स्वराज्याचा अवमान करणार्‍या कपाळकरंट्यांना आवरा!

महाराष्ट्रातील किल्ले म्हणजे महाराष्ट्राचे वैभव. मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष. ‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ या शब्दांत सह्याद्रीच्या डोंगर-दर्यात वसलेल्या महाराष्ट्राचे यथार्थ वर्णन गोविंदाग्रजांनी केलेले आहे. या राज्याचा राकटपणा, कणखर आणि दणकट दगडांच्या वास्तू किल्ल्यांच्या रुपाने आजही टिकून आहेत. प्रत्येक गडाचा आणि किल्ल्याचा आपला स्वतंत्र असा एक इतिहास आहे. मात्र आज अनेक गडांची दुरावस्था झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या गड किल्ल्यांकडे केवळ पिकनिक स्पॉट म्हणून पाहण्याची मानसिकता तयार झाल्याने तेथे दारु पिऊन धिंगाणा घालणे, दारुच्या बाटल्यांसह फोटो काढणे, बाटल्या तिथेच सोडून जाणे असे प्रकार अलीकडच्या काळात खुप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यापार्श्‍वभूमीवर गड-किल्ल्यांचे पावित्र्य राखण्यासाठी तिथे मद्यपान करण्यास राज्य शासनाने बंदी घातली आहे. गड-किल्ल्यांवर मद्यपान केल्यास १० हजारांचा दंड आणि सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षेची तरतूद केली आहे. हा निर्णय आधीच व्हायला हवा होता मात्र ‘देर आये दुरुस्त आये’, असेच म्हणावे लागेल.


ऐतिहासिक ठेव्याबाबत आपण असंवेदनशील व बेजबाबदार

हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमवेत लाखों मावळे लढले, अनेकांनी प्राणाची आहुती देत कित्येक आक्रमणे परतवून लावली आणि स्वराज्यासाठी मोठे योगदान दिले. छत्रपती शिवरायांनी विजापूरच्या आदिलशाही आणि मुघल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून स्वराज्य स्थापन केले. या समृद्ध इतिहासाची साक्ष म्हणजेच हे गड-किल्ले. महाराष्ट्रात जवळपास ३५०हून अधिक किल्ल्यांची नोंद आहे. सर्वाधिक गड-किल्ले रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांत असून रायगड जिल्ह्याचा यात तिसरा क्रमांक लागतो. नाशिकही गड-किल्ल्यांच्या संख्येत चौथ्या क्रमांकावर असून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत गड-किल्ले आहेत. सह्याद्रीच्या कुशीत वास्तव्यास असलेल्या घनदाट जंगलांची निसर्गसंपत्ती महाराष्ट्राला लाभलेली आहे. या डोंगर रांगांतील किल्ले, त्यांचे देखणे रूप, मजबूत तटबंधी शिवकालीन इतिहास आपणासमोर आजही बोलका करतात. स्वराज्य उभे राहण्यात या गड किल्ल्यांचा सिंहाचा वाटा आहे. आपला इतिहास आपण अभिमानाने मिरवतो, शिवजयंती, शिवराज्याभिशेक दिनी मराठ्यांच्या शौर्याचे आपण गुणगाण गातो, पण प्रत्यक्षात या ऐतिहासिक ठेव्याबाबत आपण असंवेदनशील व बेजबाबदारपणे वागतो. याचा विचार कुणीच करत नाही. राज्यातील अनेक गडकिल्ल्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. बहुतांश गड-किल्ल्यांत ढासळलेल्या भितींवर कोरलेली नावे व खुणा, कचर्‍याचे ढीग आढळतात. 

