भारतीय कुटनीतीचे ‘अभिनंदन’


पाकिस्तानी विमानांना पळवून लावताना पाकव्याप्त काश्मीरमध्ये पोहोचलेले भारतीय हवाई दलाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे आज भारतात परतले. पाकिस्तान सैन्याच्या ताब्यात असतांना अभिनंदन यांना अवघ्या तिन दिवसात मायदेशात आणण्याचे हे केवळ भारतीय कुटनीतीचे फलित आहे. भारतिय अधिकारी कट्टर शत्रूच्या ताब्यात असतांना कोणत्याही वाटाघाटी न करता विनाशर्त त्यांना सोडण्याची आक्रमक भुमिका भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला होता. याचवेळी अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटनसह अन्य देशांकडून पाकिस्तानवर दबाव टाकण्यात भारत यशस्वी ठरल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना अभिनंदन यांच्या सुटकेची घोषणा करावी लागली. जीनिव्हा करारानुसार युद्धकैद्यांना योग्य रीतीने वागवून त्यांना संबधित देशांकडे सोपविणे बंधनकारक असले तरी कारगिल युद्धाच्या वेळी १९९९ मध्ये फ्लाइट लेफ्टनंट नचिकेत तसेच स्क्वॅड्रन लीडर अजय अहुजा यांचा अनन्वित छळ करुन त्यांचे पार्थिव भारताच्या स्वाधीन केले होते. या पार्श्‍वभूमीवर अभिनंदन यांची सुटका होणे ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे.


पुलवामा हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानमध्ये बराच गोंधळ उडाल्यासारखी परिस्थिती आहे. सामान्य माणूस काहीसा भेदरलेला तर आहे तर तिथले सरकार आणि लष्करही निश्चित निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये दिसत नाही. यातच भारतीय विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत जावून जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेचे कंबरडे मोडल्याने पाकिस्तान बिथरला आहे. ‘विनाश काले विपरित बुध्दी’ यानुसार इम्रान खान यांनी २० विमाने भारताकडे पाठविण्याची घोडचूक केली. येथेही त्यांच्या पदरी निराशाच पडली भारतीय वायुसेनेच्या अवघ्या सहा विमानांनी एका पाकिस्तानी विमानाला लक्ष करत उर्वरित विमाने परत धाडली मात्र या धाडसी कारवाईत अभिनंदन हे शत्रूच्या हाती लागल्याने जणूकाही युध्द जिंकल्याच्या आर्विभावात पाकिस्तान वावरत होता. भारतीयांचे खच्चीकरण करण्यासाठी अभिनंदन यांना मारहाण करणारे व्हीडीओ पाकिस्तानकडून व्हायरल करण्यात आले. मात्र येथेच ते फसले. भारताने जीनेव्हा कराराचा मुद्दा उपस्थित करुन आंतरराष्ट्रीय दबाब वाढवण्यास सुरुवात केल्याने बॅकफूटवर जात त्यांनी अभिनंदन यांच्याशी चर्चा करतांनाचा दुसरा व्हीडीओ प्रसिध्द केला. काही वेळातच भारताला लवकरच गूडन्यूज मिळेल, असे ट्वीट अमेरीकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. 

भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या तणावग्रस्त परिस्थिती आता पाकिस्तानने आणखी एक चाल खेळण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय हवाई दलाच्या पायलटला जर भारताला सुपूर्द केल्यानंतर जर बदल्यात तणाव निवळणार असेल तर पाकिस्तान पायलटला भारताच्या सुपूर्द करण्यास तयार आहे, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी एक टीव्ही वाहिनीशी बोलताना सांगितले. भारताने मात्र कुरेशी यांच्या या विधानाला सणसणीत उत्तर देत, भारतीय पायलटची बिनशर्त त्वरित सुटका व्हायला हवी. कोणताही तह वगैरे करण्याचा प्रश्नच नाही, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. पाकिस्तानने भारतीय पायलटला मानवतापूर्ण वागणूक द्यावी. जर अभिनंदन यांना काहीही झाले तर पाकिस्तानने पुढील कारवाईसाठी तयार राहावे, असा इशाराही भारताने पाकिस्तानला दिला. भारताच्या या आक्रमक भुमिकेमुळे पाकिस्तानची गोची झाली. पाकिस्तानवर केवळ भारताकडूनच नव्हे तर जगभरातून दबाव आल्यानंतर भारतीय वैमानिकाच्या सुटकेचा निर्णय जाहीर झाला. पाकिस्तानवर या वेळी केवळ भारताकडूनच नव्हे तर जगभरातून आलेला दबाव अभूतपूर्व होता, असेच म्हणावे लागेल. अमेरिकेने आर्थिक मदत नाकारल्यानंतर चीन वा सौदी अरेबिया पुढे येतो, अशा पूर्वानुभवामुळे भारताबरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवरही आपला दुटप्पीपणा खपून जाईल, अशा भ्रमात पाकिस्तानी राज्यकर्ते होते. पण दहशतवादाच्या प्रश्‍नाबाबत सर्वच प्रमुख देशांनी जी निःसंदिग्ध भूमिका घेतली, त्याने हा भ्रम दूर झाला असेल. 

