चौकार, षटकारांची आतषबाजी, अटीतटीचे सामने, क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा, चीअर लीडर्स आदी रंगानी सजलेल्या इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलची क्रिकेटवेड्यांचा देश म्हणून परिचित असलेल्या भारतात प्रचंड क्रेझ आहे. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे आयपीएल होणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला होता. एकवेळतर आयपीएल रद्दच झाल्याचे जवळपास निश्चित मानले जात होते मात्र सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून ओळखली जाणारी आयपीएल रद्द होणे परवडणारेच नव्हते. म्हणून कोरोना व्हायरसच्या संकटातही आयपीएल खेळवण्याचा धाडसी निर्णय बीसीसीआने घेत हे आव्हान यशस्वी करून दाखवले. यंदाची आयपीएल दुबईत खेळली गेली असल्याने स्टेडीयम ऐवजी टिव्हीवर आनंद लुटत प्रेक्षकांनी दुधाची तहान ताकावर भागवली. यंदाच्या १३व्या हंगामात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश करणार्या दिल्ली कॅपिटल्सवर पाच विकेट्स राखून विजय मिळवत जेतेपदाचा मान पटकावला. यापूर्वी मुंबईने २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ या वर्षात जेतेपद पटकावले आहे.
कोरोना व्हायसरमुळे निर्माण झालेल्या संकटामुळे जगभरात क्रिकेटसह अनेक क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या किंवा पुढे ढकलण्यात आल्या. यंदाच्या आयपीएलच्या १३ व्या सीझनचे आयोजन भारतातच २९ मार्चपासून करण्यात येणार होते. परंतु, कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल रद्द करण्यात आले. मात्र यंदाच्या वर्षी होणारा टी-२० विश्वचषक स्पर्धेला स्थगिती मिळाल्यानंतर बीसीसीआयने आयपीएल खेळवण्याचा निर्णय घेतला. कारण आयपीएल स्पर्धा ही सोन्याचे अंड देणारी स्पर्धा म्हणून देखील ओळखली जाते. दरवर्षीला मुख्य प्रायोजकाकडून क्रिकेट मंडळाला ४४० कोटी एवढी घसघशीत कमाई होती. त्याशिवाय प्रक्षेपणाचे हक्क, जाहिराती यामधून मिळणारी रक्कम वेगळीच असते. यंदा ही स्पर्धा झाली नसती तर बीसीसीआयला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले असते. म्हणूनच आयपीएलच्या आयोजनावर बीसीसीआय ठाम होते. भलेही प्रेक्षक नसले तरी चालेल पण स्पर्धा झालीच पाहिजे, प्रेक्षकांचे काय ते घरी बसूनच स्पर्धेचा आनंद लुटतील, म्हणून दुबईच्या मैदानांवर प्रेक्षकांविनाच ही स्पर्धा पार पडली. सुरुवातीपासून सर्वांचे लक्ष महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग, विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर आणि पहिल्या टप्प्यात दमदार खेळ करणार्या दिल्ली कॅपिटल्सवरच होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करणार्या महेंद्रसिंह धोनीसाठी ही आयपीएल नक्कीच खास होती. त्याच्या संघाने सुरुवातीच्या सामन्यातच मुंबई इंडियन्सला धुळ चारत इरदे स्पष्ट केले होते. मात्र कर्णधार रोहित शर्माचा मुंंबईचा संघ खर्या अर्थाने बाजीगर ठरला.
