लालकृष्ण अडवाणी एक शापित राजहंस


लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने गुरुवारी १८४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, राजनाथ सिंह, अमित शाह यांना स्थान मिळाले आहे. मात्र १९९८ पासून गांधीनगर मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे भाजपाचे भिष्मपितामह लालकृष्ण अडवाणी यांच्या ऐवजी भाजपाने या मतदार संघातून अमित शाह यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे ९१ वर्षीय अडवाणी यांच्या राजकीय पर्वाचा अस्त होण्यास सुरुवात झाली आहे. इतिहासाची पाने उलगडल्यास महाभारतात कर्ण व शिवकाळात संभाजी महाराज यांना शापित राजहंस ही उपमा तंतोतंत लागू पडते. वर्तमान काळाचा विचार केल्यास लालकृष्ण अडवाणी याच पंगक्तीत बसतात. भाजपाच्या राजकीय प्रवासात अडवाणी यांचे मोलाचे योगदान आहे. पक्षात पूर्वी अटल बिहारी वाजपेयींच्या खालोखाल अडवाणींचे स्थान होते. लोकसभेत दोन खासदारांवरुन थेट केंद्रात सत्तास्थापन करण्यापर्यंतची त्यांचा राजकीय प्रवास प्रचंड खाचखळग्यांनी भरला आहे. पंतप्रधानपदानंतर राष्ट्रपती पदाचीही इच्छा पूर्ण न झाल्यानंतर आता तर त्यांना खासदारकीचे तिकीटही नाकारण्यात आल्याने भाजपात अडवाणी युग संपल्याचे प्रतिक मानले जात आहे.

भक्कम पाया अडवाणी यांनी रचला 

देशाच्या राजकारणात भाजप, वाजपेयी व अडवाणी हे एक समिकरण आहे. जनसंघ ते जनता पक्ष ते भारतीय जनता पक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. भाजपात अटल बिहारी वाजपेयींच्या खालोखाल अडवाणींचे स्थान होते. लोकसभेत केवळ दोन सदस्य असलेल्या भाजपाला सभागृहातला सर्वांत मोठा पक्ष हे स्थान प्राप्त करून देण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. पुढे जाऊन केंद्रात इतर पक्षांसोबत युती करून का होईना, पण आधी तेरा दिवस-मग तेरा महिने-नंतर पूर्ण टर्म सत्ता मिळवून दिली. आता तर त्यांचा पक्ष केंद्रात आणि अनेक राज्यात स्वबळावर सत्तेत आहे. या यशाच्या मंदीराचा कळस जरी नरेंद्र मोदी यांनी ठेवला असला तरी त्याचा भक्कम पाया अडवाणी यांनी रचला आहे. आता पाकिस्तानात असलेल्या कराचीत ८ नोव्हेंबर १९२७ रोजी जन्मलेले लालकृष्ण अडवाणी त्यांच्या शालेय व महाविद्यालयीन शिक्षणानंतर झालेल्या फाळणीनंतर भारतात आले. त्यानंतर १९४२ पासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले. तेव्हापासून ते राजकीय आणि सार्वजनिक जीवनात आजवर सक्रीय आहेत. संघाचे ते पूर्ण वेळ प्रचारक होते. नंतर त्यांना जनसंघात पाठवण्यात आले. लालकृष्ण अडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी हा पक्ष शून्यातून राष्ट्रीय पातळीवर उभा केला. 

