जगभरात हाहाकार माजवणार्या करोना व्हायरसमुळे जगभरात आयोजित करण्यात येणार्या अनेक क्रीडा स्पर्धांना मोठा फटका बसत आहे. जुलै महिन्यात होणार्या टोकियो ऑलिम्पिकवरही रद्द करण्याचे संकट ओढावले आहे. यातच भारतात २९ मार्चपासून होणार्या आयपीएलच्या १३ व्या हंगामावरही कोरोनाचे संकट आहे. आयपीएल स्पर्धा म्हणजे क्रिकेटचा खरा थरार! हे जणू समीकरणच झाले आहे. याच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या लोकप्रियतेला जणू ग्रहणच लागले आहे, असे म्हटले तरी ते पूर्णपणे चुकीचे ठरणार नाही. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धा रद्द करण्याबाबात चर्चा सुरु असताना, ही स्पर्धा थेट रद्द न करता रिकाम्या स्टेडिअममध्ये प्रेक्षकांविना स्पर्धा खेळविण्याचा पर्याय समोर आला आहे. आयपीएलमध्ये सर्व संघांचे कोट्यवधी रुपये गुंतले आहेत. त्यामुळे स्पर्धा रद्द करण्याऐवजी रिकाम्या स्टेडियममध्ये सामने खेळवण्यासाठी संघमालक तयार आहेत. यामुळे यंदा जर स्पर्धा झालीच तर प्रेक्षकांविनाच आयपीएलचा सामने बघावे लागतील, प्रेक्षकांविना आयपीएल म्हणजे, हॉलीवूडचा अॅक्शन चित्रपट आवाज म्यूट करुन पाहण्यासारखा आहे. मात्र गर्दीमुळे वाढणारा कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी हे गरजेचे आहे.
खेळ जगतावर परिणाम
जागतिक महामारीचे स्वरुप प्राप्त झालेल्या कोरोना व्हायरसने जगातील १०० पेक्षा जास्त देशांना ग्रासले आहे. कोरोनाच्या धसक्यामुळे जगभराती शेअरबाजार कोसळल्याने अब्जावधी डॉलर्सचा चुराडा झाला आहे. आता याचा परिणाम खेळ जगतावर देखील होवू लागला आहे. ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघाकडून खेळणार्या एका क्रिकेटपटूची करोना व्हायरसची चाचणी घेण्यात आल्याने कोरोनाने थेट क्रिकेटच्या मैदानात प्रवेश केला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. जगातील सर्वात मोठी बास्केटबॉल लीग एनबीएला टाळण्यात आले. एक खेळाडू कोरोना बाधित आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी अमेरिकेत इंडियन वेल्स टेनिस स्पर्धादेखील रद्द करण्यात आली. स्पॅनिश फुटबॉल लीग ला लीगला दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आले आहे. रियल माद्रिद क्लबला थांबवण्यात आले. भारताचा विचार करता, ६ ते ८ एप्रिलदरम्यान भोपाळमध्ये होणारी अॅथलेटिक्स ज्युनिअर फेडरेशन कप स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. इंडिया ओपन २४ ते २९ मार्चदरम्यान दिल्लीतील बॅडमिंटन स्पर्धेत प्रेक्षकांवर बंदी घालण्यात आली आहे. १८ ते २२ मार्चदरम्यान बंगळुरूत होणारी बास्केटबॉल ३ ऑन ३ ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. १४ मार्चला गोवा येथे होणार्या फुटबॉल आयएसएल फायनल प्रेक्षकांविना खेळविण्यात येईल. १९ ते २२ मार्चदरम्यान गोल्फ इंडिया ओपन रद्द तसेच सर्व राष्ट्रीय, राज्यस्तरीय पॅरा स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. १५ ते २५ मार्च दरम्यान दिल्लीत होणारी नेमबाजी विश्वचषक स्पर्धा देखील रद्द करण्यात आली आहे. इतक्या मोठ्याप्रमाणात विविध स्पर्धा रद्द झाल्या असल्या तरी चर्चा सुरु आहे ती केवळ आयपीएल स्पर्धेची...
