बलुचिस्तानला हवीय १९७१ च्या बांग्लादेश युध्दाप्रमाणे भारतीय सैन्याची मदत

बलुचिस्तान रिपब्लिकन पार्टी या पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शेर मोहम्मद बुगती यांची विशेष मुलाखत
सिमोल्लंघन राष्ट्रवादाचे, मागोवा बलुचिस्तिानचा’ हा विशेषांक दै.तरुणभारततर्फे नुकताच प्रकाशित करण्यात आला. यात श्री.विभाकर कुरंभट्टी सर यांनी मला बलुचिस्तान रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते शेर मोहम्मद बुगती यांची मुलाखत घेण्याची जबाबदारी दिली.बलुचिस्तानवर आधी लिखाण केले असल्याने माहिती होती मात्र शेर मोहम्मद बुगती हा विषय नवीन होता! कारण त्यांचे केवळ नावच माहित होते. त्यांच्यांशी संपर्क कसा साधायचा? येथून सुरुवात होती. मात्र २२ वेगवेगळ्या लोकांशी ट्वीटर व इमेल व्दारे संपर्क साधल्यानंतर श्री.बुगती यांचा स्विर्त्झलँडमधील जिनेव्हा मधील फोन नंबर मिळाला. त्यांना स्वत:ची ओळख पटवून देण्यात तिन-चार दिवस लागले. अखेर त्यांची खात्री पटल्यानंतर त्यांनी भन्नाट मुलाखत दिली. प्रश्‍नोत्तराच्या स्वरुपातील ही मुलाखत आपल्यासाठी .....

काश्मीर प्रश्‍नावर गेल्या ७० वर्षांपासून भारत लढा देत आहे. मात्र वाकडी शेपूट असलेला पाकिस्तान काश्मीरवर दावा करत नेहमीच वातावरण चिघळवित आहे. इतक्या वर्षांच्या या संघर्षाला बलुचिस्तानच्या निमित्ताने प्रथमच कलाटणी मिळाली. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्रदिनाच्या भाषणात बलुचिस्तानचा मुद्दा अत्यंत प्रभावीपणे संपुर्ण जगा समोर मांडून एकाच झटक्यात पाकिस्तानला बचावाच्या अवस्थेत आणले आहे. बलुचिस्तानच्या रूपाने काश्मीरपेक्षा मोठा मुद्दा अस्तित्वात असून त्याच्यावर तोडगा निघणे बाकी आहे, ही बाब आंतरराष्ट्रीय पातळीवर जोरदारपणे मांडत पाकिस्तानचा बुरखा फाडण्यात ते यशस्वी झाले आहेत. भारताच्या या आक्रमक भुमिकेमुळे जो पाकिस्तान काश्मीरवर हक्क सांगत होता तो आता बलुचिस्तान वाचविण्यासाठी धडपडतांना दिसत आहे! या पार्श्‍वभुुमीवर बलुचिस्तान रिपब्लिकन पार्टी या पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि बलुचिस्तानमधील जेेष्ठ स्वतंत्रसेनानी नवाब अकबर बुगती यांचे नातू शेर मोहम्मद बुगती यांनी पत्रकार युवराज माधवसिंग परदेशी यांना दिलेली विशेष मुलाखत.... पाकिस्तानच्या त्रासामुळे बुगती यांना मातृभुमी सोडून स्विर्त्झलँड जिनेव्हा येथे राजकीय आश्रय घ्यावा लागला आहे. तेथून त्यांनी दुरध्वनी व ई-मेलच्या माध्यमातून सिमोल्लंघन राष्ट्रवादाचे-मागोवा बलुचिस्तानचा विशेषकांसाठी दिलेली खास मुलाखत!

प्रश्‍न - बलुचिस्तानच्या स्वतंत्रता लढ्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर सुमारे ७० वर्षानंतर प्रथमच घेण्यात आली आहे. याकडे आपण कसे पाहता?

