भारतीयवंशाची ‘अवकाशपरी’ कल्पना चावलांचा सन्मान

भारतीय अवकाश भरारीच्या स्वप्नांना ‘पंख’ मिळवून देणारी पहिली महिला म्हणजे कल्पना चावला. अवकाश संशोधनासारख्या क्षेत्रातसुद्धा भारतीय महिला कुठेही कमी नाहीत, त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून तितक्याच सक्षमतेने आणि प्रभावीपणे काम करू शकतात, हे जागतिक पातळीवर सिद्ध करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारी अंतराळयात्री म्हणजे कल्पना चावला. अंतराळात जाणारी भारतीय वंशाची पहिली महिला म्हणून कल्पना चावला यांचे मोठ्या अभिमानाने नाव घेतले जाते. कल्पना चावला या देशातील कोट्यवधी मुली व महिलांचे प्रेरणास्थान मानल्या जातात. त्यांनी केवळ अंतराळ विश्वात यश मिळवले नव्हते तर भारतातीलच नव्हे तर जगभरातील कोट्यावधी विद्यार्थी-विद्यार्थिनींना स्वप्न जगायला शिकवले, ते पूर्ण करण्यासाठी मेहनत करण्याची प्रेरणा दिली. या अवकाशपरीने वयाच्या ४१व्या वर्षी दुसरी अंतराळ यात्रा केली आणि दुर्देवाने ती त्यांच्यासाठी अखेरची ठरली. मानवी अंतराळ यानात त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राकडे उड्डाण करणार्‍या एका अमेरिकी व्यावसायिक मालवाहक अंतराळ यानाला कल्पना चावलाचे नाव देण्यात आले आहे.अनोख्या सन्माने प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलली

‘आज आम्ही कल्पना चावलाचा सन्मान करतो आहोत. नासामध्ये भारतीय वंशाच्या पहिल्या अंतराळवीर म्हणून ज्यांनी इतिहास घडवला आहे. मानवी अंतराळ यानात त्यांचे योगदान महत्वपूर्ण राहीले असून त्यांचा विशेष प्रभाव पडला आहे. भेटा आमच्या आगामी सिग्नस यान कल्पना चावलाला’. असे ट्विट करत सिग्नस स्पेसक्राफ्टचे निर्माते नॉर्थरोप ग्रुममॅन यांनी महत्त्वपूर्ण घोषणा नुकतीच केली. या कंपनीची ही परंपरा आहे की, प्रत्येक सिग्नसचे नाव अशा एका व्यक्तीच्या नावे ठेवले जात आहे की ज्याने मानवी अंतराळ यान मोहीमेत महत्वपूर्ण भुमिका बजावलेली असेल. कल्पना चावला यांना अंतराळात जाणार्‍या भारतीय वंशाच्या पहिला महिला यादृष्टीने त्यांना निवडण्यात आले आहे. सिग्नस स्पेसक्राफ्टच्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरुन २९ सप्टेंबरला सोडले जाणार्‍या सिग्नस स्पेसक्राफ्टला कल्पना चावला यांचे नाव देवून करण्यात आलेल्या त्यांच्या या अनोख्या सन्माने प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलली आहे. १६ जानेवारी २००३ रोजी अमेरीकी अंतराळ यान कोलंबियाच्या चालक गटाच्या सदस्या म्हणून त्या अंतराळात गेल्या होत्या. १ फेब्रुवारी २००३ ला अंतराळात १६ दिवसांचा प्रवास पुर्ण करुन त्या परतत असताना नियोजित लँडीगच्या १६ मिनीट आधी दक्षिण अमेरीकेत अंतराळ यानाला कोलंबियामध्ये अपघात झाला. या अपघातात कल्पना चावलासहित सर्व अंतराळवीरांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर तीन वर्षांनी सुनिता विल्यम्स ही २००६ मध्ये अंतराळात जाणारी भारतीय वंशाची दुसरी महिला ठरली. 

