जळगाव लोकसभेसाठी भाजपातर्फे नव्या चेहर्‍याचा शोध!


आगामी लोकसभा निवडणुकीत युती झाल्यास भाजपाचे उमेदवार ठरवतांना शिवसेनेचीही भुमिका महत्वाची ठरणार आहे. यंदा युतीसाठी भाजपा प्रचंड आग्रही असल्याने शिवसेना विरोधी अशी ओळख असणार्‍या भाजपा नेत्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. याची झळ जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ए.टी.पाटील यांना बसण्याची चिन्हे आहेत. त्यांना पक्षातील नेत्यांकडूनच दिले जाणारे आव्हान व मतदार संघातील वाढत्या नाराजीमुळेसह अ‍ॅन्टीइन्कबन्सीचाफटका बसण्याची शक्यता लक्षात घेवून भाजपाने नव्या चेहर्‍याचा शोध सुरु केल्याची चर्चा आहे.
भाजपाने २०१९ लोकसभा निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दोन दिवसांच्या मुंबई दौर्‍यात लोकसभेसह विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने चाचपणी केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तिसगड विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवामुळे महाराष्ट्रासाठी उमेदवारांची निवड करतांना नव्या चेहर्‍यांवर भर देण्याचे संकेत शहा यांनी दिले आहेत. मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तिसगड विधानसभा निवडणुकांमध्ये झालेला पराभव व त्यातही मध्यप्रदेशमध्ये थोडक्यात हुकलेले बहुमत यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी भाजपातर्फे सुक्ष्म नियोजनावर भर देण्याचे संकेत राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या ४८ तासांत घेतलेल्या स्वतंत्र बैठकांमध्ये दिले आहेत. यात जळगाव जिल्ह्यात मोठे फेरबदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील संभाव्य उमेदवारांचा चाचपणी करतांना नाशिक, जळगाव व धुळे महापालिकेसह पालघर निवडणुकीतील विजयाचे शिल्पकार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भुमिका महत्वपूर्ण मानली जात आहे. उमेदवारांचे पक्षातील वजनापेक्षा, विजयाची शक्यता किती? याची चाचपणी करुन केवळ जिंकणार्‍याला उमेदवारी देण्याचा ‘महाजन पॅटर्न’ आता राज्यभर ओळखला जावू लागला आहे. प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभेच्या विजयासाठी हेच सुत्र वापरण्यात येणार आहे. ज्या मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराबद्दल नाराजी आहे तेथे नवा चेहरा देण्याची रणणीती अमित शहा यांनी दिली असून त्याची चाचपणी करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे. या नव्या सुत्रामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपातर्फे नव्या चेहर्‍याचा शोध घेतला जाण्याची शक्यता आहे. गत निवडणुकित भाजपाचे विद्यमान खासदार हरीभाऊ जावळे यांचे तिकीट कापून नवा चेहरा असलेल्या रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली व त्या मोदी लाटेत निवडणून देखील आल्या. गत साडेचार वर्षात रक्षा खडसेंनी मतदार संघात केलेल्या कामांमुळे यंदा त्यांचे तिकीट निश्‍चित मानले जात आहे. त्यांच्या उमेदवारीला भाजपाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्तेही अनुकूल आहेत. त्या तुलनेत जळगाव लोकसभा मतदार संघात भाजपामध्येच गटातटाचे राजकारण दिसून येत आहे. विद्यमान खासदार ए.टी.पाटील हे सलग दोन पंचवार्षिक पासून भाजपाच्या तिकीटावर निवडून आले आहेत मात्र यंदा त्यांच्या बद्दलची वाढती नाराजी, पक्षाच्या अंतर्गत सर्वेवरुन त्यांच्याबद्दल उठलेल्या वावड्या तसेच अंतर्गत तक्रारींच्या पार्श्‍वभूमीवर आगामी वाट बिकट असल्याची जाणीव त्यांना देखील आहे. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे या मतदारसंघात शिवसेनेची ताकद दुर्लक्षित करुन चालणार नाही. पाचोरा-भडगाव मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्याशी खासदारांचे पटत नाही, पारोळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार चिमणराव पाटील हे देखील गत निवडणुकितील पराभवसाठी खासदार पाटील यांना दोषी मानतात. अशा अनेक गोष्टी भाजपासाठी डोकंदुखी ठरणार आहेत. ए.टी.पाटील यांच्याबद्दलची नाराजी व अ‍ॅन्टीइन्कबन्सीचाफटका बसू नये म्हणून भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरुन येथे विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले असल्याचे भाजपाच्या सुत्रांनी सांगितले. या व्यतिरिक्त भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी देखील लोकसभा लढवण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे. त्याआधी राष्ट्रवादीचे माजी आमदार साहेबराव पाटील हे भाजपात आल्याने त्यांचेही नाव चर्चेत आहे. गेल्या काही दिवसात चाळीसगावचे युवा आमदार ÷उन्मेश पाटील यांच्या नावाचीही चर्चा सुरु झाली आहे. या मतदार संघातील जातिय समिकरण पाहता येथे मराठा समाजातीलच उमेदवार देण्याची दाट शक्यता आहे. त्यातही नव्या कोर्‍या पाटीचा शोध सुरु असतांना गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीयांमध्ये गणल्या जाणार्‍या प्रकाश पाटील यांच्या नावाची चर्चा अचानक सुरु झाली आहे. पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे या गावातील मुळ रहिवाशी असलेले पाटील उच्चशिक्षित असून शेळगाव बॅरेज, पाडळसे, वरखेडलोंढे, ओझरखेडे धरण, कुर्‍हा वडोदा-इस्लामपूर सिंचन योजनेचे शिल्पकार म्हणून परिचित आहेत. तापीखोरे, कृष्णाखोरे, कोकण, विदर्भासह संपुर्ण महाराष्ट्रातील सुमारे ३५० धरणांचे डिझाईन करण्याचा विक्रम त्यांच्याच नावावर आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध असल्याचे त्यांचे नाव चर्चेत आले आहे. यामुळे २०१९ चे तिकीट मिळवण्यासाठी भाजपाच्या विद्यमान खासदारांसमोर आ.उन्मेश पाटील, उदय वाघ, कृषीभुषण साहेबराव पाटील व प्रकाश पाटील यांचे तगडे आव्हान राहणार आहे.

Post a Comment

Designed By Blogger