जलसंपदा मंत्र्यांची 'महाजनकी'


जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व स्थानिक स्वराज्य संस्थामधील विजय हे जणू एक समीकरणच झाले आहे. नाशिक व जळगाव महापालिका, जळगाव जिल्हा परिषद, जामनेर नगर पालिकेसह जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये भाजपाला एकहाती सत्ता मिळवून देण्याचे शिल्पकार म्हणून गिरीश महाजन यांचे नाव घेतले जाते. आता त्यात धुळे महापालिका व शेंदूर्णी नगर पंचायतीची भर पडली आहे. महाजन यांनी आतापर्यंत मिळवून दिलेल्या विजयांमध्ये धुळे महापालिकेचे प्रचंड महत्व आहे. कारण येथे त्यांची लढत विरोधकांपेक्षा स्वपक्षातील बलाढ्य व आक्रमक आमदाराविरुध्द होती. धुळ्यात भाजपाला यश मिळणार नाही असे मानले जात असतांना महाजनांनी भाजपाचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांच्यासह सर्व विरोधकांना चारिमुंड्या चित करत एकहाती विजय मिळवला.
मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणार्‍या गिरीश महाजन यांनी अल्पवधीतच केवळ महाराष्ट्राताच नव्हे तर देश पातळीवर स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. मराठा आंदोलन, शेतकरी मोर्चा, ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांचे आंदोलन यासह अनेक पेचप्रसंग त्यांनी लिलया सोडवल्यामुळे भाजपाचे संकटमोचक म्हणून नवी ओळख निर्माण करण्यात ते यशस्वी झाले आहेत. कुंभमेळ्याची जबाबदारी त्यांनी यशस्वी पाडल्यानंतर त्यांची दखल थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. अनेक परदेशी विद्यापीठांनी त्यांना व्याख्यानांसाठी आमंत्रित केले. मॅनेजमेंट गुरुचे कसब अंगी असणार्‍या महाजनांनी हे कौशल्य निवडणुकांमध्ये वापरत निवडणूक जिंकण्याचा नवा फॉम्यूला तयार केला आहे. जो महाजन पॅटर्न म्हणून ओळखला जावू लागला आहे. याची प्रचिती सर्वप्रथम नाशिक महापालिका निवडणुकीत आली. नाशिकला मनसे व विशेषत: राज ठाकरे यांची मोहिनी तोडत व भुजबळांसारख्या मातब्बरांना धक्का देत त्यांनी भाजपाला एकहाती सत्ता मिळवून दिली. पालघरच्या निवडणुकीत शिवसेनेला धक्का दिला. नाशिकच्या यशानंतर त्यांनी स्वत:चा गड असलेल्या जामनेर नगरपालिकेत २५ पैकी २५ जागा जिंकण्याचा विक्रम करत विरोधकांचा सपशेल धुव्वा उडवला. यानंतर जळगाव महापालिकेत माजी मंत्री सुरेश जैन यांची सत्ता उलथवून टाकत प्रथमच भाजपाचा झेंडा फडकवला. विशेष म्हणजे यावेळी महाजन यांच्या तिकीट वाटपासह अनेक विषयांना भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी विरोध दर्शवला होता. मात्र विजयाचे मेरीट असणार्‍या उमेदवारांना अन्य पक्षातून आयात करुन त्यांनी भाजपाला एकहाती सत्ता मिळवून दिली. आता त्यांनी स्वत:च्या मतदारसंघातील शेंदूर्णी नगरपंचायतीवरही भाजपाचा झेंडा फडकवला आहे. मात्र यापेक्षा मोठा करिष्मा त्यांनी धुळे महापालिकेत करुन दाखविला आहे. तसे पाहिले तर धुळे शहर प्रचंड संवेदनशिल शहर म्हणून ओळखले जाते. गुंडगिरी, माफियागिरीसह अवैध धंद्यांच्या वाढत्या प्रभावामुळे शहराच्या नावलौकिलाला गालबोट लागले आहे, हे सत्य कोणीही नाकारु शकत नाही. अशा परिस्थितीत धुळ्यात भाजपाला मिळालेले यश खुपकाही सांगुन जाते. धुळ्यात जनसंग्राम पक्षाचे नेते अनिल गोटेे यांना एकनाथराव खडसेंनी भाजपात आणून त्यांना आमदार देखील बनविले. गोटे हे अभ्यासू व आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्यासमोर स्थानिक नेत्यांचा निभाव लागणार नाही याची कल्पना पक्षश्रेष्टींना असल्याने केंद्रात संरक्षण राज्यमंत्री असलेले डॉ.