बुगती- जगाने पहिल्यांदाच आमची दखल घेतली याचा निश्‍चित आनंद आहे. पाकिस्तानच्या निर्मितीपासून आम्हाला त्रास देण्याचे प्रयत्न सुरु असतांना शांतता व सलोखा राखण्यासाठी आमच्या प्रामाणिक प्रयत्नांना जग मान्यता मुळू लागली आहे. हा सकारात्मक बदल आमचा संघर्ष, प्रयत्न व त्याग यातून आलेला आहे. बलोच नेते आणि युवक यासाठी आपले सर्वस्व अपर्ण करत आंतरराष्ट्रीय पातळीवर हा विषय नेटाने लावून धरला आहे. यामुळे अखेर जागतिक पातळीवर याची घेण्यात येत आहे. गेल्या सात दशकांपासून बलोच लोकांवर अनत्वित अत्याचार होत असून याबाबत स्थानिक प्रसार माध्यमांची भुमिका अत्यंत निराशाजनक आहे. मात्र आमच्या सात दशकांच्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर आमच्या व्यथा वेदना पोहचल्या. आमच्या पक्षासह बलोच रिपब्लिकन आर्मी (बीआरपी) ने ही सुरुवातीपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर आवाज उचलण्यात पुढाकार घेतला. बीआरपीच्या युरोपसह अनेक पाश्‍चात्य देशांमध्ये शाखा असून आमच्या समस्यांना विविध माध्यमातून जगासमोर आणण्याचे काम नित्यनियमाने करण्यात येत आहे.

प्रश्‍न - पाकिस्तानपासून वेगळे होण्यासाठी छेडण्यात आलेल्या बलुचिस्तान स्वातंत्रता लढ्यामागे प्रमुख उद्देश कोणता?

बुगती - या प्रश्‍नातच याचे उत्तर दडलेले आहे. कारण हा संघर्ष बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठीच केला जात आहे. गेल्या सात दशकापासून सुरु असलेला अत्याचार, मानवी अधिकारांचे उल्लंघन आदींच्या माध्यमातून पकिस्तान सैन्य बलोच जनतेवर अनत्वित अत्याचार केले आहे. या कालखंडात विविध लष्करी कारवाया, अपहरण, खोट्या चकमकी आदिंच्या माध्यमातून निष्पाप बलोच जनता, राजकिय कार्यकर्ते आणि नेत्यांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. पाकिस्तानने बलोचिस्तानवर अवैध कब्जा केल्यानंतर आजवर सुमारे पाच महत्वाचे लष्करी ऑपरेशन पाकिस्तान सैन्याने राबविले आहेत. यातील सन २००२ सालच्या पाचव्या लष्करी कारवाईनंतर आजवर सुमारे २६ हजार बलोच नागरिक गायब झाले आहेत. यात राजकिय नेते, कार्यकर्ते, शिक्षक, डॉक्टर्स, बौध्दीक क्षेत्रातील मान्यवर, सर्वसामान्य नागरिक आदिंचा समावेश असून त्यांचा अद्यापही थांगपत्ता लागलेला नाही. तर याच कालखंडात सुमारे ६ हजार लोकांची हत्या करुन त्यांना दफवन्यात आले आहे. कोणताही पुरावा व अंत्यविधीचे संस्कार न करता तयार झालेल्या अशा अनेक सामुहिक दफनभुमी पाकिस्तानी सरकारच्या क्रौर्याची साक्ष देत आहेत.

प्रश्‍न - पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादात बलुची लोकांची कशी होरपळ होतेय?

बुगती - मी वर नमुद म्हटल्याप्रमाणे पाकिस्तानने अवैध कब्जा केल्यापासून बलोच लोकांचा पध्दतशिरपणे नरसंहार करण्यात येत असून त्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे.

प्रश्‍न- बलुचिस्तान स्वातंत्रता लढ्यातील सर्वात लोकप्रिय नेते अकबर बुगती यांची सन २००४ मध्ये हत्या करण्यात आली. यात पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांचा हात असल्याचा आरोपही करण्यात आला होता. या हत्येमागे काय उद्देश असू शकतो?

