इस्त्रोची 'उंची' अवकाशापेक्षा उंच


खास हवाई दलासाठी विकसित करण्यात आलेल्या 'जीसॅट ७ ए' हा संपर्क उपग्रह भारतीय अंतराळ संशोधन संघटना म्हणजेच इस्रोने लाँच केला. २०१८ हे वर्ष इस्त्रोसाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरले. या वर्षात इस्त्रोने नेत्रदिपक कामगिरी करत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव विशिष्ट उंचीवर नेवून ठेवले. गेल्या वर्षी इस्रोने १०४ उपग्रह एकाच वेळी सोडण्याचा जो विक्रम केला होता. यावर्षीही इस्त्रोने नवे विक्रम प्रस्थापित केले. इस्रो ने आपल्या पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल (पीएसएलव्ही) सी-४३ च्या मदतीने ८ देशांचे ३० उपग्रह अवकाशात सोडले या ३० पैकी २३ उपग्रह अमेरिकेचे होते तर उर्वरित ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कोलंबिया, फिनलँड, मलेशिया, नेदरलँड आणि स्पेन या ८ देशांचे होते. केवळ गेल्या ३५ दिवसात चार उपग्रहांना अवकाशात पाठविण्याची उल्लेखनिय कामगिरी इस्त्रोने बजावली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे संपुर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या चंद्रयान-२ च्या लाँचिंगची तयारी अंतिम टप्प्यात आहे. ३१ जानेवारी २०१९ ला ते लाँच केले जाणार आहे. इस्त्रो विविध उपग्रहांना विशिष्ट उंचीवर पाठवित असतांना स्वत:देखील मोठ्या उंचीवर पोहचली आहे, ज्या उंचीचा इतर देशांनाही हेवा वाटतो.


इस्त्रो विविध प्रकारचे उपग्रह अवकाशात सोडत असते. यातील अनेक तांत्रिक बाबी सर्वसामान्यांच्या आकलनापलिकडे असतात, मात्र यामुळे त्याचे महत्व कमी होते असे नाही. इस्रोची धुरा के. सिवान यांच्या हाती आहे. गेल्या वर्षी इस्रोने १०४ उपग्रह एकाच वेळी सोडण्याचा जो विक्रम केला होता त्यात सिवान यांचा सिंहाचा वाटा होता. विशेष म्हणजे ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक तयार करण्यातही त्यांचीच विशेष कामगिरी कारणीभूत ठरली, स्वदेशी क्रायोजेनिक इंजिने विकसित करण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे, त्यामुळेच ते 'रॉकेट मॅन' म्हणून ओळखले जातात. भारताचा सर्वात शक्तिशाली असा जीएसएलव्ही (भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक) तयार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. 

सिवान यांच्या नेतृत्वाखाली इस्त्रोची घोडदौड रॉकेटच्या गतीने सुरु आहे. ३५ दिवसांत चार उपग्रह प्रक्षेपित झाले आहेत. यात १४ नोव्हेंबर रोजी जीएसएलव्ही मार्क-३ डी-२ द्वारे जीसॅट-२९ २९ नोव्हेंबर रोज पीएसएलव्ही सी-४३ द्वारे 'हायसिस', ५ डिसेंबरला फेंचगुयाना (विदेशी जमिनीवरून) द्वारे जीसॅट-११ व आता १९ डिसेंबर रोजी जीएसएलव्ही एफ- ११ द्वारे जीसॅट- ७ ए या उपग्रहाने चालू वर्षातील अखेरचे यशस्वी उड्डाण केले. श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून बुधवारी यशस्वी प्रक्षेपण झाले. स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनाचा समावेश असलेल्या भूस्थिर उपग्रह प्रक्षेपकाच्या (जीएसएलव्ही एफ ११) साह्याने २२५० किलोच्या जीसॅट ७ एला दीर्घवर्तुळाकार कक्षेत सोडण्यात आले. जीसॅट ७ एच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे हवाई दलाची तांत्रिक क्षमता अधिक बळकट होणार आहे. उपग्रहावरील यंत्रणांच्या साह्याने हवाई दलाला सर्व रडार केंद्रे एकमेकांशी जोडणे शक्य होणार असून, प्रत्यक्ष कारवाईदरम्यान त्यातून अचूक आणि अद्ययावत माहिती मिळू शकणार आहे. याशिवाय, आकाशात असलेल्या लढाऊ विमानांना एकमेकांशी; तसेच ग्राउंड स्टेशनशी विनाअडथळा संपर्कात राहता येणार आहे. या उपग्रहाच्या सुविधांचा विस्तार देशाच्या सीमेबाहेरही असल्यामुळे देशाबाहेरील कारवायांसाठीही जीसॅट ७ ए हवाई दलासाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावेल. रडार, हवाईतळ व एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल विमानांना आपसात जोडणे या उपग्रहामुळे शक्य होणार आहे. यामुळे विमाने हवेतच परस्परांशी संपर्क साधू शकतील. या माध्यमातून दीर्घ पल्ल्यावरील कोणतेही विमान व युद्धनौकांचा शोध घेऊ शकेल. ड्रोनद्वारे ग्राउंड स्थानकापर्यंत व्हिडिओ व छायाचित्रे पाठवून निगराणीस मदत करेल. 

