आश्‍वासनांचा पाऊस; मतदारराजा सावध रहा!


शेतकरी, सर्वसामान्यांपासून समाजातील प्रत्येक वंचित व तळागाळातील घटकाची चिंता केवळ एकच पक्षाला असते, तो पक्ष म्हणजे विरोधीपक्ष! असे चित्र देशातील निवडणुका जवळ आल्या किंवा घोषित झाल्या की सर्वदूर दिसून येते. सध्या देशात लोकसभा निवडणुकीचा धुराळा उडत आहे. २०१४ मध्ये आलेली मोदी लाट ओसरली असल्याचा दावा विरोधीपक्षांकडून येत असला तरी, मोदींना पराभूत करण्यासाठी देशातील अनेक प्रमुखपक्षांनी महाआघाडीच्या खाली आश्रय घेतला आहे. जेथे महाआघाडीचे गणित जमले नाही तेथे सोईस्कर राजकारणाचा नवा अंक सुरु झाला असून मतदारांसमोर राजकीय नौटंकी सुरु असल्याचे अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे. मात्र एवढे करुनही पुरेसे होणार नाही याची जाणीव (भीती म्हटल्यास वावगे ठरणार नाही) विरोधकांना असल्याने मतदारराजाला प्रसन्न करण्यासाठी त्यावर लोकप्रिय घोषणा व मोठंमोठ्या आश्‍वासनांचा पाऊस पाडायला देखील सुरुवात झाली आहे. यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गरिबी हटाओचा काँग्रेसचा पारंपारिक नारा नव्या पध्दतीने देत गरीबांच्या खात्यात वर्षाला ७२ हजार रुपये टाकण्याची घोषणा केली आहे. जाणाता राजांचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणार्‍या राष्ट्रवादीने तर तिहेरी तलाक, पाकिस्तानशी चर्चा करण्यासह राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक विषयांवर सरसकट आश्‍वासने देवून टाकली.

पाच वर्षात किती आश्‍वासने पुर्ण झाली?

२०१४ साली नरेंद्र मोदींनी अच्छे दिन ही लोकप्रिय घोषणा देत एकहाती सत्ता मिळवली. काळापैसा बाहेर काढण्यासाठी मोदींनी हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा बंद करण्याचा धाडसी निर्णय घेतला. (हा कितपत यशस्वी झाला, हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे.) नोटाबंदीमुळे परदेशात लपविलेला अब्जावधी रुपयांचा काळा पैसा सरकारच्या ताब्यात येईल आणि या प्रचंड रकमेतून प्रत्येक भारतीय नागरिकाच्या बँक खात्यावर १५ लाख रुपये जमा करण्यात येतील, असे स्वप्न भारतियांना दाखविण्यात आले होते मात्र नंतर तो जुमला असल्याचे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनी कबूल केले. गेल्या पाच वर्षात शेतकरी आत्महत्या, बेरोगारीसह अनेक मुलभुत प्रश्‍नांवर दिलेली किती आश्‍वासने पुर्ण झाली? याचा विचार मतदारांनी केला असेलच कारण भाजपाला त्याचा प्रत्यय नवी दिल्ली, गुजरातसह तिन महिन्यांपुर्वी झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आलाच आहे. यासर्व पार्श्‍वभूमीवर २०१९ मध्ये भाजपाची वाट बिकट असतांना काही घडामोडी अशा घडल्या की भाजपाच्या जीवात जीव आला. 

