शहराच्या हद्दीतून १३.९ किलोमीटर अंतरापर्यंत महामार्ग जातो. महामार्गावरून रोज हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. शिवकॉलनीपासून खोटनगर, आहूजानगर, बांभोरीकडील रहिवाशांना पर्यायी रस्ता नसल्यामुळे त्यांनादेखील महामार्गाचाच वापर करावा लागतो. यावर पर्याय म्हणून जुना नशिराबाद नाका ते बांभोरी पुलार्पयत समांतर रस्त्याचे नियोजन आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजुने ६० मिटरची जागा पूर्वीच नहीने संपादीत केली आहे. जवळपास १० किलोमिटरचा हा समांतर रस्ता प्रस्तावित आहे. मात्र या समांतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. गेल्या अनेक वर्षात या अतिक्रमणांना कोणीही हात न लावल्याने समांतर रस्ता गायब झाला यामुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. महामार्गावर प्रभात चौक ते शिव कॉलनी या रस्त्यावर सर्वाधिक अतिक्रमणे आहेत. फुलांच्या कुंड्या तयार करणारे, थंडीचे कपडे विक्री करणारे, खाद्य पदार्थ विक्रेते, लहान, मोठी दुकाने या भागात टाकण्यात आल्या आहेत. अजिंठा चौफुलीवर वाहनांचे पार्किग, वाहने विक्रीची दुकाने, गॅरेज लावण्यात आले आहेत. महामार्गावरील अग्रवाल हॉस्पिटल, शिव कॉलनी, गुजराल पेट्रोल पंप, विद्युत कॉलनी, खोटे नगर, अजिंठा चौक हे ठिकाण अत्यंत धोकादायक आहेत. महामार्गाला लागून अनेक ठिकाणी साईडपट्ट्या उंच आहेत. यामुळे येथे अपघांतांचे प्रमाण जास्त आहे. समांतर रस्ते व अतिक्रमणाच्या विषयावरुन सर्वपक्षीय पदाधिकार्यांनी गेल्या महिन्यात जिल्हाधिकार्यांची भेट घेवून चर्चा देखील केली होती. मनपा व नहीच्या अधिकार्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकित सविस्तर चर्चा झाल्यानंतर समांतर रस्त्यांबाबत मनपाने प्रस्ताव द्यावा, ना हरकत द्यावे अशी नहीच्या अधिका:यांनी भूमिका मांडली होती. तसेच महामार्गावरील अतिक्रमणे काढण्यासाठी मोहीम राबविण्याचेही जाहीर केले होते. मात्र यास अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.
समांतर रस्त्याच्या विषयावरुन महापालिका आधीपासून वेळ काढू धोरण अवलंबत आली आहे. महापालिकेने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सन २०११ मध्ये शहरातील महामार्गाची जागा समांतर रस्त्यासाठी स्वत:कडे हस्तांतर करून घेतली. पालिकेने सन २०१२-१३ पासून तर सन १४-१५ पर्यंत समांतर रस्ते पूर्ण करणे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले होते. यात पहिल्या टप्प्यासाठी अर्थसंकल्पात ११ कोटीं रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र हा विषय अजूनही मार्गी लागलेला नाही. यासाठी सर्वपक्षिय नेत्यांनी पुन्हा एकदा पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.
Post a Comment