बुगती - शहिद नवाब अकबर बुगती यांच्यासह अनेक बलोच नेते आणि राजकिय कार्यकर्त्यांना पाकिस्तानी सैन्य व त्यांच्या गुप्तचर यंत्रणेने वारंवार टार्गेट केले आहे. कारण हे सर्वजण त्यांच्या हक्कासाठी आवाज उचलत होते. पाकिस्तानी सैन्य मात्र बंदुकिच्या जोरावर त्यांचे दमन करत होते. बलुच लोकांना मुलभुत मानविय अधिकार देखील मिळालेले नाहीत. यात स्वयंशासन आणि या परिसरातील नैसर्गिक स्त्रोतांचा उपयोग करण्यापासून मज्जाव करण्यासह आदिंचा समावेश आहे. या मागण्यांसाठी संघर्ष सुरु केल्यावर पाकिस्तानने वारंवार दमनचक्राचा वापर केला आहे. अलीकडेच पाकिस्तानचे लष्कर प्रमुख राहिल शरिफ यांनी कोणत्याही परिस्थितीत चिन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर (सीपीईसी) होणारच आहे, असे सांगितले आहे. महत्वाची बाब म्हणजे यासाठी बलोची जनतेची ईच्छा आहे कि नाही?, त्यांचा यास पाठिंबा आहे किंवा नाही? याची जराही तमा बाळगलेली नाही. याचा अर्थ या भागातील जनतेला काहिही करुन दडपशाहीच्या माध्यमातून दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आता उरला मुद्दा मुशर्रफ यांच्या विषयी, माझे म्हणणे असे आहे की, मुशर्रफ असो का शरिफ यांनी सातत्याने बलोच जनतेवर अत्याचार केले आहेत. आणि हो मुशर्रफ यांच्या काळात बलोच जनतेचे ज्येष्ठनेते व आमचे आशास्थान आणि माझे आजोबा शहिद नवाब अकबर बुगती यांची क्रुर हत्या करण्यात आली. यामुळे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यता लढ्याला मोठा आघात बसला.

प्रश्‍न - पाकिस्तान बलुचिस्तानमध्ये कशाप्रकारे अत्याचार करित आहे? याची काही उदाहरणे सांगता येतील का?

बुगती - मी आधीच वर सांगितल्याप्रमाणे पाकिस्तानी लष्कराने बलुचिस्तानमध्ये मानवी अधिकारांचे उल्लंघन केले आहे. विशेषत: भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी बलुचिस्तानमधील भयंकर स्थितीवर चिंता व्यक्त करताच पाकिस्तानी सैन्य पुन्हा चवताळले आहे. पाकिस्तानी लष्कराने नुकतेच डेरा बुगती आणि पंजाब सिमेवर दोन आठवड्यांचे लष्करी अभियान राबवले. यात मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी सैनिक आणि किमान आठ लष्करी हेलीकॉफ्टर्स सहभागी झाले होेते. या अभियानादरम्यान १०० पेक्षा जास्त निष्पाप बलुची लोकांचा जीव गेला. यात महिला व लहान बालकांचा मोठ्यासंख्येने समावेश होता. यासह या भागातील १२० लोकांचा अद्यापही थांगपत्ता लागलेला नाही. याच प्रकारे बलुचिस्तानमधील मश्काय, तुर्बत, आर्वन आणि बलोन या भागांमध्ये दैनंदिन कारवाया करण्यात येत आहेत. यात बलोच नागरिकांचा अन्वत्वीत छळ केला जात आहे. यातुन काही सुदैवी पळ काढण्यात यशस्वी झाले असले तरी अनेक जण मृत्युमुखी पडत आहेत.

प्रश्‍न - बलुचिस्तान लढ्यात आतापर्यंत किती बलुचि लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली? याचे परिणाम काय झाले?

