गलवानमध्ये भारतच ‘बलवान’

हिमालयाच्या उंचीपेक्षा ज्यांचे साहस उंच आहे, अशा आपल्या भारतीय सैन्याच्या शौर्याचा डंका जगभरात वाजत आहे. मुजोर व सैन्य शक्तिमध्येही बलवान असलेल्या चीन सारख्या देशाला धोबीपछाड देत भारतीय लष्कराने आपले सामर्थ्य पुन्हा एकदा सिध्द केले आहे. भारतीय लष्कराच्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात २० जवान शहिद झाले होते. मात्र ‘फैसला ऑन द स्पॉट’ करत भारतीय जवानांनी ४३ चीनी सैनिकांना यमसदनी धाडले होते, तेंव्हाच भारताच्या लष्कराच्या सामर्थ्याची दखल जगभरात घेतली गेली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आक्रमक नेतृत्वाखाली लडाखमध्ये कुरघोड्या करून सीमेवरील तणाव वाढवणार्‍या चीनला भारताने सर्वच आघाड्यांवर चीतपट केले. लष्करी, सामरिक, आर्थिक, कूटनीती अशा सर्वच क्षेत्रांमध्ये भारताने चीनला जोरदार धक्के दिले. त्याचा परिणाम म्हणून चीनने गलवान खोर्‍यातून आपले सैन्य दोन किलोमीटर माघारी बोलावले. प्रत्यक्ष युध्द न करता चीनचा मुकाबला कसा करता येवू शकतो, हे भारताने संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे.


.....ही चीनची आजवरची रणनिती

भारत-चीनदरम्यान गेल्या काही आठवड्यांपासून सीमेवर तणाव सुरू आहे. मात्र, आता हा तणाव निवळत असल्याचे संकेत मिळत आहेत. चिनी सेन्य गलवान खोर्‍यातून आता जवळापस एक ते दोन किलोमीटर मागे हटले आहे. राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित डोवाल यांनी रविवारी चिनी परराष्ट्रमंत्री वान्ग यी यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी यासंदर्भात दोन्ही देशांमध्ये सहमती झाली. यामुळे भारत आणि चीनदरम्यानची तणावपूर्ण परिस्थिती काहीशी सामान्य होताना दिसत आहे. चिनी सैन्यावर माघारीची वेळ आली यात अनेक राजकीय आणि मुत्सद्दी डावपेच कामी आले. चीन हा विस्तारवादी देश अर्थात भूमाफिया म्हणून कुख्यात आले. त्यांच्या या धोरणाला जपान, व्हिएतनाम, तैवानसारखे देश वैतागलेले आहेत. फक्त भारतच नाही तर शेजारच्या सर्व देशांबरोबर चीनचे सीमावाद आहेत. आर्थिक प्रगतीच्या बळावर कमावलेली प्रचंड लष्करी ताकत दाखवून समोरच्याचा आवाज दडपून टाकायचा या नीतीचा वापर चीन गेल्या अनेक वर्षांपासून करत आला आहे. यातही प्रत्यक्ष युद्ध लढण्यापेक्षा युद्धनितीच्या जोरावर अन्य देशांना नामोहरम करायचे दबाव टाकून त्याला तह करण्यासाठी भाग पाडायचे आणि आपला फायदा करुन घ्यायचा, ही चीनची आजवरची रणनिती राहीली आहे.