भाजपाला नवसंजिवनी

१४ फेब्रुवारी रोजी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने पुलवामा येथे भारतीय जवानांच्या बसवर केलेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. याचा बदला घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लष्कराला प्रतिहल्ला करण्याबाबत संपूर्ण स्वातंत्र्य दिले. २६ फेब्रुवारी रोजी भारतीय लष्कराने एअर स्ट्राईक करून बालाकोट येथील जैशचा संपूर्ण तळ उद्ध्वस्त केला. यानंतर भारतीय वायूसेनेने पाकिस्तानचे एक विमान पाडले मात्र यावेळी वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन हे पाकिस्तानच्या हाती लागले. भारताच्या आक्रमक कुटनितीपुढे झुकत पाकिस्तानला दोन दिवसातच अभिनंदन यांना सोडावे लागले, या सर्व घटनांमुळे मोदींचा डंका देशभर वाजला, यामुळे भाजपाला नवसंजिवनी मिळाली, हे त्रिकालबाधित सत्य आहे. या सर्व घटना-घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर मोदींना पराभूत करणे सहजासहजी शक्य नाही, याची जाणीव विरोधी पक्षांनाही असल्याने महाआघाडीचा प्रयोग करण्यात आल्यानंतर आता प्रत्यक्ष रणधुमाळीला सुरुवात झाल्यानंतर मतदारांना आकर्षित करण्यासाठी घोषणा व आरोप-प्रत्यारोपांचा दररोज नवा अध्याय बघायला मिळत आहे. यात काँग्रेसने आपले पारंपारिक हत्यार बाहेर काढत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व राजीव गांधींप्रमाणे गरिबी हटाओचा नारा देतदेशातील २० टक्के गरीब कुटुंबांना वर्षाला ७२ हजार रुपये देणार असल्याची घोषणा राहुल गांधींनी केली. ज्यांचे मासिक उत्पन्न १२ हजारापेक्षा कमी आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. यात वर्षाला ७२ हजार रुपये गरीब कुटुंबाच्या खात्यात टाकले जाणार असून या निर्णयामुळे देशातील ५ कोटी कुटुंब आणि २५ कोटी लोकांना फायदा होणार असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. २१ व्या शतकात भारतात गरिबी असावी हे आम्हाला मान्यच नाही. मोदींनी श्रीमंतांचा आणि गरिबांचा असे दोन भारत निर्माण केले आहेत. पण आम्ही एकच भारत निर्माण करणार आहोत. देशाला गरिबीतून बाहेर काढणार आहे. मला गरिबांना न्याय मिळवून द्यायचा आहे. त्यांचाही आदर झाला पाहिजे असंही राहुल गांधींनी म्हटले आहे. 

जेमतेम दोन-चार खासदार असणार्‍या राष्ट्रवादीचे धाडस!

राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. जाहीरनाम्यात अनेक आश्वासने देण्यात आली असून यामधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाकिस्तानसोबत चर्चा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. जेमतेम दोन-चार खासदार असणार्‍या राष्ट्रवादीचे हे धाडसंच म्हणावे लागेल. यासह राष्ट्रवादीने जाहीरनाम्यात परराष्ट्र धोरणासंबंधी आपली भूमिका जाहीर केली असून, आम्ही पाकिस्तानसोबत पुन्हा एकदा चर्चेला मोकळी वाट करुन देऊ आणि त्यात दहशतवाद हा मुख्य मुद्दा असेल. यासोबतच चीनसोबत किमान संबंध टिकवून ठेवणे गरजेचे असल्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच सातत्याने शस्त्रपुरवठा कऱणे आणि सध्याच्या उपकरणांची देखभाल यासाठी साह्य पुरवणार्‍या रशियासोबत संबंधी पुनरुज्जीवित करणे आवश्यक असल्याचंही म्हटले आहे. चीनसंबंधी आपली भूमिकाही राष्ट्रवादीने स्पष्ट केली आहे. ‘चीनसाठी आम्ही चर्चेचे सर्व मार्ग खुले ठेवू. मात्र त्यांनी भारतीय औषधे, कृषी उत्पादने आणि आयटी सेवांसाठी आपली बाजारपेठ खुली करावी अशी आमची मागणी असेल, अस राष्ट्रवादीने जाहीरनाम्यात लिहिले आहे. बाकी काहीही हो, मात्र राष्ट्रवादीच्या या धाडसाचे कौतुक करावे की रडावे? हा ज्याच्या त्याच्या दृष्टीकोनाचा भाग आहे. आर्थिक विकास, रोजगार निर्मिती, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांवर भर, कामगार कायद्यात सुधारणा, कर सुधारणा, मानव संसाधन विकास, आरोग्याचा हक्क, महिला व बाल कल्याण, युवा आणि क्रीडा, ज्येष्ठ नागरीक, परराष्ट्र धोरण, नागरी विकास, ग्रामीण विकास आणि पंचायत राज, वाहतूक, पर्यावरण, सामाजिक न्याय, अल्पसंख्यांक, लोकशाही संस्थांची चौकट बळकट करताना, मनरेगा, जल आणि सिंचन विकास, उत्पन्नातील असमानता या विषयावर भरभरुन आश्‍वासने राष्ट्रवादीने दिली आहेत. विरोधकांनी इतकी आश्‍वासने देण्याचे मुख्य कारण म्हणजे लोकांची मानसिकता सध्या तरी मोदींच्या बाजूने आहे. तरीही राजकारणात काहीही घडू शकते. त्यामुळे अशा सवंग लोकप्रिय घोषणांचा मतदार राजावर किती परिणाम होतो, हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल!

Post a Comment

Designed By Blogger