गड किल्ल्यांवर दारु पिणार्‍यांना फटके देणार्‍या शिवप्रेमींचे कौतुकच

अलीकडच्या काळात गड-किल्ले हा पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय आहे. अनेक पर्यटक किल्ले पाहायला जातात. हल्ली तर पिकनिक पॉईन्टसह थर्टी फर्स्ट किंवा एखाद्याच्या वाढदिवासाच्या पार्टीचे सेलिब्रेशनसाठी सुध्दा ऐतिहासिक ठिकाणांना पसंती दिली जात आहे. साहसी खेळ खेळण्यासाठी किंवा गिर्यारोहणासाठी अनेक हौशी पर्यटक व ट्रेकर्सचा ओढा गड किल्ल्यांकडे वाढत आहे. मात्र हे करत असताना त्या पवित्र जागांचे पावित्र्य भंग होते, याकडेही आपले लक्ष नसते, इतका कपाळकरंटेपणा कोठून आला? ज्या गड किल्ल्यांवर स्वराज्य उभे करतांना हजारो मावळ्यांचे रक्त सांडले तेथे दारु पितांना थोडी देखील लाज कशी वाटत नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ले लग्नसोहळ्यांसाठी भाड्याने देण्याच्या राज्य सरकारच्या विचारावर जोरदार टीका झाली होती. मात्र त्यावर सरकारने दोन पावले मागे घेतल्याने हा वाद शमला. आज शासनदप्तरी किल्ल्यांची वर्गवारी करण्यात आलेली आहे. शिवरायांचा इतिहास लाभलेले सर्व गड-किल्ले हे वर्ग-१ मध्ये येतात. वर्ग-१च्या गड-किल्ल्यांची संख्या २५च्या घरात येते. वर्ग-२ मधील गड-किल्ल्यांमध्ये सगळ्या ऐतिहासिक किल्ल्यांव्यतिरिक्त अन्य किल्ले येतात. त्यांनाही काही ना काही ऐतिहासिक वारसा लाभलाच आहे. परंतु त्यांच्या संवर्धनाबाबत यावर राज्यकर्ते मग सरकार कुणाचेही असो, आजपर्यंत ठोस भुमिका कुणीच घेतली नाही. या गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपण्यासाठी शिवप्रेमींच पुढे सरसावले. गड किल्ल्यांवर दारु पिऊन धिंगाणा घालणार्‍यांना फटके देणार्‍या शिवप्रेमींचे कौतुकच करायला हवे. गड किल्ल्यांचा गौरवशाली इतिहास नुसताच चित्रपटातून किंवा पुस्तकातून नव्हे तर प्रत्यक्षात सुद्धा आपल्या आजच्या पिढीने बघितला पाहिजे. गड किल्ल्यांवर येणारे बहुतांश पर्यटक फक्त मौज-मजेसाठी येतात. गड किल्ल्यांवर येण्याचा आनंद प्रत्येकाने घ्यावाच, पण त्याचबरोबर या पुरातन वास्तूंचे ऐतिहासिक महत्वही जाणून घ्यायला हवे. याकरीता सर्वप्रथम गौरवशाली इतीहासाची साक्ष देणार्‍या या सर्व गड, किल्ल्यांचे संवर्धन होणे अत्यंत गरजेचे आहे.

गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ठोस कृती कार्यक्रमाची अपेक्षा

इतिहासाची साक्ष देणार्‍या गडकिल्ल्यांच्या पावित्र्याचे जपणे आवश्यक आहे. महाराष्ट्राचा हा समृद्ध वारसा एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे जात असताना, त्याला गालबोट लागू नये. शेकडो वर्षांपूर्वी बांधलेल्या व पुढील अनेक वर्षे हा ऐतिहासिक वारसा टिकून राहील याची खात्री असलेल्या या पुरातन वास्तूंचे वैभव जास्तीत जास्त काळ टिकवून ठेवण्याची आपणा सर्वाची जबाबदारी आहे. परदेशात अशा ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन संवेदनशीलतेने जोपासण्याची परंपरा आहे. किंबहुना राजस्थानमध्ये अनेक गड किल्ल्यांचे योग्य पध्दतीने संवर्धन केले जात असल्याने ते आजही सुस्थिती दिसून येतात. गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन हे खरे पाहता खर्चिक काम तसेच त्याची जबाबदारी सरकारची आहे पण कचरा न टाकणे, किल्ल्यांवर नावं न कोरणे, साफसफाई करणे, झाडे लावणे, ऐतिहासिक महत्त्व सांगणार्‍या चित्रफिती, फिल्म, परिसंवाद, पुस्तके याद्वारे प्रबोधन करणे या सहजशक्य गोष्टी वैयक्तिक पातळीवर करणे प्रत्येक शिवप्रेमीला सहज शक्य आहे. शिवाजी महाराजांना डोक्यावर नको तर डोक्यात घ्या, असे आपण म्हणतो. त्यावर कृती करण्याची वेळ आली आहे. राज्यसरकारनेही गड-किल्ल्यांवर मद्यपानास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे, त्याबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व त्यांच्या सरकारचे मन:पूर्वक धन्यवाद. परंतू येथेच न थांबता आता ठाकरे सरकारने गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ठोस कृती कार्यक्रमाची आखणी करण्याची अपेक्षा आहे.

Post a Comment

Designed By Blogger