सुगीच्या दिवसात अडवाणी यांना पूर्णपणे बाजूला टाकण्यात आले

१९९१ मध्ये पहिल्यांदा गांधीनगरमधून निवडून आल्यानंतर अडवाणी यांनी रथयात्रा काढली होती. राम मंदिरसाठी काढलेल्या या रथयात्रेने भारतीय राजकारणाची दिशा बदलली. या रथयात्रेमुळे भाजपा घराघरात पोहचविण्यात अडवाणींना यश आले. तब्बल सात दशके एकाच ध्येयाने झटल्यानंतर पक्षाला यश मिळाल्यानंतर देशाच्या उपपंतप्रधानपदापर्यंत लालकृष्ण अडवाणी पोहोचले. उपपंतप्रधान असतांनाही अडवाणी हेच केंद्रीय सरकारचे सर्वेसर्वा होते. दरम्यानच्या काळात १९९६, १९९८ आणि १९९९ च्या निवडणुकीत भाजपच्या यशाची कमान चढती होती. २००४ पाठोपाठ २००९च्या लोकसभा निवडणुका भाजपने लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या, मात्र यानंतर त्यांच्या हुकुमतीला उतरती कळा लागली. भाजपाने देशभरात सर्वत्र नेत्रदीपक यश संपादन केल्यानंतर आलेल्या सुगीच्या दिवसात वाजपेयी प्रकृती अस्वास्थ्यामुळे बाजूला पडले, तर अडवाणी यांना पूर्णपणे बाजूला टाकण्यात आले, यास मोठी शोकांतिक म्हणावी लागेल. दरम्यानच्या काळात पाकिस्तानात जाऊन लालकृष्ण अडवाणी यांनी बॅरिस्टर जीना यांच्याबद्दल गौरवोद्गार काढून संघाची नाराजी ओढवून घेतली. याच काळात मोहन भागवत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक झाले. भागवत संघात जसजसे सर्वशक्तिमान होत गेले, तसतसे अडवाणी यांचे पक्षातले स्थान डळमळीत होत गेले. आधी लोकसभेतील विरोधी पक्ष नेतेपद लालकृष्ण अडवाणी यांच्याकडून काढून सुषमा स्वराज यांच्याकडे देण्यात आले. यानंतर संघाचे नितीन गडकरी यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बसविण्यात आले. नंतर पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांना समोर आणले गेले. 

मोदी युगाची सुरुवात अन अडवाणी युगास घरघर

२०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवड झाली आणि अडवाणी याचे पंतप्रधानपदाचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. येथून देशात मोदी युगाची सुरुवात झाली व त्याच वेळी अडवाणी युगास घरघर लागली. ज्या अडवाणींनी २००२ साली गुजरातच्या जातीय दंगलीतील सहभागामुळे मुख्यमंत्रीपद अडचणीत आलेले असताना मोदी यांना अभय दिले होते, त्या अडवाणींना मोदी विसरले. अडवाणींनी पक्षाच्या ‘सल्लागार मंडळात’ बसवून अडगळीत टाकण्यात आले. एपीजे अब्दूल कलाम यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रपती पदासाठी अडवाणींचे नाव चर्चेत आले. मात्र त्याच वेळी बाबरी मस्जीद पाडल्याचा खटला ऐन राष्ट्रपती निवडणुकीच्या तोंडावर उकरून काढण्यात आला. त्यांना राष्ट्रपतीपदापासून दूर ठेवण्याची ही नियोजनबध्द खेळी होती, यामुळे त्यांना राष्ट्रपती पदही मिळाले नाही. मात्र यामुळे त्यांची पंतप्रधान होण्याची प्रकट आणि राष्ट्रपती होण्याची सुप्त महत्त्वाकांक्षा फलद्रूप झालीच नाही. यास मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल. ज्या व्यक्तीने जीवनाची सात दशके पक्षाला दिली त्याच पक्षाने त्यांना सुगीच्या दिवसात वार्‍यावर सोडले, यालाच पार्टी विथ डिफरन्स म्हणावे का? लालकृष्ण अडवाणी यांच्या सारखे अविश्रांत कठोर श्रम घेतलेला, अनुभवी नेता दुसरा कोणीही नाही. आता भाजपाच्या पहिल्या यादीत त्यांना संधी देण्यात आलेली नाही. आता अडवाणी यांना दुसर्‍या मतदार संघातून उमेदवारी दिली जाते की त्यांच्या कुटुंबातून कोणाला संधी दिली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून अडवाणी यांना लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यास भाजपामध्ये अडवाणी युगाचा अस्त होईल, हे कटू सत्य स्विकारावेच लागेल!

Post a Comment

Designed By Blogger