दिल्लीत मुजरा करण्यासाठी भाजपाचा ‘जळगाव’च्या गल्लीत गोंधळ


ज्या लोकसभा मतदारसंघात सलग दोन वेळा विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला तोच जळगाव लोकसभा मतदारसंघ भाजपाची डोकंदूखी ठरत आहे. ‘धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं’ अशी गत भाजपाची झाली आहे. निवडणुकीची घोषणा होण्याआधीपासून मतदारसंघात रंगणारे राजकीय कुरघोड्यांचे डाव व यात प्रतिस्पर्धी - विरोधकांपेक्षा स्वकीयांच्या कटकारस्थानांमुळे पक्षला व नेत्यांना तोंड दाबूत बुक्क्याचा मार सहन करावा लागत आहे. विजयाची हॅक्ट्रीक करण्यासाठी विद्यमान खासदार ए.टी.पाटील उत्सूक असतांना सोशल मीडियामध्ये कथित छायाचित्र व्हायरल झाल्याने त्यांचे तिकीट कापून विधानपरिषद सदस्या स्मिता वाघ यांना संधी देण्यात आली. या षडयंत्रामागे भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा हात असल्याचा जाहीर आरोप खा.पाटील त्यांनी बंडाचा झेंडा फडकावला. कार्यकर्ता मेळावे, संपर्क अभियान राबवत त्यांनी उमेदवार बदलाची मागणी करत पक्षावर दबाव तंत्राचा वापर केला. याचवेळी अपक्ष म्हणून निवडून आलेले मात्र भाजपाला पाठिंबा देणारे आमदार शिरीष चौधरी यांनीही अपक्ष अर्ज दाखल करण्याची भूमिका जाहीर केली. दरम्यान वाघ यांच्या उमेदवारीवरुन पक्षांंतर्गत धूसफूस सुरु होती, याचे प्रमुख कारण म्हणजे उदय वाघ यांची कार्यपध्दती! भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा स्मिता वाघ यांना विरोध नसला तरी उदय वाघांवर रोष होता. हा रोष असण्यामागचे ‘अर्थ’पूर्ण कारण वाघांसह कार्यकर्त्यांना अधिक माहित आहे. याचा फटका वाघांना बसला. उमेदारी अर्ज दाखल केल्यानंतर तिन दिवसांनी पक्षाने त्यांचे तिकीट कापून चाळीसगावचे युवा आमदार उन्मेश पाटील यांना रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे.

गिरीष महाजनांची पहिली पसंती होते उन्मेश पाटील


या मतदारसंघात भाजपाकडून डझनभर नेत्यांची नावे चर्चेत होती यात महाजनांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे सेवानिवृत्त अभियंना प्रकाश पाटील व उन्मेश पाटील यांचे नाव आघाडीवर होते. प्रकाश पाटील हे पक्षाचे कार्यकर्ते नसल्याने त्यांच्या नावाला विरोध होता यामुळे आ.पाटील यांचे नाव जवळपास निश्‍चित झाले होते. मात्र ते स्वत: लोकसभा लढण्यास इच्छूक नव्हते. या वादात अभाविपचे कार्ड खेळत स्मिता वाघ यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मदतीने बाजी मारली. या खेळीमुळे ना.महाजन देखील दुखावले गेले असावेत मात्र त्यांच्याकडेही पर्याय उपलब्ध नव्हता! एकीकडे पक्षाने स्मिता वाघ यांच्या नावाची घोषणा केल्यानंतरही खा.पाटील यांनी नाराजीनामास्त्र उपसत मतदारसंघात स्वतंत्र्य मेळावे व कार्यकर्त्यांच्या गाठीभेठी सुरु केल्या. ते अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी अटकळ देखील बांधली जात होती मात्र त्यांनी ना.महाजन व जिल्हाध्यक्ष वाघ यांच्यावर तोफ डागत उमेदवार बदलाची मागणी केली. यामुळे ते पक्ष सोडणार नाही किंवा अपक्ष देखील उभे राहणार नाही, असे संकेत मिळाले होते. दुसरीकडे स्मिता वाघ यांनी उमेदवारी अर्ज दाखल करुन प्रचाराला धडाक्यात सुरुवात केली. यावेळी पक्षाने त्यांनी एबी फॉर्म दिला की नाही? यावर देखील चर्चा रंगली. या वादात भाजपाचे सहयोगी आमदार शिरीष चौैधरी यांनीही अचानक उडी घेत स्मिता वाघ यांच्या उमेदवारीचा विरोध केला. देशात मोदी लाटेचा प्रभाव असतांनाही केवळ अंतर्गत गटबाजीमुळे जळगाव मतदारसंघात राष्ट्रवादी भाजपावर वरचढ चढेल, असे चित्र स्पष्टपणे निर्माण झाले. यामुळे पक्षला स्मिता वाघ यांचे तिकीट कापण्याचा निर्णय घेतला. अपेक्षेप्रमाणे डार्कहॉर्स समजल्या जाणार्‍या आ.उन्मेश पाटील यांच्यावर पक्षाने विश्‍वास दाखविला आहे. ही महाजन यांच्यासाठीही प्रतिष्ठेची लढात झाली आहे. आतापर्यंत नाशिक, जळगाव व धुळे महापालिकांमध्ये चाललेली ‘महाजनकी’ येथेपण चालते का? याकडे सवार्र्ंचे लक्ष लागून आहे.

Post a Comment

Designed By Blogger