प्रशांत किशोर एक फसलेला ‘चाणक्य’!

‘अब की बार मोदी सरकार’ ही लोकप्रिय घोषणा असो किंवा ‘चाय पे चर्चा’ हा सर्वात गाजलेला उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर जे नाव समोर येते ते प्रशांतकिशोर(पीके)यांचे! २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी, त्यानंतर नितीश कुमार यांना विजय मिळवून दिल्यानंतर पीके राजकारणातील ‘चाणक्य’ म्हणून ओळखले जावू लागले. पंजाबमध्ये काँग्रेसला किंवा महाराष्ट्रात शिवसेनेला मिळालेल्या यशामागेही पीकेंचेच नाव घेतले जाते. राजकीय पक्षांना एकामागून एक निवडणुका जिंकवून देत राष्ट्रीयपातळीवर राजकीय रणणितीकार म्हणून ओळखले जाणारे पीके सुरुवातीपासून ‘किंगमेकर’च्याच भुमिकेत राहीले. मात्र अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून पाहिल्या गेलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत पीके यांनी नितीश कुमार यांना एकहाती सत्ता मिळवून दिली. नितीश यांनी पुन्हा मुख्यमंत्री होताच प्रशांतकिशोर यांना बक्षीस म्हणून कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला. यामुळे ‘किंगमेकर’ असणारे पीके स्वत: ‘किंग’ बनले. मात्र अवघ्या काही महिन्यात त्यांची पदासह पक्षातूनही हकालपट्टी करण्यात आल्याने राजकीय रणनीतीकारच फसला, असे म्हटल्यास ते पुर्णपणे चुकीचे ठरणार नाही.


निवडणूक रणनितीकार म्हणून काम 

३८ वर्षीय प्रशांत किशोर हे उत्तर प्रदेशच्या बलियाचे रहिवाशी आहेत. शिक्षण पुर्ण केल्यानंतर ते संयुक्त राष्ट्राच्या ‘हेल्थ मिशन’साठी दक्षिण आफ्रिकेतील प्रमुख म्हणून काम करत होते. मात्र त्यांच्या नशिबात नोकरीऐवजी दुसरेच काही लिहीले असल्याने अचानक त्यांची पाऊले राजकरण या क्षेत्राकडे वळली. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु असताना; मोदींच्या प्रचारासाठी प्रशांतकिशोर आफ्रिकेतील नोकरी सोडून भारतात आले. देशातील राजकारण आणि निवडणुकांत काम करण्यासाठी सिटीझन्स फॉर अकाऊंटेबल गव्हर्नन्स कंपनीची स्थापना केली. या कंपनीद्वारे मोदींच्या प्रचाराची धुरा हाती घेतली. मोदींच्या सोशल मीडियाची संपूर्ण जबाबदारी प्रशांत किशोर यांच्याकडे होती त्यावेळी त्यांनी ‘अब की बार मोदी सरकार’ या टॅगलाईनची घोषणा केली जी प्रचंड यशस्वी ठरली त्यानंतर ‘चाय पे चर्चा’ हा त्यांचा उपक्रमही गाजला. प्रशांत किशोर यांच्याच रणनीतीमुळे पंतप्रदान नरेंद्र मोदी हे गुजरातच्या गल्लीपासून राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचले. दरम्यानच्या काळात पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा यांच्याशी मतभेद झाल्यानंतर पीके भाजपापासून दुरावले. २०१४ साली लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी निवडणूक रणनितीकार म्हणून काम करत असताना प्रशांत किशोर हे नितीश कुमार यांच्या संपर्कात आले होते. पुढे २०१५ मध्ये बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल, जेडीयू आणि काँग्रेस यांच्या महाआघाडीचा प्रचार झंझावात उभा करण्याचे श्रेय पीकेंनाच जाते. या निवडणुकीमध्ये भाजपला मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. 

