मेड इन चायनावर बहिष्कार : देशप्रेम अन् वास्तव


उरी दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने सर्जिकल स्टाईकने घेतल्यानंतर भारत-पाकिस्तानचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. या तणावामुळे युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौर्‍याच्या कुटनितीमुळे पाकिस्तान संपुर्ण जगापासून वेगळा पडला आहे, हे सत्य कोणीही नाकारु शकणार नाही. अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, इस्त्राईलसह अनेक देशांनी भारताच्या भुमिकेचे समर्थन केले असले तरी चीनने पाकिस्तानला मदत करणे सुरुच ठेवले आहे. चीनी ड्रॅगनच्या या मुजोरीमुळे संपुर्ण भारतात संतापाची लाट पसरली आहे. यामुळे भारत-चीनमध्ये युध्द छेडले जाण्याची सुतराम शक्यता नसली तरी सोशल मीडियावर भारतियांनी चीन विरुध्द जणू युध्दच पुकारले आहे. याची परिणिती म्हणून मेड इन चायना उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे भावनिक आवाहन करणारे मेसेज व्हॉट्सअप, फेसबुकसह सर्वच सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याची परिणिती म्हणून गुजरात, राजस्थानसह महाराष्ट्रातील अनेक व्यापार्‍यांनी चीन वस्तु विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. देशप्रेमाच्या लाटेत ते योग्यही वाटत आहे. मात्र याची व्याप्ती दिवाळीमध्ये फॅन्सी पणत्या व लायटींग खरेदीपुरताच मर्यादित आहे, ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे. कारण जिओनी, कुलपॅड, हायर, हुवाई, लेनोव्हो, एलई टीव्ही, वनप्लस, विवो, झिओमी या चीन कंपन्यांच्या मालाची विक्रमी विक्री भारतातच झाली आहे. तेही गेल्या तिन महिन्यात!

चीनी मालावर बहिष्काराने चीनला आपण धडा शिकवू शकतो का? यासाठी भारत व चीनच्या निर्यात आकडेवारीवर एक नजर मारण्याची गरज आहे! www.worldstopexports.com या संकेतस्थळावरील नोंदीनुसार सन २०१५ मध्ये चीनने भारतात ५८.३ बिलीयनची असून याची टक्केवारी केवळ २.६ इतकी आहे. त्या तुलनेत अमेरिकेतील निर्यात १८ टक्के, हॉगकॉंग १४.६ टक्के, जापान ६ टक्के, युके २.६ टक्के, साउथ कोरिया ४.४ टक्के, जर्मनी ३ टक्के, नेदरलँड २.६ टक्के, सिंगापूर २.३ टक्के, मलेशिया १.९ टक्के इतकी आहे. याचा अर्थ भारताचा चीनच्या निर्यातीमधला वाटा आहे केवळ २.६ टक्के इतका आहे. आपण चीनच्या सर्व मालावर बंदी घातली तरी आपण चीनचे फारसे नुकसान करू शकत नाही. देश पातळीवर २.६ टक्के हे देखील खूप असतात. पण एकंदरीत आपले उपद्रव मूल्य यात कमीच आहे.

दुुसरीकडे भारत फक्त चीनमधून वस्तू आयातच करतो असे नाही, तर चीनला निर्यात देखील करतो. www.worldstopexports.com याच संकेतस्थळावरील नोंदीनुसार भारत चीनमध्ये ९.५ बिलीयची निर्यात करत असून याचा वाटा ३.६ टक्के इतका आहे. म्हणजे चीन भारतात जितकी निर्यात करतो त्यापेक्षा जास्त भारत चीनमध्ये निर्यात करतो! हे उघड आहे. जर भारत-चीन व्यापार बंद झाला तर त्याचा सर्वात मोठा फटका भारताला बसेल.

चीनला धडा शिकवण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ ला बळ हवे

भारतीय बाजारपेठेवर होणार्‍या चीनी आक्रमणावर मात करण्यासाठी केंद्र शासनाने ‘मेक इन इंडिया’ ही महत्वकांक्षी योजना सुरु केली आहे. गेल्या महिनाभरापासून भारतात मेड इन चायनावर बहिष्काराचे वारे वाहू लागल्यानंतर चीनचा तडफडात झाला आहे. याचे पडसाद चीनी माध्यमांध्ये उमटत आहे. ‘‘भारत केवळ भुंकू शकतो, करु काहीही शकत नाही, तिथे प्रचंड भ्रष्टाचार आहे, पैसे आहेत, पण ते सारे भ्रष्टाचारी लोकांनी दडवून ठेवले आहेत. वीज-पाणी यांचा पत्ता नाही, पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे ‘मेक इन इंडिया’चे स्वप्न म्हणूनच अव्यहार्य आहे, चिनी उद्योजकांनी भारतात गुंतवणूक करण्याचा विचार चुकूनदेखील करु नये,’’ यासारखी प्रचंड आदळ-आपट या चिनी माध्यमांमध्ये सुरु झाली आहे. मेड इन चायनावर बहिष्कार टाकून स्वदेशी माल खरेदी करा, एवढेच आवाहन सोशल मीडियावर करण्यात आल्यानंतर चीन हादरला आहे. कारण भारतात मेक इन इंडिया मोहिमेला प्रतिसाद मिळत असल्याचे चीन पुर्णपणे जाणून आहे. ही मोहिम भक्कम करण्याची गरज असून भारतीय लघुउद्योग उत्पादनाला चालना देणे आवश्यक आहे.

भारतियांचा चिनी अर्थव्यवस्थेला हातभार!

बहुतांश चिनी वस्तू या लघुउद्योगांतून बनविल्या जातात. चिनी स्त्रिया या वस्तू घरी बनवतात. त्यामुळे त्यांची किंमत अत्यंत कमी असतेे. चिनी वस्तू जर स्वस्तात मिळतात तर आपण त्या वस्तू कशाला बनवायच्या? या विचाराने अनेक भारतीय उद्योजन चिनी वस्तूंचे कंटेनरच्या कंटेनर खरेदी करतात व त्यावर आपले लेबल लावून बाजारात विकतात. यामुळे ते भरपूर पैसे कमावतात पण यामुळे आपण चिनी अर्थव्यवस्थेला हातभार लावतो आहोत, याकडे दुर्लक्ष होत आहे.

देशप्रेम दाखवण्याचा योग्य मार्ग

भावनेच्या भरात वाहून चीनी लायटींग व पणत्यांवर बहिष्कार टाकण्यापेक्षा त्यांचा मुकाबला करण्यासाठी आपल्याकडे लघुउद्योग निर्माण करायला हवेत. त्यासाठी स्वस्तात जागा, भांडवल, कच्चा माल उपलब्ध करून दिले पाहिजे. कर कमी केले पाहिजेत. त्यामुळे आपणसुद्धा दर्जेदार वस्तू बनवू शकू. नागरिक म्हणून फक्त खरेदीदाराच्या भूमिकेत न राहता उत्पादकाच्या भूमिकेत शिरायला हवे. आता हा सर्व प्रकार रोखण्यासाठी सरकारनेच पुढाकार घेऊन, भारतीय लघुउद्योग उत्पादनाला चालना देण्याची गरज आहे. तेंव्हाच मेक इन इंडिया मोहिमेला खर्‍या अर्थाने बळ मिळेल. फेसबुक आणि व्हाट्सअप वर पोस्ट टाकण्याइतके हे सोपे नक्कीच नाही. पण हाच योग्य मार्ग आहे देशप्रेम दाखवण्याचा.

Post a Comment

Designed By Blogger