बुगती - आजवर या स्वातंत्र्यच्या लढ्यात आमच्या हजारो बांधवांना सर्वस्व अपर्ण केले आहे. तसेच मी वर म्हटल्याप्रमाणे सन २००२ च्या लष्करी कारवाईत आजवर सुमारे २६ हजार बलोच नागरिक गायब झाले असून सुमारे ६ हजार लोकांची हत्या करण्यात आली आहे.

प्रश्‍न - भारताचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१६ रोजी लालकिल्यावर केलेल्या भाषणात बलुचिस्तानचा उल्लेख केला. याबद्दल आपणास काय वाटते?

बुगती - मी आधीच माझ्या विविध मुलाखती आणि व्हिडीओज्च्या माध्यमातून भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी उपस्थित केलेला मुद्दाहा अत्यंत महत्वाचे असल्याचे नमुद केले आहे. त्यांनी बलुचिस्तानमधील मानवी अधिकारांचे उल्लंघन आणि पाकिस्तानच्या दडपशाहीला वाचा फोडली आहे. आम्ही कधीपासूनच भारताने अशी भुमिका घ्यावी, याच्या प्रतिक्षेत होतो. अर्थात हा विषय केवळ भाषणापुरता मर्यादित न राहता भारताने आम्हाला मदत करावी जोपर्यंत स्वतंत्र बलुचिस्तानचे आमचे अंतिम उद्दिष्ठ गाठले जात नाही तोपर्यंत!

प्रश्‍न - भारतीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी बलुचिस्तानचा जाहीरपणे उल्लेख केल्यापासून पाकिस्तान घाबरला आहे का?

बुगती - हो नक्कीच, नरेंद्र मोदी साहेबांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर पाकिस्तान खुप घाबरलेला असून तेथील राज्यकर्ते व लष्करी अधिकारी तणावाखाली असल्याचे जाणवत आहे.ं याचमुळे पाकिस्तानच्या लष्काराने बलोच जनतेवर दडपशाहीचा वरवंटा फिरवण्यास सुरुवात केली आहे. मी वर नमुद केल्याप्रमाणे डेराबुगती आणि उर्वरित बलूचिस्तानमध्ये याच प्रमाणे दमनचक्र सुरु आहे.

प्रश्‍न - भारताकडून आपल्या काय अपेक्षा आहेत?

बुगती - सर्वप्रथम भारताने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यता चळवळीला नैतिक, राजकिय आणि अन्य विविध पातळ्यांवरुन पाठिंबा देणे आवश्यक आहे. पाकिस्तानच्या दडपशाहीमुळे अनेक बलोच नेते व नागरिकांनी दुसर्‍या देशांमध्ये आश्रय घेतला आहे. अशा या आमच्या बांधवांना भारताने आश्रय देण्याची गरज आहे. आमचे काही बांधव अफगनिस्तान सारख्या शेजारच्या देशांमध्ये कसातरी आश्रय घेवून राहत असला तरी त्यांना तेथेही त्रास दिला जात आहे. याचा विचार करता, भारतात आम्हाला आश्रय आवश्यक आहे. आणि हो भारताने बलुचिस्तानमध्ये थेट लष्करी हस्तक्षेप करावा, अशी आमची विनंती आहे. भारताने १९७१ मधील बांग्लादेशात सारख्या कारवाई समान हस्तक्षेप करुन बलुच नागरिकांचा नरसंहार थांबवत त्यांचे अस्थित्व कायम राखण्यास मदत करावी.

प्रश्‍न - तिबेटीयन धर्मगुरु दलाईलामा यांच्या प्रमाणे आपण भारताकडे राजकिय आश्रय मागणार का?

बुगती - हो, मला वाटते मला भारतात राजकिय आश्रय मिळावा. मी सध्या स्वित्झर्लंडमध्ये असून तेथील काम आटोपल्यानंतर भारतात आश्रय घेण्याच्या प्रयत्नात आहे.

प्रश्‍न - बलुचिस्तानच्या स्वातंत्रता लढ्याचे भविष्य काय आहे?

