राष्ट्रवादीकडे तगडे उमेदवार नसल्याने अ‍ॅड.निकम,खडसेंच्या नावाचा वापर!


लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जळगाव जिल्ह्यात राजकीय फटाके फुटत आहे. सर्वच पक्षांनी वजनदार नेत्यांचा शोध सुरु केला आहे. यात राष्ट्रवादीतर्फे ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांच्यासह भाजपाचे आमदार एकनाथराव खडसे यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे. यावर प्रतिक्रीया देतांना अ‍ॅड.निकम यांनी होकार किंवा नकार देण्याऐवजी ‘नो कमेंट्स’ असे संदिग्ध उत्तर दिल्याने गोंधळ अजूनच वाढला आहे. दुसरीकडे खडसे यांनी पक्ष सोडणार नसल्याचा पुर्नउच्चार केला आहे. मात्र राष्ट्रवादीकडे तगडे उमेदवार नसल्याने अशी गुगली टाकून संभ्रम निर्माण केला जात असल्याची टीका भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी केली आहे.


निवडणुकीचे पडघम वाजण्याआधीच जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघ विविध कारणांमुळे चर्चेत आहेत. काँग्रेस संघर्ष यात्रेनिमित्ताने फैजपूर येथे झालेल्या सभेत राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या रावेरच्या जागेवर काँग्रेसनेत्यांनी दावा केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यासह लोकसभेतील नेते मल्लिकार्जून खरगे यांनीही यांनीही त्यात होकार भरला. या जागेसाठी काँग्रेसचे माजी खासदार डॉ.÷उल्हास पाटील हे इच्छुक आहेत, हे जगाजाहिर आहे. गेल्या वर्षभरापासून ते या जागेसाठी लॉबिंगदेखील करत आहेत. विशेष बाब म्हणजे ही जागा सोडण्याची मानसिकता राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येही वारंवार दिसून आली आहे. या मतदारसंघावर भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांची चांगली पकड निर्माण झाली आहे. त्यांचे रिपोर्टकार्ड खराब असल्याने भाजपा दुसरा उमेदवार देवू शकतो, अशी चर्चा मध्यंतरी रंगली होती. मात्र दिल्लीदरबारी रक्षा खडसे यांची प्रतिमा व वजन दिवसेंदिवस उंचावत असल्याचे दिसून येत असल्याने त्यांनाच उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत. येथून एकनाथराव खडसे यांच्याही लोकसभा उमेदवारीची चर्चा सुरु आहे. 

मात्र राज्यात व केंद्रात भाजपाला एक-एक जागा महत्वाची असल्याने भाजपा स्थानिकपातळीवरील वादामुळे जागा हातातून सुटू देणार नाही, असे वरिष्ठ पातळीवरील सुत्रांचे म्हणणे आहे. निवडणूक दोन-तिन महिन्यांवर येवून ठेपली असतांना नवखा उमेदवार देणे पक्षाला परवडणारे नाही. अन्य पक्षातील उमेदवार आयात करुन त्याला निवडणून आणण्याचा गिरीश महाजन पॅटर्न या मतदारसंघात यशस्वी होणार नाही, हे भाजापाचे नेते खाजगीत मान्य करतात. यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघासाठी नाथाभाऊंच्या पसंतील उमेदवाराला महत्व आहे. नारायण राणे यांची दिल्ली गेल्यानंतर झालेली अवस्था पाहता स्वत: नाथाभाऊ दिल्ली जाण्यास उत्सूक नाहीत. त्यांनी राज्यातच थांबावे, असे मानणारा मोठा गट असून त्यात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचाही समावेश आहे. दुसरीकडे जळगाव लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीने अ‍ॅड.उज्ज्लल निकम यांचे नाव अचानक पुढे करत नवी खेळी खेळली आहे. मात्र अ‍ॅड.निकम हे केवळ राज्यपातळीवर नव्हे तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर वलय असलेले व्यक्तीमत्व आहे. त्यांना संसदेत जायचे असल्यास त्यांना राज्यसभेसाठी कोणताही पक्ष उमेदवारी देवू शकतो. राष्ट्रपतींव्दारे नियुक्त केल्या जाणार्‍या खासदारांमध्येही अ‍ॅड.निकम यांचे नाव अग्रस्थानी राहील, असे असतांना ते स्थानिकपातळीवर उमेदवारी घेणार नाही, असा सुर राजकीय पातळीवर उमटत आहे. तसेच केंद्रात कोणत्या पक्षाची सत्ता येते यावर देखील अ‍ॅड.निकम यांची रणनिती निश्‍चित होणार असल्याने ते सध्यातरी भाजप विरोधात उमेदवारी घेणार नाहीत, असे मानणार्‍यांचा गट मोठा आहे. 

दुसरी महत्वाची बाब म्हणजे जळगाव लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे माजी आमदार आर.ओ.पाटील यांनी गेल्या वर्षभरापासून जय्यत तयारी सुरु केली आहे. युती न झाल्यास सेनेतर्फे त्यांची उमेदवारी निश्‍चित आहे व युती झाल्यास ते सेनेच्या छुप्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवारी दाखल करण्याची अटकळ बांधली जात आहे. या मतदारसंघात सेनेची ताकद मोठी असल्याने भाजप व राष्ट्रवादीसमोर मोठी आव्हाने आहेत. याची जाणीव अ‍ॅड.निकम यांना निश्‍चित असल्याने जळगावमधून राष्ट्रवादीतर्फे त्यांची उमेदवारी ही केवळ एक ‘पावर’फुल्ल खेळी असल्याचे बोलले जात आहे. दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीकडे तगडा उमेदवार नसल्याने अशाप्रकारे राजकीय धुराळा उडवला जात असल्याची टीका भाजपाकडून करण्यात येत आहे. या विषयावर प्रतिक्रीया देण्यास एकनाथराव खडसे यांनी नकार दिला असून यावर तुम्ही पवार साहेबांनाच विचारा, असे म्हणत त्यांनी सरपेंन्स कायम ठेवला आहे.

Post a Comment

Designed By Blogger