.......हीच खरी आयपीएलची गंमत
मुंबई इंडियन्सकडे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्णधार रोहित शर्माचा खेळाडूंवरील विश्वास. आयपीएलचे चार विजेतेपद मिळवणार्या मुंबईच्या यशाचे रहस्य त्यांची अचूक गोलंदाजी होय. विशेषतः या संघातील भेदक मारा करणारे गोलंदाज नेहमीच आघाडीवर राहिले आहे. जसप्रीत बुमराह हा हुकमी एक्का त्यांच्याकडे होताच, जसप्रीतने १५ सामन्यांत २७ विकेट्स घेतल्या. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो दुसर्या स्थानवर राहिला. बुमराहच्या जोडीला ट्रेंट बोल्ट, नॅथन कोल्टर-नायल व जेम्स पॅटिन्सन यांनी अनुक्रमे २५, ५ व १० विकेट्स घेतल्या. दुसर्याबाजूला कर्णधार रोहित शर्मा आणि युवा फलंदाज क्विंटन डी कॉक ही सर्वात भक्कम सलामी जोडी होती. हार्दिक पांड्या, क्विंटन डी’कॉक, किरॉन पोलार्ड ही तगडी फौज मुंबईकडे होतीच. सूर्यकुमार यादवने या आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी कायम राखत मधली फळी सांभाळली. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईचा इशान किशनने ५१६ धावा कुटत सर्वांवर भारी ठरला. क्विंटन डी’कॉकनेही मागच्या आयपीएलमधील फॉर्म कायम राखताना ५०३ धावा चोपल्या. मुबंई इंडियन्सच्या प्रत्येकाने आपआपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडली आणि संघाला पाचवे जेतेपद पटकावून देण्यात मोलाची भूमिका बजावली. चार वेळा आयपीएल विजेता मुंबई इंडियन्स आयपीएल मधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असल्याने मोठ्या आणि दबावाच्या सामन्यांमध्ये संघाला बराच अनुभव होता. या अनुभवाच्या जोरावर मुंबईने सहाव्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामन्यातही तेच वरचढ ठरले. मुंबईचे हे पाचवे आयपीएलचे विजेतेपद ठरले, तर रोहितसाठी एखाद्या संघाचे प्रतिनिधीत्व करताना हे सहावे आयपीएलचे विजेतेपद ठरले. २००९ला डेक्कन चार्जर्सच्या आयपीएलच्या विजेत्या संघातही रोहितचा समावेश होता. खरे तर रोहित शर्माचा मुंबई संघ असो, वा श्रेयस अय्यरचा दिल्ली कॅपिटल्सचा संघ असो, तमाम क्रिकेटप्रेमींच्या दृष्टीने दोघेही जिंकले होते. मात्र कमालीचा उत्कंठापूर्ण ठरलेला आयपीएलचा हा महामुकाबला कोण जिंकणार, यासाठी सर्वांनी श्वास रोखून धरले होते. हीच खरी आयपीएलची गंमत आहे.
क्रिकेटच्या नवी पिढीची जडणघडण
आयपीएलमधून प्रत्येक वर्षी असे काही खेळाडू पुढे येतात आणि त्यातून भारतीय क्रिकेटच्या नवी पिढीची जडणघडण होऊ लागते. रोहित शर्माच्या फिटनेसवरुन उडालेला धुराळा यथाअवकाश खाली बसेलच, त्यामागचे खरे कारण ही समोर येईलच मात्र आयपीएलमध्ये कसे आणि किती सामने खेळायचे, हे खेळाडूंनी ठरवावे, आवश्यकतेनुसार त्यांनी विश्रांती घ्यावी, कारण आयपीएलपेक्षा ते भारतिय क्रिकेट संघाचे खेळाडू आहेत, याची आठवण त्यांनी वारंवार स्वत:ला करुन द्यायला हवीच. यंदाच्या आयपीएलचा अजून एक महत्त्व म्हणजे, या स्पर्धेत सर्वच संघातील नवोदितांनी त्यांच्या प्रमुख खेळाडूंपेक्षाही जास्त भरीव कामगिरी करून आपली गुणवत्ताही सिद्ध केली आहे. देवदत्त पडीक्कल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, टी. नटराजन, रियान पराग, राहुल तेवतिया यांसारखे खेळाडू पुढे आले हेच या स्पर्धेचे सर्वात मोठे यश म्हणावे लागेल. पडीक्कल पदार्पणातच चारशेपेक्षा जास्त धावा करणारा पहिलाच फलंदाजही ठरला. सूर्यकुमारही असाच या स्पर्धेतील कामगिरीमुळे थेट भारतीय संघाचे दार ठोठावणारा फलंदाज. यंदाच्या स्पर्धेत प्ले-ऑफ गटात स्थान मिळालेल्या सनरायझर्स हैदराबादचा टी. नटराजनही एक इंडिया मटेरियल असलेला खेळाडू. त्याची वेगवान गोलंदाजी यंदाच्या स्पर्धेत कमालीची यशस्वी ठरली. इशान किशन हे नाव तर आता सगळ्यांच्यात तोंडी येऊ लागले आहे. अफाट गुणवत्ता असलेला हा फलंदाज येत्या काळात इंडिया जर्सीमध्ये दिसला तरी नवल वाटणार नाही. राहुल तेवतिया, रियान पराग व इशान किशन यांनी यंदाच्या स्पर्धेत आपल्या फलंदाजीच्या जोरावर संघाला अत्यंत संकटाच्या स्थितीतही विजय मिळवून दिले आहेत. आता प्रश्न आहे तो त्यांना आणखी मोठ्या व्यासपीठावर कधी संधी मिळणार.
Post a Comment