दुसर्‍यांदा अंतराळात पाठवले 

१७ मार्च १९६२ रोजी हरियाणातील करनाल या गावी कल्पना चावला यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना आकाश इतकं आवडायचे की त्या विमानाचे चित्र सतत काढायच्या. लहानपणापासून कल्पनाला अंतराळयान आकाशात कसे झेपावते, स्थिरावते?,  मी अंतराळयानातून उडू शकते का?, असे प्रश्न पडायचे. त्यांना लहानपणापासूनच अवकाशात झेपावण्याचे वेध लागले होते. त्यांना अंतराळात उडण्याची स्वप्नं झोपू देत नसत. हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी २० वर्षाच्या असताना त्या अमेरीकेला गेल्या आणि तिथे त्यांनी एरोस्पेस इंजिनियरींगचा अभ्यास सुरु केला. टेक्सास विद्यापीठातून एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये एमटेक केले. त्यानंतर कोलोरॅडो विद्यापीठातून डॉक्टरेट मिळविली. कल्पना चावला १९८८ मध्ये नासामध्ये रुजू झाल्या नासाच्या संशोधन केंद्रात त्यांची नेमणूक झाली. त्यानंतर त्या मार्च १९९५ मध्ये नासाच्या अंतराळवीर कॉर्पोरेशनमध्ये रुजू झाल्या. सुमारे आठ महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर त्यांनी १९ नोव्हेंबर १९९७ रोजी पहिल्या अंतराळ मोहिमेची सुरुवात केली. तेव्हा त्यांच वय अवघे ३५ वर्षे होते. नासामध्ये काम करताना कल्पना यांनी येथील रिसर्च सेंटरमध्ये ओव्हरसेट मेथड्स या क्षेत्रात उपाध्यक्षपद मिळवले. नासामध्ये कल्पना चावला या सर्टिफाइड कमर्शिअल पायलट होत्या. त्यांना सीप्लेन, मल्टी इंजिन एअर प्लेस आणि ग्लायडर चालवण्याचा परवाना होता. ग्लायडर आणि एअरोप्लेनसाठी त्या सर्टिफाइड फ्लाइट इन्स्ट्रक्टरही होत्या. अंतराळक्षेत्रातील योगदानासाठी कल्पना यांना अनेक पुरस्कार मिळाले होते. कल्पनाचा विवाह फ्रान्सचे वैमानिक प्रशिक्षक ज्याँ पीर हॅरीसन यांच्याशी झाला होता. नासामध्ये काम करत असताना त्यांनी अमेरिकन नागरिकत्व स्विकारले होते. त्यांच्या एकूण कामावर प्रभावित होऊन त्यांना १६ फेब्रुवारी २००३ साली दुसर्‍यांदा अंतराळात पाठवले गेले. 

...आणि यशस्वी नावाची मोहीम शोकांतिका बनली

६ अंतराळवीरांसह त्यांनी कोलंबिया एसटीएस -८७ अंतराळ शटल उडविले. पहिल्या मोहिमेदरम्यान त्यांनी सुमारे ३७२ तास अंतराळात १.०४ दशलक्ष मैलांचा प्रवास केला. परत येताना पृथ्वीच्या वातावरणात अंतराळ यानात प्रवेश होताना एक भयंकर अपघात झाला. १ फेब्रुवारी २००३ रोजी कोलंबिया अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करताच स्फोट झाला. या स्फोटामुळे कोलंबियाचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले. या यानामध्ये असलेल्या कल्पना चावला यांचा आणि अन्य अंतराळवीरांचा मृत्यू झाला आणि यशस्वी नावाची मोहीम शोकांतिका बनली. नासा आणि संपूर्ण जगासाठी ही अत्यंत दुःखद घटना होती. कल्पना चावला यांना मरणोत्तर काँग्रेशनल स्पेस मेडल ऑफ हॉनर, द नासा स्पेस फ्लाईट मेडल आणि नासा डिस्टिंगविशड सर्व्हिस मेडल या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. हरयाणा शासनाने त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कुरुक्षेत्र येथे कल्पना चावला स्मारक तारामंडळ उभारले आहे. आता सिग्नस यानाला त्यांचे नाव देवून त्यांचा अनोख्या पध्दतीने सन्मान करण्यात आला आहे, ही सर्व भारतीयांसाठी मोठ्या अभिमानाची बाब आहे. कल्पना चावला यांच्या अद्भुत जीवन प्रवासातून बरेच काही घेण्यासारखे आहे. एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी एका अशा काळात अवकाशात फेरफटका मारून आली ज्या काळात घरातून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. यामुळे कल्पना चावला यांनी केलेल्या अथक परिश्रमाला, दाखवलेल्या सहसाला सलाम...!

Post a Comment

Designed By Blogger