शेअर बाजाराची गाडी सुसाट!

कोरोना संकट आणि शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर १ रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. विकासाला गती देण्यासाठी सरकार आपली तिजोरी अधिक खुली करत असल्याचे या अर्थसंकल्पामधून दिसून येत आहे. आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रांमध्ये मोठी भांडवली गुंतवणूक करत रोजगार वाढवणे व त्याद्वारे लोकांच्या हातात पैसा उपलब्ध करून देण्याचा केंद्राचा प्रयत्न असल्याचा दावा अर्थमंत्र्यांनी केला. या अर्थसंकल्पाचे शेअर बाजाराने जोरदार स्वागत करत सेन्सेक्सने तब्बल २,३१५ अंकांनी उसळी घेतली. मंगळवारी सलग दुसर्‍या दिवशी भांडवली बाजारात तेजी बघायला मिळाली. सेन्सेक्स ११९७ अंकांनी वधारला तर निफ्टीने ३६६ अंकांची झेप घेतली. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पामध्ये सामान्यांना करदिलासा दिलेला नसली तरीही हे बजेट शेअर बाजाराने उचलून धरले आहे. मरगळलेली अर्थव्यवस्था रुळावर येण्याची ही चिन्हे असल्याचे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. कारण शेअर बाजाराची ही उसळी केवळ आंतरराष्ट्रीय बाजारातील उलाढालीमुळेच नसून यास देशांतर्गत सकारात्मक परिस्थितीही तितकीच कारणीभुत आहे. देशभरात करोना लसीकरणाची मोहीम जोमाने सुरु झाली आहे. त्यातच केंद्र सरकारने अर्थसंकल्पात ठोस तरतुदी केल्या आहेत. त्यामुळे भांडवली बाजारात अलीकडच्या काळात गुंतवणुकीचा ओघ वाढला असे म्हणणेच जास्त संयुक्तीक आहे.



अर्थव्यवस्था वेगाने रुळावर येण्याचे भाकित

गेल्या वर्षभरापासून जागतिकस्तरावर अनिश्‍चिततेचे वातावरण निर्माण झाले असल्याने त्याचे एकामागून एक हादरे जागतिक अर्थव्यवस्थेला बसत आहेत. भारतात नोटाबंदीपासून भारतीय अर्थव्यवस्थेची घसरलेली गाडी अद्यापही रुळावर आलेली नाही. या संकटांच्या मालिकेतून बाहेर निघण्यासाठी धडपड सुरु असताना कोरोना व्हायरसच्या संकटाने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतात संपूर्ण लॉकडाउन करण्यात आले होते. त्यामुळे अनेक क्षेत्रांचे नुकसान झाल्याने देशाची आर्थिक व्यवस्थ्या पूर्णपणे कोलमडून पडली. भारतातील इतक्या मोठ्या घसरणीकडे पाहता वर्षभर अर्थव्यवस्था निगेटिव्ह झोनमध्ये राहण्याची शक्यता अर्थतज्ञ व्यक्त करत असले तरी, भारतीय अर्थव्यवस्था वेगाने रुळावर येण्याचे भाकित अनेक वित्तीय संस्थानी वर्तविले होते. याची प्रचिती गेल्या काही दिवसांपासून येतांना दिसत आहे. मागील आठ महिन्यांपासून घट्ट झालेला कोरोनाचा विळखा सैल होत असल्याने देशाची अर्थव्यवस्थाही रुळावर येवू लागली आहे. नोव्हेंबरमध्ये झालेले जीएसटीचे संकलन एक लाख चार हजार कोटी रुपयांवर, तर डिसेंबरात ते एक लाख १५ हजार कोटींपर्यंत पोचले. थंड पडलेली अर्थव्यवस्था पुन्हा हलू लागल्याचे लक्षण म्हणता येईल. यासह मालमत्तांच्या खरेदी-विक्रीत दिसत असलेला उत्साह, शेअर बाजारातील तेजीचे वारे, यामुळे अर्थकारणाच्या बाबतीत उत्साहाचे वातावरण आहे. 