चीनच्या विस्तारवादी धोरणाला देश वैतागले

सीमेवर सैन्याची जमवाजमव करणे, त्यांच्या देशाचे सरकारी मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समधून धमक्या देणे, सैन्य शक्तीचे प्रदर्शन करणे, चर्चा झाल्यानंतर त्याचे लगेच उल्लंघन करणे हा सर्व त्यांच्या युद्धनितीचा एक भाग आहे. भारताविरोधात चीनने याच आयुधांचा वापर केला. मात्र यंदा भारताची मुत्सद्दीगिरी चीनवर भारी पडली. यात प्रामुख्याने भारताने तडजोडीची भाषा न वापरता चीनला जशास तसे उत्तर देण्यासाठी सीमेवर मोठ्या प्रमाणावर आपले सैन्य वाढवत भारताने चीनला लागून असलेल्या ३४८८ किलोमीटरच्या सीमारेषेवर सैन्य आणून ठेवले. चीनला लागून असलेल्या फॉरवर्ड बेसजवळील एअर फोर्सचे सर्व तळ अ‍ॅक्टिव्ह केले. गलवान खोर्‍यासारख्या १४ हजार फूट उंचीवरील प्रतिकुल क्षेत्रात रणगाडे तयार ठेवले. सुखाई-३० एमकेआय, मिग-२९, हॉवित्झर, अपाची, चिनूक, ही सर्व अत्याधुनिक शस्त्रे चीनच्या दिशेने तैनात केली. खास डोंगराळ युद्ध लढण्यात पारंगत असलेली माऊंटन फोर्स सज्ज ठेवली. भारताने आपल्या हद्दीत सुरु असलेले इन्फ्रास्ट्रक्चरचे काम थांबवावे यासाठी चीनच्या दबावापुढे न झुकता भारताने उलट गलवान खोर्‍याच्या दिशेने जाणार्‍या ब्रिजची वेगाने उभारणी केली. डीबीओ रोडच्या कामाला गती दिली. एकूणच चीनची दादागिरी खपवून घ्यायची नाही, हाच चंग भारताने बांधला होता. ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी, रस्ते प्रकल्पातून चिनी कंपन्यांची हद्दपारी असे आर्थिक आघाडीवर चीनला दणके देणारे निर्णय घेतले. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे चिनी कंपन्या आणि चीनला कोट्यवधींचा आर्थिक फटका बसला असल्याचा अहवाल नुकताच समोर आला आहे. दुसरीकडे चीनविरोधात संपूर्ण जगात वातावरण निर्मिती करण्यातही भारत यशस्वी ठरला. चीनच्या विस्तारवादी धोरणाला जपान, व्हिएतनाम, तैवानसारखे देश वैतागलेले आहेत. त्यांच्या भूमीत चीन सातत्याने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे अशा देशांनी आघाडी उघडत, भारताला समर्थन दिले. विशेष म्हणजे रशिया आणि अमेरिकेसारख्या देशांनीही भारत-चीन वादात सावध पवित्रा घेतला होता. पण नंतर अमेरिकेने उघड उघड भारताला समर्थन दिले. जर भारत आणि चीनमध्ये युद्धाची परिस्थिती उद्भवल्यास अमेरिकेचे सैन्य भारताला समर्थन देईल, अशी घोषणा सोमवारी व्हाइट हाऊसने केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लेह दौरा मास्टर स्ट्रोक

ऑस्ट्रेलिया, जापान, ब्रिटन सारख्या देशांची उघडपणे भारताच्या भुमिकेचे समर्थन केले. या सर्वात मास्टर स्ट्रोक ठरला, तो पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लेह दौरा. पंतप्रधानांच्या लेह - लडाख दौर्‍यामुळे सैनिकांचे मनोबल वाढले. यावेळी जवानांना संबोधित करताना कुठेही चीनचे नाव घेतले नाही. पण त्यांच्या प्रत्येक वक्तव्याचा रोख चीनकडे होता. हे यूग विस्तारवादाचे नाही, विकासवादाचे आहे, असे म्हणत चीनवर जबरदस्त घणाघात करत थेट इशारा दिला. यावेळी ते म्हणाले होते, आम्ही श्रीकृष्णाच्या बासरीला आणि त्यांच्या सुदर्शन चक्रालाही आदर्श मानतो, असा सुचक इशारही चीनला दिला. एकूणच पूर्व लडाखमधील चीनच्या घुसखोरीला भारत किती गांभीर्याने घेतो आणि प्रसंगी दोन हात करण्यासाठी देखील मागे-पुढे पाहणार नाही हा संकल्प त्यांनी दाखवून दिला. मोदींच्या दौर्‍यानंतर तिसर्‍याच दिवशी चिनी सैन्य गलवान खोर्‍यातून एक ते दोन किमी माघारी फिरले आहे. दोन्ही देशांमध्ये तणाव कमी करण्याचे निश्चित झाले आहे. आंतरराष्ट्रीय तज्ञांच्या मते चीनने हा सर्व वाद विनाकारण उकरुन काढला. कोरोनामुळे आधीच बदनाम झाले असल्याने जगाचे लक्ष दुसरीकडे केंद्रीत व्हावे यासह देशांतर्गत उठाव किंवा बंडाळी होवू नये, यासाठी चीनने या कुरापती केल्याचा संरक्षण तज्ञांचा अंदाज आहे. मात्र येथेही चीनच्या जिनपिंग यांच्या रणनितीचा सपशेल पराभव झाला आहे. डोकलामच्यावेळी सुद्धा चीनवर अशीच वेळ ओढवली होती. आता गलवानमध्येही भारतच बलवान ठरल्याने आशिया खंडात भारताची ताकद पुन्हा एकदा अधोरखीत झाली आहे. भारतात राहून चीनधार्जिनी भुमिका घेणार्‍यांनाही मोदींनी जोरदार धक्का दिला आहे.

Post a Comment

Designed By Blogger