विरोधक दूरच, मित्र पक्षांसह स्वकीयांमुळेच भाजपाची दमछाक


लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गत पंचवार्षिकप्रमाणे यंदाही भाजप व शिवसेनेमधील स्थानिक पातळीवरील वाद उफाळून आला आहे. जळगाव लोकसभा मतदार संघात शिवसेनेची ताकद मोठी आहे. गत पंचवार्षिकला सेनेने भाजपाला मदत केल्यानंतरही विधानसभेत दोघे एकमेकांच्या विरोधात लढले. जिल्हा परिषदेची सत्ता मिळवण्यासाठी भाजपाने सेनेला बाजूला ठेवत काँग्रेसशी हातमिळवणी केली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व सेनेचे जिल्हाप्रमुख आमदार किशोर पाटील यांच्याची वाद टोकाला पोहचले आहेत. यामुळे सेनेचे खच्चीकरण करण्यासाठी त्यांचे लोकप्रतीनिधी अपात्र करणे व शिवसैनिकांवर कारवाई करण्यासाठी महाजनांनी सत्तेचा दुरपयोग केला, अशी संतप्त भावना सेनेच्या पदाधिकार्‍यांमध्ये आहे. याचे उट्टे काढण्यासाठी लोकसभेच्या रणसंग्रामात सेनेने नाराजीस्त्र उपसले आहे. दुसरीकडे भाजपाने सलग दोन वेळा विक्रमी मतांनी निवडून येणारे खासदार ए.टी.पाटील यांचे तिकीट कापल्याने ते नाराज आहेत. अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर भाजपाला पाठिंबा देणारे आमदार शिरीश चौधरी यांनीही बंडाचा झेंडा फडकावला आहे. भाजपाच्या उमेदवार स्मिता वाघ यांचे पती व भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यावर अनेकांची नाराजी असल्याने भाजपाची वाट बिकट मानली जात आहे.
भाजप-शिवसेनेची राज्यपातळीवर युती झाली असली तरी राज्यात अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवरील वाद धुसफसत आहे. यास जळगाव जिल्हा अपवाद नाही! जळगाव लोकसभा मतदारसंघात याची तिव्रता अधिक जाणवून येत आहे. विधानसभा क्षेत्रनिहाय राजकीय ताकद पाहिल्यास, चाळीसगावमध्ये भाजपाचे उन्मेश पाटील व जळगाव शहरात राजूमामा भोळे हे भाजपाचे आमदार आहेत. दुसरीकडे भडगाव-पाचोरामधून शिवसेनेचे किशोर पाटील व जळगाव ग्रामीण मधून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे सेनेचे प्रतिनिधीत्व करत आहेत. अमळनेर मधून अपक्ष आमदार शिरीष चौधरी व पारोळा-एरंडोलमधून राष्टवादीचे आमदार डॉ.सतीष पाटील आहेत मात्र पारोळा-एरंडोल भागात माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या माध्यमातून सेनेचे ताकद मोठी आहे. जळगाव शहरात माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यामुळे सेनेचे ताकद आजही टिकून आहे. सहा पैकी चार विधानसभा मतदारसंघात सेना भाजपाचा वरचढ असल्याचे चित्र आहे. मात्र भाजपाकडून सेनेला सातत्याने दुय्यम वागणूक दिली जात असल्याची शिवसैनिकांची भावना आहे. महाजन यांच्या दबावामुळे शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले आहेत, ते मागे घेवून जिल्हा परिषद व जळगाव महापालिकेत सेनेला सत्तेत सहभागी करुन घ्यावे, या मागण्यांवरुन सेनेने आक्रमक भुमिका घेतली आहे. यामुळे भाजपाची डोकंदुखी वाढली असून सेनेची समजूत काढण्यात भाजपानेत्यांची चांगलीच दमछाक होत आहे. दुसरीकडे खासदार ए.टी.पाटील यांचे तिकीट कापल्याने त्यांचे समर्थक देखील दुखावले आहेत. त्यांनी उमेदवार बदलाची मागणी करत बंडाचा झेंडा फडकावला आहे. खा.पाटील यांनी गत दहा वर्षात केलेल्या विकासकामांमुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्यासोबतीला भाजपापासून दुरावलेले माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील देखील आहेत. अपक्ष आमदार यांनीही अपक्ष उमेदवारीची दाखल करण्याची भूमिका जाहीर केली आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ही खेळी केल्याचे जाणकारांचे मत असले तरी यामुळे माजी आमदार साहेबराव पाटील दुखावू शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्मिता वाघ यांच्याकडे प्रचारासाठी पुरेसा वेळ नाही त्यातुलनेत राष्ट्रवादीने जोरदार प्रचार सुरु केला असल्याने भाजपासाठी दिल्ली दूर मानली जात आहे.

Post a Comment

Designed By Blogger