अमेरिकेने भारताच्या स्वरक्षणाच्या हक्काविषयी स्पष्टपणे अनुकूल मत व्यक्त केले. आजवर संयुक्त राष्ट्रांत मौलाना मसूद अझर यास आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या ठरावास आडकाठी आणणार्‍या चीननेही दहशतवादी कारवायांचा निषेध केला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत १५ देशांचा समावेश असून या १५ देशात चीनचा देखील समावेश आहे. चीनने पाकचा थेट उल्लेख केलेला नसला तरी सध्याच्या परिस्थितीत दहशतवादी कारवाया कोण करत आहे, हे स्पष्ट आहे. अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन या देशांनी जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे, अशी मागणी केली. या तिन्ही देशांकडे व्हेटो पॉवर आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौर्‍यांचे व भारतीय कुटनितीचे फलीत आहे. भारत, रशिया आणि चीन या तीन देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत घेण्यात आलेली दहशतवादविरोधी भूमिकाही महत्त्वाची ठरली. महत्त्वाचे म्हणजे भारत आपल्या भूमिकेवर ठाम राहिला आणि अभिनंदन यांच्या सुटकेचा मुद्दा अस्त्र म्हणून वापरण्याचा प्रयत्न सहन करणार नाही, हे स्पष्ट केले. भेदरलेल्या पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय पातळीवरची दरवाजे ठोठवण्यास सुरुवात केली. भारत तीन पद्धतीने आक्रमक प्रत्युत्तर देण्याची तयारी करत असल्याचे पाकिस्तानने त्यांना सांगितले. भारतीय नौदलाच्या युद्धनौका कराचीकडे पाठवणे, बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागण्याची योजना तसेच भारत आणि पाक सीमेवर सैनिकांची संख्या वाढवण्यात आल्याचे पाकने सांगितले होते. पाकिस्तानने दिलेल्या माहितीमुळे विदेशी सरकारांनी त्वरीत भारताशी चर्चा केली. दरम्यान, भारताकडून हे वृत्त काल्पनिक असल्याचे सांगण्यात आले. 

पाकिस्तानच्या किमान २० विमानांनी भारताच्या लष्करी चौक्यांकडे मार्गक्रमण केले तसेच एलओसीचेही उल्लंघन केल्याचे भारताने आंतरराष्ट्रीय समूहांना सांगितले. पाकिस्तान खोटे दावे करत असल्याचे भारताने विदेशी सरकारांना सांगितले. दुसरीकडे पाकिस्तानला एकटे पडल्याची भावना निर्माण झाली. पी ५ देशांपैकी कोणीही त्यांच्याबरोबर आले नाही. त्यातीलच काही देशांनी त्यांना दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याचा सल्ला दिला. इतकेच काय तर यूएईनेही पाकिस्तानची मागणी धुडकावली. भारताला आयओसीचे दिलेले निमंत्रण मागे घ्यावे, अशी मागणी पाकने केली होती. त्यानंतर पाकिस्तानकडे कोणताच पर्याय राहिला नाही. अभिनंदन यांना सोडण्यासाठी पाकिस्तान तयार होण्यामागे कूटनीतिक प्रयत्नांचा मोठा वाटा आहे.

Post a Comment

Designed By Blogger