गुंतवणूकदारांची मालमत्ता ५.५० लाख कोटींनी वाढली

परकीय चलनाच्या साठ्यातही वाढ झाली ५६० दशलक्ष डॉलर्स इतकी झाली असून तेदेखील विक्रमी असून सर्व आकडेवारीवरून देशाची अर्थव्यवस्था सुधारत असल्याचे संकेत आहेत. साधारणत: दीड आठवड्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक कल आणि जो बायडन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतल्यामुळे झालेल्या सकारात्मक परिमानामुळे सेन्सेक्सने पहिल्यांदाच ऐतिहासिक ५०००० चा टप्पा पार केला होता. कोरोना आणि लॉकडाऊननंतर प्रथमच एवढी मोठी सेन्सेक्सने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली होती. मात्र गुंतवणूकदारांना बजेटपूर्व चिंतेने ग्रासल्याने आणि नफेखोरी सुरु झाल्याने सेन्सेक्स जवळपास चार दिवसांत सेन्सेक्स २,३५० अंकांनी घसरला होता. मात्र निर्मला सीतारमण यांच्या बजेटच्या पेटार्‍यातून ठोस आश्‍वासनांचा वर्षाव झाल्याने बजेट सादर केल्यानंतर सेन्सेक्स २३०० अंकांनी वधारला होता. यात गुंतवणूकदारांची मालमत्ता ५.५० लाख कोटींनी वाढली होती. सोमवारी सेन्सेक्स ४८,६००.६१ अंकांवर बंद झाला होता. मंगळवारी सेन्सेक्स ४९,१९३.२६ अंकांवर उघडला. एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाली. याशिवाय लार्सन अँड टुब्रो, एसबीआय, बजाज फायनान्स, एक्सिस बँक, कोटक बँक, अल्ट्राटेक सिमेंट, आयटीसी, आयसीआयसीआय बँकांच्या शेअरमध्ये मोठी वाढ दिसून आली. याशिवाय ओएनजीसी, बजाज फिनसर्व, इंडसइंड बँक, एशियन पेंट, महिंद्रा एंड महिंद्रा, मारुती, टेक महिंद्रा, एनटीपीसी, टीसीएस, टायटन, इन्फोसिस, बजाज ऑटो, पावरग्रिड, सन फार्मा, एचसीएल टेक, भारती एयरटेल, नेस्ले इंडिया, डॉक्टर रेड्डीज आणि रिलायन्सचे शेअरही हिरव्या निशानावर होते. 

तेजीच्या लाटेवर स्वार होतांना ....

एकूणच केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यापासून शेअर बाजारात तेजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. निर्देशांकाची झेप पाहता, शेअर बाजाराच्या दृष्टीकोनातून हा विकासाभिमुख अर्थसंकल्प आहे असेच दिसून येत आहे. याव्यतिरिक्त परकीय वित्तसंस्था मोठ्या प्रमाणावर भारतीय भांडवली बाजारात पैसे गुंतवत असल्याने परकी चलनाची गंगाजळीही वाढलेली आहे. तथापि, अशा प्रकारची शेअर बाजारातील गुंतवणूक फक्त भारतात होत आहे, असे नाही; तर जगभरच हा भांडवलाचा प्रवाह वाहतो आहे. युरोप-अमेरिकेतील कमी किंवा उणे व्याजदरांमुळे उदयोन्मुख बाजारपेठांकडे गुंतवणूकदारांनी मोहरा वळविला आहे. दुसरे म्हणजे, कोरोनावरील लस आल्याने आणि त्याविषयीची भीती बर्याच प्रमाणात दूर झाल्यानेदेखील भांडवली बाजारात उत्साह दिसतो. मात्र भारतीय भांडवली बाजारातील तेजीला मर्यादा असून वर्ष २०२१ मध्ये प्रमुख सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांक वार्षिक तुलनेत एकेरी अंकवृद्धी नोंदवतील, असा अंदाज बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीज या दलालीपेढीने व्यक्त केला आहे. यामुळे तेजीच्या लाटेवर स्वार होतांना सर्वसामान्य गुंतवणुकदारांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

Post a Comment

Designed By Blogger