सुभाष भामरे व राज्यातील कॅबिनेट मंत्री जयकुमार रावल धुळ्यात असतांना फडणविसांनी धुळ्याची जबाबदारी महाजनांवर सोपवली. आतापर्यंतच्या निवडणुकांपेक्षा ही निवडणूक वेगळी असण्याचे महत्वाचे कारण म्हणजे येथे स्वपक्षाच्या मातब्बर नेत्याविरुध्द लढाई होती. गोटे हे स्थानिक असल्याने त्यांना धुळेकरांच्या अडचणी व अपेक्षा यांची माहिती होतीच त्या दृष्टीने त्यांनी निवडणुकीच्या किमान चार ते पाच महिन्यांपासून तयारी सुरु केली होती. मात्र त्यांचा भामरे, रावल व महाजन या त्रिकुटाला विरोध होता. महाजन यांनी पार्टी विथ डिफरन्सचा मुखवटा काढून ठेवत जळगावप्रमाणे अन्यपक्षातील विजयी होऊ शकणार्‍या उमेदवारांना आयात करत भाजपातर्फे तिकीट दिले. येथूनच गोटे विरुध्द भाजपा सामना रंगालयला सुरुवात झाली. यात गोटेंनी केलेला आक्रास्ताळेपणा धुळेकरांना रुचला नाही. यासह शिवसेनेच्या उमेदवारांना जाहीर केलेला पाठिंबा, राष्ट्रवादीशी जुळवून घेतलेली नाळ व स्वत:ची प्रतिमा या चक्रात गोटे अडकले व पुर्णपणे अपयशी ठरले. गुंडगिरी, रेल्वेमार्ग हे वर्षानुवर्षे चालणारे मुद्दे घेवून गोटेंनी प्रचारात खालच्या पातळीवर भाजपावर टीका करत वातावरण पेटवले. मात्र धुळेकरांना हा आक्राळेस्तेपणा रूचला नाही. हेच हेरुन महाजनांनी गोटे यांच्या टिकेला उत्तर न देता. विकासाच्या अजेंड्यावर लक्ष केंद्रीत केले. सुरुवातीला महाजन यांना धोबीपछाड देण्यासाठी गोटेंनी विधानसभेत राजीमानास्त्र देखील वापरले. धुळे महापालिकेचा मुद्दा त्यांनी थेट विधानभवनात उपस्थित केल्याने सहाजिकच संपुर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे केंद्रीत झाले. या राजीमानास्त्रमुळे भाजप अडचणीत येवून मुख्यमंत्री महाजनांना बाजूला करतील, अशी अपेक्षा गोटेंना होती मात्र मुरब्बी मुख्यमंत्र्यांनी हा विषय हाताळतांना राजकीय कसब पणाला लावत गोटेंची समजूत काढली. यामुळे विजयी मुद्रेने गोटे धुळ्यात परतले. यावेळी भाजपाच्या गोटात अस्वस्थता पसरली होती मात्र महाजन यांनी शांतपणे काम सुरु ठेवले. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी फडणवीस व महाजन यांची खेळी गोटेंच्या लक्षात आली. मात्र तो पर्यंत खुप उशिर झाला होता. अखेर गोटेंनी जनसंग्राम पक्षातर्फे उमेदवार उभे करत भाजपाविरुध्द उघडपणे बंड पुकारले. यावेळी महाजन यांनी राजकीय कसब पणाला लावत गोटेंविरुध्द रणणिती आखत त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी देखील केली. त्याचे परिणाम निकालात दिसून आले. यामुळे गिरीश महाजनांच्या यशाला प्रचंड महत्व आहे. आगामी काळात होवू घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांची रंगित तालीम म्हणून या निवडणुकांकडे पाहिले जात आहे. आगामी काळ भाजपासाठी २०१४ प्रमाणे सुकर नसेल याची प्रचिती आज जाहिर झालेल्या मध्यप्रदेश, राजस्थान, छस्तीसगड, मिझोरम व तेलंगाणा विधानसभा निवडणुकांच्या निकालावरुन येते. पाचही राज्य भाजपाच्या हातातून निसटली आहे. यामुळे मोदी लाट ओसरली असल्याचे दिसून येते. यामुळे राज्यातील विधानसभा निवडणूक देवेंद्र फडणवीस यांना स्वत:च्या कसबीवरच लढावी लागणार आहे. यावेळी महाजन यांच्या निवडणुकीत हमखास यश मिळवून देणार्‍या महाजन पॅटर्नचा वापर देखील करता येईल, यामुळे गिरीश महाजन यांचे महत्व आगामी काळात अजून वाढणार आहे, यात दुमत नाही. मात्र नाशिक, जळगाव व धुळे महापालिका निवडणुकीदरम्यान दिलेली आश्‍वासने ‘जुमला’ न ठरो हीची अपेक्षा आहे.

Post a Comment

Designed By Blogger