जीसॅट-७ ए इतर उपग्रह व ग्राउंश स्थानकावरील रडारसह भारतीय समुद्री क्षेत्रातील स्थानकांचे कव्हरेज वाढवेल. दीर्घ पल्ल्यावरील ड्रोन, यूएव्हीच्या माध्यमातून शत्रूच्या तळांवर हल्ल्याची रेंज वाढवण्यासाठी नियंत्रणात साह्य करेल. भारत अमेरिकेकडून गार्झियन ड्रोन खरेदी करण्याची तयारी करतोय. ते अधिक उंचीवरून लक्ष्यावर हल्ला करू शकणार आहेत, यास या नव्या उपग्रहाचा खुप मोठा फायदा होणार आहे. हा उपग्रह केयू बँडचा असल्याचे इस्त्रोने म्हटले आहे. केयू बँड म्हणजे काय व त्याचे फायदे कोणते हे जाणून घेणे महत्वाचे आहे. केयू बँडमुळे लहान अँटेनाद्वारेही सिग्नल प्राप्त केले जाऊ शकतात, इतर कोणत्याही बँडच्या तुलनेत अधिक बीम कव्हरेज देतो, पाऊस व इतर ऋतूंतील अडथळ्यांनी कमी प्रभावित होतो. यामुळे या उपग्रहाचा वापर सर्वसामान्य नागरिक व लष्कर संवादासाठी करता येईल. यामुळेच या उपग्रहाला संरक्षण क्षेत्रात प्रचंड महत्वपूर्ण मानले जात आहे. खास लष्करी सेवेसाठी बनवण्यात आलेला हा दुसरा दळणवळण उपग्रह आहे. 

जीसॅट-७ ए दळणवळण उपग्रहाचा खर्च ५०० ते ८०० कोटी रुपये आहे. या उपग्रहाच्या चार सौर पॅनलमध्ये ३.३ किलोवॅट ऊर्जानिर्मिती करण्याची क्षमता आहे. जीसॅट-७ ए च्या मदतीने नौदलाला २ हजार सागरी मैल क्षेत्रावर लक्ष ठेवता येते. भारतीय नौदलाच्या युद्धनौका, पाणबुडया आणि लढाऊ विमानांच्या ठिकाणांविषयीही अचूक माहिती मिळणार आहे. यावरुन या उपग्रहाचे महत्व लक्षात येते. गेल्या काही वर्षात इस्त्रोने अमेरिका, चीन व रशिया सारख्या महासत्तांना मागे टाकत अवकाश क्षेत्रात स्वत:चे नाव कोरले आहे. यामुळे अन्य देश त्यांचे उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी इस्त्रोचे सहाय्य घेत आहेत. इतर देशांमध्ये ज्या कामांसाठी कोट्यवधी डॉलर्सचा खर्च येतो तेच काम इस्त्रो काही लाख रुपयांमध्ये कसे करते, हे कोडे जगभरातील शास्त्रज्ञांना पडले आहे. गत दोन वर्षात इस्त्रोने स्थापित केलेल्या विक्रमांना तोडण्यासाठी इस्त्रो स्वत:च पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. इस्रो २०२२ मध्ये अवकाशात प्रथमच मानवाला पाठवणार आहे. याबरोबरच महत्त्वाकांक्षी 'चंद्रयान २'चे कामही २०१९ मध्ये पूर्ण होणार आहे. मानवाला अवकाशात पाठवण्यासाठी २०२१ वर्षअखेर अथवा २०२२ वर्षाच्या सुरुवातीपर्यंतची डेडलाइन आहे. तसेच, 'चांद्रयान २' चे काम पूर्ण झाले असून, पुढील वर्षी जानेवारी अथवा फेब्रुवारीत 'चांद्रयान २' चंद्रावर पाठवण्यात येण्याची शक्यता आहे. चंद्रावर सुरक्षितपणे 'चांद्रयान २' पोहोचावे या दृष्टीने त्याची बांधणी केली असून, ज्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागावरील माहिती संशोधनासाठी पाठवू शकेल. या मोहिमांमुळे अमेरिकेनंतर भारत हा पहिला देश असेल ज्याने चंद्रावर मानवला पाठवले. इस्त्रोच्या या मोहिमेमध्ये त्यांना यश मिळो हिच १२५ कोटी भारतीयांची इच्छा आहे.

Post a Comment

Designed By Blogger