कोकण, मध्य महाराष्ट्र व दक्षिण मराठवाड्याच्या भागात परतीच्या मुसळधार पावसाने चांगलीच दाणादाण उडवली आहे. पुणे, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील काही मंडळात अतिवृष्टी झाली. राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. परतीच्या पावसामुळे नदी-नाले तुडूंब भरले असून, राज्यात काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नदी-नाल्याचे पाणी शेतांमध्ये शिरल्याने अनेक ठिकाणी पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकर्यांना मोठा फटका बसला आहे. चार दिवसांपासून सततच्या पावसाने काढणी झालेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी शेतकर्यांनी पीक काढून शेतात झाकून ठेवली होती. मात्र सध्या सुरु असलेल्या पावसामुळे काढून ठेवलेले पीक नेता येत नाही. ऊस, कांदा, डाळिंब, द्राक्ष या पिकांनाही त्याचा मोठा फटका बसला आहे. उघड्यावर वाळण्यासाठी ठेवलेला कांदा पूर्ण पणे पावसात भिजला आहे. गाळपासाठी तयार असलेला ऊस शेतात पडला आहे. डाळींबरोबरच द्राक्ष बागाचे सुध्दा अधिक नुकसान झाले आहे. तर शेतातील कापूस व सोयाबीन काळे पडत आहे.
हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला
दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला. यात काही जण एका पुलावर उभे राहून मुसळधार वाहणार्या पाण्याला पाहत आहेत. या पाण्यात सोयाबीनची एक भली मोठी गंजी वाहून येतांना दिसते. पुलावर उभे असलेले शेतकरी जोरजोरात ओरडत असल्याचेही ऐकू येते. तर दोन जण लांबून नदी काठून त्या वाहून जाणार्या गंजीच्या मागे जीवाच्या आतंकाने धावतांना दिसतात...वरकरणी दिसणारा साधा विषय नाही. मुसळधार पाण्यात जी सोयाबीनची गंजी वाहतांना दिसते ती शेतकर्याची वर्षभराची मेहनत आहे. एकीकडे महागाई, कोरोनासारख्या संकटांचा सामना करत शेतकर्यांनी पिकं जगवलं, वाढवलं, पेरणीला आल्यानंतर त्याची कापणी करुन ठेवली मात्र वर्षभराची मेहनत अगदी काही क्षणात डोळ्यासमोरुन वाहून गेली, यापेक्षा मोठ दुख: कशाला म्हणावे! आस्मानी संकटांची मालिका शेतकर्यांचा पिच्छा सोडायचे नाव घेत नाही. पाचसहा वर्ष कोरड्या दुष्काळात दुबार तिबार पेरणी करून ही खरीप, रब्बी पिके हातात आली नाहीत. गतवर्षी सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या मात्र परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला. परतीच्या पावसाने दिवाळीपर्यंत हाहाकार माजवला होता. यंदाही परिस्थिती फारशी वेगळी नाही.
दुहेरी संकटात राज्यातील बळीराजा
यावर्षी सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस पडल्यामुळे पिकांची स्थिती चांगली होती. मात्र उडीद व मुग फुलोरामध्ये येण्याची वेळ असताना पावसाने ओढ दिली. मात्र तरीही उडीद, मुगाचे पीक समाधानकारक येईल, अशी आशा शेतकर्यांना होती. हे पीक ऐन तोडणीवर आले असताना पावसाने धुमाकुळ घालायला सुरुवात केली. राज्यात गेल्या दोन-तिन दिवसापासून पावसाची धुमशान सुरू आहे. त्यामुळे उडीद, मूग आदी पिके पूर्णपणे वाया गेले आहेत. संकटांची हि मालिका येथेच संपली नाही, यातून वाचलेल्या पिकांना गत दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त केले. कपाशी, ज्वारी, मका, सोयाबीन या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या सुरु असलेल्या पावसाच्या धुमाकुळीमुळे शेतकर्यांच्या शेतात व डोळ्यात असे दोन्ही ठिकाणी पाणी आले आहे. एका बाजूला कोरोना व्हायरस संक्रमनाचे संकट. तर, दुसर्या बाजूला मुसळधार पावासामुळे होणारे शेतीचे नुकसान अशा दुहेरी संकटात राज्यातील बळीराजा सापडला आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार अजून किमान तिन-चार दिवस पाऊस सुरु राहणार आहे. राज्यातील शेत शिवारांची स्थिती अशी आहे की, काही ठिकाणी सोयाबीन कापणीवर आले तर काहींची कापणी होऊन शेतात ढीग रचून ठेवलेले आहेत. पावसामुळे सोयाबीन काळे पडण्याची शक्यता बळावली आहे. तर शेतात कापूस फुटलेला आहे. तो वेचता देखील येत नसल्याने जळगाव जिल्ह्यातील शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाऊस नाही पडला तरी नुकसान व पडला तरी नुकसान अशा फेर्यात शेतकरी गुदमरला आहे. केंद्र शासनाचे दुष्काळाचे निकष ठरलेले आहेत. पण अतिपावसाने नुकसान झाले आणि पीक हातचे गेले तर त्या संदर्भात ओल्या दुष्काळाचे निकष मात्र तसे ठरलेले नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती निधीतून राज्याला अधिक मदत मिळावी, अशी मागणी करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ओल्या दुष्काळाचे निकष ठरविणे आता गरजेचे झाले आहे कारण गेल्या काही वर्षांत गारपीटीलाही सामोरे जावे लागले आहे. पण या वेळी परतीच्या पावसाने दणका दिल्यानंतर शेतीसमोर नवेच आव्हान उभे ठाकले आहे. हे शेतीबरोबरच सरकारसमोरचेही आव्हान आहे.
चौकटीबाहेर जावून निर्णय घेण्याची आवश्यकता
यावर्षी गत महिन्यात आधीच अति पावसामुळे मूग, उडीद या पिकांचे नुकसान झालेले आहे. त्यातून सावरत नाही तोच आता पुन्हा एकदा कापूस व सोयाबिन वाहून जात आहे. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटामध्ये सापडला आहे. अशा अडचणीच्या वेळी सरकार त्यांच्या पाठीशी उभे राहणे अपेक्षित असताना हे झालेले नाही. अशा संकटसमयी राज्य सरकार मदत करणार का केंद्र सरकार? अशी एकमेकांकडे बोटं न दाखविता तसेच सध्या राज्यात सुरु असलेली राजकीय सर्कस थोडावेळ बंद करुन सर्वांनी शेतकर्यांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. परतीच्या या पावसाचे रुप किती रौद्र आहे, हे सर्वजण उघड्या डोळ्यांनी पाहतच आहेत. यामुळे अनेक ठिकाणी शेतकर्यांचे १०० टक्के नुकसान झाल्याचे स्पष्ट चित्र आहे. यामुळे लालफितीतील सर्वेक्षणाची गरज नाही. सरसकट सर्व शेतकर्यांना शासनाने हेक्टरी ५० हजार रुपये व पीक विमा मजूर करण्याची आवश्यकता आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तोच जर खचला तर कसे होईल? यामुळे अवकाळी पावसाने उद्ध्वस्त केलेल्या शेतकर्यांना पडेल ती किंमत मोजून जगवायला हवे. या संकटावर मात व्हावी. यासाठी सरकारने कोणतेही राजकारण न करता चौकटीबाहेर जावून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.
Post a Comment