शिवसेनेचा राष्ट्रवादीसोबत घरोबा तर कॉंग्रेसचे भाजपासोबत ‘लिव्ह इन रिलेशन’


राज्यात भाजप - शिवसेना ‘युती’ व कॉंग्रेस - राष्ट्रवादी ‘आघाडी’ असे राजकीय समिकरणे आहे. यास जळगाव जिल्हाही अपवाद नाही. चारही पक्षांच्या राजकीय संसारात कितीही भांडणे झाले तरी घटस्फोटापर्यंत वाद पोहचला नव्हता. मात्र यंदा प्रथमच भाजपाने - शिवसेनेसोबत तर राष्ट्रवादीने कॉंग्रेससोबत काडीमोड घेतला आहे. यामुळे जिल्ह्यात नविन समिकरण तयार झाले असून शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत संसारा थाटला आहे. तर कॉंग्रेस ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये भाजपा सोबत गेल्याचे चित्र नुकतेच पार पडलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिसून आले. हा चारही पक्षांचा नवा संसार केवळ जिल्हा परिषदेपुरता मर्यादित न राहता आगामी काळात होवू घातलेल्या महानगरपालिका निवडणूकीतही राहण्याचे संकेत सर्वच पक्षांच्या नेत्यांनी दिले आहे.

गेल्या तिन पंचवार्षिकपासून भाजप शिवसेना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका स्वंतत्र लढत असल्यातरी अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून दोन्ही पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे. यंदाही तेच समिकरण अपेक्षित होते. कारण भाजपा-सेनेने स्वतंत्र निवडणूक लढविली असली तरी दुसरीकडे त्यांचे कट्टर विरोधक राष्ट्रवादी व कॉंग्रेसने एकत्रित येत निवडणूक लढवली. एकमेकांच्या विरोधात उमेदवार न दिल्याने मतांचे विभाजन टळून जिल्हा परिषदेत आघाडीची सत्ता आणण्याचा मानस दोन्ही कॉंग्रेसचा होता. निवडणूक काळा दरम्यान किरकोळ वाद वगळता दोन्ही कॉंग्रेसने एकत्रितरित्या मेहनत देखील घेतली. यामुळे मतमोजणीच्या दिवसापर्यंत कोणत्या पक्षाला किती यश मिळेल. हे सांगणे अवघड झाले होते.

मात्र गल्लीपासून दिल्लीपर्यंत उधळणारा भाजपाच्या वारूने जळगाव जिल्ह्यातही धुमाकूळ घातला. मतमोजणीपूर्वी भाजपाला २७ ते २८ जागा मिळतील अशी अपेक्षा खुद्द भाजपाच्या नेत्यांना असतांना भाजपाने सर्वांधिक ३३ जागांवर विजय मिळविला. यामुळे सत्ता स्थापनेसाठी त्यांना केवळ एका मताची आवश्यकता उरली. शिवसेनेनेही समोरील परिस्थिती ओळखून भाजपाकडे मैत्रीचा हात पुढे केला. मात्र काहीही झाले तरी शिवसेनेला सत्तेत वाटेकरी होवू द्यायचे नाही असा विडाच माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उचलला होता. याच काळात कॉंग्रेसचा एक सदस्य भाजपाच्या गळाला लागला. यामुळे भाजपा जादूई ३४ चा आकडा गाठेल असे स्पष्ट झाले. येथूनच भाजप शिवसेनेच्या गेल्या २० ते २५ वर्षाच्या संसाराला तडा गेला. ईर्षेला पेटलेल्या सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ.सतिष पाटील यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यास कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.संदिप पाटील यांनीही पाठींबा दिला. यामुळे भाजपा विरूध्द शिवसेना - राष्ट्रवादी - कॉंग्रेस असे नवे समिकरण उदयास आले. मात्र भाजपाच्या मनात काही वेगळेच चालले होते. याची प्रचिती जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणूकीत आली. शिवसेना व राष्ट्रवादी यांनी भाजपाला एकत्रित प्रखर विरोध केला मात्र याच वेळी भाजपाच्या कमळाला कॉंग्रेसचा हात मिळाल्याने त्यांनी निवडणूक जिंकली. कॉंग्रेसच्या चारही सदस्यांनी भाजपला उघडपणे मतदान केले. कॉंगे्रेसने ऐनवेळी केलेल्या दगाफटक्यामुळे राष्ट्रवादीलाही धक्का बसला आहे.

या पार्श्वभूमीवर आ.खडसे यांना विचारले असता त्यांनी कॉंग्रेसला सत्तेत वाटेकरी करण्याचे संकेत दिले. दुसरीकडे ना.महाजन यंानीही हे समिकरण आगामी जळगाव महापालिका निवडणूकीत देखील राहण्याचे सांगितले. यामुळे महापालिका निवडणूक शिवसेना व राष्ट्रवादी एकत्रित लढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यपातळीवर देखील भाजप शिवसेनेचे संबंध दिवसेंदिवस ताणले जात आहे. तसेच उत्तर प्रदेश सह पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणूकीत प्रादेशिक पक्षांचा उडालेला धुव्वा पाहता. राज्यात भाजपाला रोखण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी एकत्रित येऊ शकतात, अशी शक्यता नाकारता येणार नाही!

Post a Comment

Designed By Blogger