक्ष होतेय. हे कोरोनाच्या दुसर्‍या लाटेस निमंत्रण ठरु शकते. सध्या दिवाळीच्या निमित्ताने बाजारात उसळलेली गर्दी ही कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला आमंत्रण देणारी आहे. अमेरिकेसह इटली, स्पेन, इंग्लंड, नेदरलँड आदी युरोपियन देशांत कोरोनाची दुसरी लाट आली आहे. काही देशांत पुन्हा कडक लॉकडाउनही सुरु करण्यात आले आहे. अमेरिकतही वाढती कोरोना रुग्णसंख्या चिंताजनक पातळीवर पोचली आहे. युरोपमधील देशांमध्ये कोरोनाच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण होते आहे. त्याठिकाणी रुग्ण झपाट्याने वाढत असून त्यांच्यासाठी रुग्णालयांची साधनसामग्री, वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स कमी पडताहेत. दिवाळीत आपण बेसावध राहिलो तर पुढच्या काळात आपल्याकडेही रुग्णसंख्या बेसुमार वाढून खूप कठीण आव्हान बनेल. एकीकडे दिवाळीचा आनंद आपण घेणार असलो, तरी दुसरीकडे हजारो डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस हे सणवार विसरून कोरोनाशी लढताहेत, तुमचा - आपला सर्वांचा जीव कसा सुरक्षित ठेवायचा ते पाहताहेत हे आपण विसरता कामा नये. 

या काळात सर्वांनी अधिक काळजी घ्या

पुढील तीन महिने हिवाळ्याचा म्हणजे थंडीचा काळ आहे. थंड वातावरणात कोरोना विषाणू अधिक सक्रीय असतो आणि त्याची लागण होण्याची शक्यता अधिक असते. त्यातच दिवाळीतील फटाक्यांमुळे प्रदुषणही बर्‍यापैकी वाढलेले असते. वाढत्या प्रदुषणात अनेकांना श्वसनाचे आजार होतात. अशावेळी पुढील तीन ते चार महिने आव्हानात्मक असून या काळात सर्वांनी अधिक काळजी घ्यायला पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार सद्यस्थितीत भारतात वायुप्रदूषणाने दरमिनिटाला दोघांचा मृत्यू होतो. त्यातही महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक प्रदूषित राज्य असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. यामुळे फटाक्यांवरुन मतभेदांची आतषबाजी न करता निखळ आनंद लुटायला हवा. कोरोनामुळे अनेकांना आपल्या जीवलगांना गमवावे लागले आहे. याकरीता स्वत:चा आनंद साजरा करताना त्यांच्या दुख:चेही स्मरण ठेवण्याची आवश्यकता आहे. दिवाळीचा हा उर्जेचा सण नकारात्मकतेवर मात करणारा सण आहे. याकारीता या सणानिमित्ताने मनातील सर्व कटूता जमीनीत गाडून टाकून अथवा आगीत भस्म करुन टाकण्याचा संकल्प प्रत्येकाने करावयाचा आहे. कोरोनाचे संकट यथाअवकाश संपेलही परंतू त्यानंतरही आव्हानांची मालिका समोर उभी असणार आहेच. यासाठी सर्वांनी एकत्रित येवून या समस्यारुपी असूरांचा नाश करण्यासाठी सज्ज व्हायचे आहे. ही दिवाळी आपणा सर्वांना आनंदाची, आरोग्यदायी व सुखासमाधानाची जावो, हीच ईश्‍वर चरणी प्रार्थना...

Post a Comment

Designed By Blogger