बुगती - याबाबत भाकित वर्तवणे कठिण असले तरी आम्ही शेवटी स्वतंत्र होण्याचे उद्दिष्ठ गाठू यात मला तीळमात्रही शंका नाही. यासाठी अलीकडच्या हालचाली आणि विशेषत: आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडी आश्‍वासक आहेत.

प्रश्‍न - जर बलुचिस्तान पाकिस्तानपासून स्वतंत्र झाला तर स्वतंत्र बलुचिस्तानसाठी तुमच्याकडे काही ऍक्शन प्लान तयार आहे का?

बुगती - सर्वप्रथम आम्ही आमच्या भागातील पाकिस्तानचे अस्तित्व नष्ट करु. बलुचिस्तान हे पाकिस्तानच्या अगदी विरुध्द म्हणजे खर्‍या अर्थाने निधर्मी व लोकशाहीवादी राष्ट्र असेल. या शिवाय स्वतंत्र बलुचिस्तान हे भारतिय उपखंडासह जागतिक पातळीवरही शांतताप्रिय देशाची भुमिका पार पाडेल, असा मला विश्‍वास आहे. आणि अर्थातच बलुचिस्तान स्वतंत्र झाल्यानंतर आम्ही सर्व शेजारी राष्ट्रांसोबत मैत्रीचे व सलोख्याचे संबंध प्र्रस्थिापित करु.

प्रश्‍न - भारताची रिसर्च ऍण्ड ऍनॅलिसीस विंग (रॉ) बलुचिस्तानमध्ये अशांतता पसरवते अशी ओरड पाकिस्तान नेहमी करत असतो. याबाबत आपले काय म्हणणे आहे?

बुगती - खरंतर मुळ विषयापासून दुसरीकडे लक्ष वळविण्याचा पाकिस्तानचा हा केविलवाना प्रयत्न आहे. पाकिस्तानच्या लष्कराकडून बलुची लोकांवर केल्या जात असलेल्या अमानुष अत्याचाराकडे जगाचे लक्ष वेधले जावू नये म्हणून हा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. आणि जर भारताने खरच बलुचिस्तानमध्ये हस्तक्षेप केला असता तर आज परिस्थिती वेगळी राहिली असती, व आम्हाला आधीच स्वातंत्र्य मिलाले असते. पाकिस्तानी लष्कर सन १९४८ पासून सातत्याने बलोच जनतेचा नरसंहार करत असून यावर पांघरुण घालण्यासाठी उलट्याबोंेबा ठोकत आहे.

प्रश्‍न - आयएसआयएस या दहशतवादी संघटनेबाबत आपण काय म्हणाल?

बुगती - आयएसआयएस ही एक कुख्यात दहशतवादी संघटना असून तिने जगातिल अनेक भागांमध्ये हाहाकार माजविला आहे. आम्ही अशा प्रकारच्या सर्व दहशतवादी कृत्यांचा कडक शब्दात धिक्कार करतो.

प्रश्‍न - आपण जगाला काही संदेश देवू इच्छिता का?

बुगती - मला जगाला हेच सांगावेसे वाटते की, पाकिस्तान सरकार बलूची जनतेवर करत असलेल्या अत्याचारांबाबत आजवरची आळीमिळी गुप चिळीची भुमिका सोडून द्यावी. बलोच जनतेचा नरसंहार आणि त्यांच्यावरील अत्याचारांपासून मुक्तता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. आम्ही विशेष करुन आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमे व मानवाधिकार संघटनांना विनंती करतो की, त्यांनी बलुचिस्तानमध्ये स्वतंत्र चमु पाठवून येथील अत्यंत भयावह चित्र जगासमोर मांडावे. पाकिस्तानी लष्कर आणि तेथील सत्ताधार्‍यांचा क्रुर चेहरा जगा समोर आणण्याचे कामही त्यांनी करावे, अशी आमची अपेक्षा आहे.

Post a Comment

Designed By Blogger