जेडीयूमधील राजकीय प्रवास

बिहार विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या काटेकोर नियोजनामुळेच नितीश कुमार यांना सत्ता राखता आली. नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव एकत्र येण्यातही प्रशांत यांचा मोठा वाटा होता. ‘बिहार में बाहर हो, नितीश कुमार हो’ यासारख्या घोषणा प्रशांत किशोर यांचीच कल्पना आहे. त्यामुळे राजकारणातील हा ’चाणक्य’ आपल्या बाजूला यावा, यासाठी विविध पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली. यामध्ये काँग्रेससह पश्चिम बंगाल, आसाम आणि तामिळनाडूतील सत्ताधार्‍यांचा समावेश होता. उत्तर प्रदेश निवडणूक डोळ्यासमोर ठेवून, प्रशांत किशोर यांना आपल्याकडे खेचण्यासाठी काँग्रेसने तयारी केली होती. मात्र प्रशांत किशोर आपल्यासोबतच रहावेत अशी इच्छा खुद्द नितीश कुमार यांची असल्याने त्यासाठी ते प्रशांत यांना राज्यसभा खासदारही करण्याच्या तयारीत होते. मात्र प्रशांत यांनी नितीश यांची राज्यसभेची ऑफर नाकारल्याने त्यांना बक्षीस म्हणून कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला. येथूनच त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. प्रशांतकिशोर यांचा सारखा जाणकार रणनितीकार सोबत असल्याने पक्षाला फायदा होईल, अशी अपेक्षा नितिश कुमार यांना होती. मात्र प्रशांतकिशोर यांच्या आगमनानंतर जेडीयूमधील अनेक जुने नेते अडगळीत पडले. त्यामध्ये आर. सी. पी. सिंह आणि लल्लन सिंह यांचाही समावेश होता. याचदरम्यान जेडीयूचे लालूंच्या राष्ट्रीय जनता दलासोबतचे संबंध तुटले. तरीही प्रशांतकिशोर यांचे पक्षातील वजन वाढतच राहिले, त्यांना पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष करण्यात आले होते. नितीश यांच्यानंतर पक्षात पीकेंचे स्थान निर्माण झाले होते. 

खरे किंग व किंगमेकर हे नितिश कुमारच

प्रशांतकिशोर हे भवितव्य असल्याचे जाहीर वक्तव्य नितीश यांनी केल्यानंतर जेडीयूमधील अनेक नेतेमंडळी अस्वस्थ झाली होती. पुढे तर पीकेंनी पक्षातील नेत्यांच्या बैठकाही घ्यायला सुरुवात केली. यामुळे पक्षातीलच काही नेत्यांनी पीकेंच्या विरोधात जोरदार मोर्चेबांधणी केली. याच काळात जेडीयूमध्ये बाजूला पडलेले आर. सी. पी. सिंह आणि लल्लन सिंह यांच्यातील संबंध अधिक दृढ झाले. आर. सी. पी. सिंह यांनी दिल्ली भाजपमध्ये लॉबिंग करीत अमित शहांसोबत मैत्री प्रस्थापित केली. हे सगळे घडत असतानाच प्रशांतकिशोर यांनी थेट पक्षाचे नेते नितीश यांच्यावरच निशाणा साधला. यामुळे नितिश कुमार नाराज झाले. याची फलश्रुती म्हणून मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी मात्र नितीश यांनी पीकेंना जाणीवपूर्वक बाजूला ठेवत आर. सी. पी. सिंह यांना जवळ केले. यामुळे त्यांच्यातील दुरावा वाढत गेला. आता नागरिकत्व कायद्यावरून जेडीयू भाजपच्या पाठीशी उभा राहिला असताना पीकेंनी मात्र त्याविरोधात विधाने केली. पुढे हा वाद वाढत गेला आणि त्यातून पीकेंची राजकीय विकेट पडली. कधीकाळी ज्या नितीश यांनी पीकेंच्या राजकीय कौशल्याचे कौतुक करीत त्यांना डोक्यावर घेतले, त्याच नितीश यांनी आज पीकें’ना बाहेरचा रस्ता दाखविला. राजकारणात एक प्रसिध्द म्हण आहे, ‘न थिंग इज परमन्टंट’ ही येथे तंतोतंत लागू पडते. प्रशातकिशोर हे कसलेले खेळाडू आहेत मात्र ते पक्षाच्या धोरणांच तिलांजली देवून त्या विरोधात विधाने करत असल्यामागे त्यांनी निश्‍चितपणे काही गणितेही असतील मात्र नितिश कुमारांसारख्या धुरंधर व अनुभवी राजकारण्याला शह देण्याची त्यांची खेळी फसल्याने त्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. या कारवाईमुळे एक प्रसिध्द राजकीय रणनितीकारच फसल्याने खरे किंग व किंगमेकर हे नितिश कुमारच असल्याचे सिध्द झाले आहे.

Post a Comment

Designed By Blogger