बीसीसीआयसह आयपीएल आयोजकांना कोरोनाचा फटका
आयपीएलला सोन्याचे अंडी देणारी कोंबडी देखील म्हटले जाते. आयपीएलची सुरुवात यंदा २९ मार्चपासून मुंबईत होणार आहे. कोरोना संक्रमणामुळे आयपीएल आयोजनाविषयी बीसीसीआयने अद्याप मौन पाळले असले, तरी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने यंदा आयपीएलचे आयोजन प्रेक्षकांविना करावे लागेल, असे संकेत दिले आहेत. रिकाम्या स्टेडियममध्येच सामने घ्यावेत, असा सरकारचा आग्रह आहे. दुसरीकडे १५ एप्रिलपर्यंत व्हिसा देण्यावर बंदी आणल्यामुळे स्पर्धा झाली तरी सुरुवातीच्या काही सामन्यांत विदेशी खेळाडूंना सहभागी होता येणार नाही. कारण आयपीएलच्या ८ संघांत १८९ खेळाडूंचा समावेश आहे. यात ६४ विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. यासाठी स्पर्धेदरम्यान खेळाडूंना खेळवण्यासाठी सरकारकडून परवानगी घ्यावी लागेल. व्हिसा बंदी आणि विमान प्रवासात कोरोना व्हायरसची लागण होण्याची भीतीमुळे आयपीएलच्या सुरुवातीच्या टप्प्यात विदेशी खेळाडू मैदानावर दिसणार नाहीत. आयपीएलमुळे बीसीसीआयची तिजोरी भरते, मात्र कोरोना व्हायरसचा फटका यावेळी बीसीसीआयसह आयपीएल आयोजकांना बसणार आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असलेल्या या स्पर्धेतील लढती प्रेक्षकांविना खेळवण्यात आल्यास तिकीट विक्रीमधून मिळणार्या नफ्याला त्यांना मुकावे लागणार आहे. दुसर्याबाजूने विचार केल्यास, स्टेडियममध्ये होणार्या तिकिट विक्रीतून कोणत्याही संघाला ८ ते १० कोटी रुपये मिळतात. ही कमाई खूपच कमी आहे आणि बीसीसीआय याची भरपाई करू शकते. फक्त एक टक्के लोक आयपीएल बघायला स्टेडियममध्ये उपस्थित राहतात. बाकी सर्व चाहते टीव्ही किंवा मोबाइलवरून आयपीएल बघतात. त्यामुळेच कोरोनामुळे आयपीएल टाळल्यास प्रसारण करणार्या कंपन्यांना मोठे नुकसान होऊ शकते. तसेच संघ मालकांनाही मोठा आर्थिक दणका बसेल.
स्टार स्पोर्ट्स वाहिनीचेही मोठे नुकासान
कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमियर लीग पुढे ढकलली गेली तर ते कधी होणार असा प्रश्न आहे. कारण आयपीएल खेळण्यासाठी टीम इंडिया व अन्य खेळाडूंकडे मे नंतर वेळ नसेल. आयपीएलनंतर लगेचच भारताला आशिया चषक, विश्वचषक यांसारख्या मोठ्या स्पर्धा खेळाव्या लागतील, मग आयपीएलची तारीख कशी ठरविली जाईल? म्हणजे कोरोनामुळे आयपीएल पुढे ढकलली जाणार नाही तर सरळ रद्द होईल. आयपीएल रद्द झाल्यामुळे बीसीसीआयला मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. बीबीसीआयने याआधीच संघ मालकांना देण्यात येणार्या रकमेत ५० टक्के कपात केली आहे. याआधी प्रत्येक मालक संघाला ५० कोटी रुपये मिळत असत. यापुढे २५ कोटीच रुपये त्यांना मिळतील. याशिवाय ज्या ठिकाणी आयपीएलचे सामने होणार आहेत, त्या क्रिकेट संघटनांना प्रत्येक वर्षी १.४ कोटी रुपयेही संघमालकांना द्यावे लागणार आहे. त्यामुळे मालक संघ आधीच नाराज आहेत. आतातर त्यांची नाराजी व आर्थिक अडचणी अजूनच वाढल्या आहेत. बीसीसीआयने आयपीएल स्पर्धाच रद्द करण्याचा निर्णय घेतल्यास मालक संघांसह स्टार स्पोर्ट्स वाहिनीचेही मोठे नुकासान होईल, कारण प्रीमियर लीगच्या सामन्यांच्या थेट प्रक्षेपणाचे पाच वर्षांसाठीचे हक्के स्टार स्पोट्स वाहिनीने १६,३४७ कोटी रुपये मोजून खरेदी केले आहेत. यंदा स्पर्धा रद्द झाल्यास स्टार स्पोट्सला तिन हजार कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसू शकतो. आयपीएल खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला तरी या स्पर्धेतील लढती प्रेक्षकांविनाच होतील. त्यामुळे ही स्पर्धा टीव्हीपुरतीच मर्यादित असेल, हे निश्चित आहे. शनिवार १४ मार्च रोजी बीसीसीआयची या विषयावर महत्त्वपूर्ण बैठक होणार असून त्यामध्ये याबाबत कोणता निर्णय घेते हे पाहणे रंजक ठरणार आहे.
Post a Comment