एनडीएची पडझड


मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तिसगड, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा दणदणीत पराभव झाल्याने राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपुर्वीच तडे जावू लागले आहेत. गेल्या आठवड्यात बिहारमधील प्रमुख राजकीय पक्षांपैकी एक असलेल्या राष्ट्रीय लोक समता पार्टीचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देत एनडीएचीही साथ सोडली. त्यापाठोपाठ बिहार मधीलच प्रमुख नेते मानले जाणारे लोक जनशक्ती पार्टीचे प्रमुख रामविलास पासवान एनडीएची साथ सोडून यूपीएमध्ये सामिल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात एनडीएचा प्रमुख घटक पक्ष असलेली शिवसेना नाराज असून ते भाजपाची साथ सोडण्याची राजकीय परिस्थिती दिसून येत आहे. मोदी-शहा या जोडीची अतिमहत्वकांक्षा व त्यासाठी पार्टी विथ डिफरन्सचा मुखवटा बाजूला काढून ठेवत भाजपाने केलेल्या स्वार्थी व आत्मघातकी युती-आघाड्या यास कारणीभूत आहेत. यात काश्मिरमध्ये भाजपची पीडीपीबरोबरची आघाडी किंवा दीर्घकाळ भाजपविरोधी राजकारण केलेल्या तेलगू देसमसोबतची युती असो, यांचा प्रामुख्याने उल्लेख करावाच लागेल.


राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ही भारतामधील समवैचारिक राजकीय पक्षांची एक आघाडी आहे. १९९८ साली भारतीय जनता पक्ष व इतर १२ पक्षांनी एकत्र येऊन रालोआची स्थापना केली. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी इत्यादी वरिष्ठ नेते रालोआचे संस्थापक होते. २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये रालोआने लोकसभेमधील ५४३ पैकी ३३६ जागा जिंकून दणदणीत बहुमत मिळवले. २६ मे २०१४ रोजी भाजप नेते नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले. मात्र भाजपाला मिळालेल्या अपुतपूर्व यशानंतर एनडीएच्या घटकपक्षांना दुर्लक्षित करणे सुरु झाले. 

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी काँग्रेसमुक्त भारतासोबतच शतप्रतिशत भाजपच्या दिशेने वाटचाल सुरू केली. मित्रपक्षांना चेपून स्वत: मुसंडी मारण्याचे प्रयत्न पहिल्या दिवसापासून सुरु झाले. भाजपच्या या स्वार्थी राजकारणामुळे मित्रपक्षांमध्ये आधीपासून नाराजी होती, पण गेल्या काही दिवसांपासून ती चव्हाट्यावर येऊ लागली आहे. यात सर्वाआधी बंडाचा झेंडा फडकावला तो भाजपचे सर्वांत जुने मित्रपक्ष शिवसेना आणि अकाली दल यांनी! शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आगामी सर्व निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचं जाहीर केलं आहे. अकाली दलानेही भाजप युतीचा धर्म पाळण्यात कमी पडत आहे, असं म्हणत एकट्याने लढण्याचे संकेत दिले आहेत. आंध्र प्रदेशाला विशेष दर्जा देण्याच्या वचनाला वाटाण्याच्या अक्षता लावून आवश्यक निधी न दिल्यामुळे तेलगू देसम पक्ष मोदी सरकारवर नाराज आहे. या सर्व नाराजी नाट्यात एनडीएमधून बाहेर पडण्यासाठी पहिले पाऊल टाकले ते उपेंद्र कुशवाह यांनी, 'लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आम्हाला ज्या जागांची ऑफर दिली आहे ती आम्हाला सन्मानजनक वाटत नाही.' अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त करत, नितीशकुमार यांनी त्यांच्याशी जागावाटपावरून चर्चाही करण्यास नकार दिला. नितीशकुमार यांचे समर्थन करणारे भाजपचे नेते सुशिलकुमार मोदी यांच्यावरही यावेळी कुशवाह यांनी तोंडसुख घेतले. मुळात त्यांचे कट्टर विरोधक नितिश कुमार यांच्याशी भाजपने परस्पर युती केल्याचं त्यांना अजिबात रुचलेलं नाही. यामुळे त्यांनी थेट केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देत युपीएचा ‘हात’ धरला. जसे मध्यप्रदेश, राजस्थान व छस्तिसगड मध्ये झालं तसचं बिहारमध्येही होईल, अशी भीती त्यांना सतावत आहे. 

दुसरे महत्वाचे कारण म्हणजे मोदींची घसरती लोकप्रियता, २०१४ नंतरची दोन वर्षे स्वत: मोदी लोकप्रियतेच्या शिखरावर होते. मात्र गेल्या वर्षभरात त्यांचा आलेख खाली उतरला आहे. नोटबंदी, जीएसटी, महागाई, शेतमालाला नसलेला हमी भाव अशा अनेक कारणांमुळे मोदींवरील नाराजी दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे संख्याबळ खाली घसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, हेच हेरत राहूल गांधी मोदींवर पुर्ण ताकदीनिशी तुटून पडले आहे. तिन राज्यात मिळालेल्या यशामुळे त्यांचा उत्साह दुणावला आहे. काही महिन्यांपूर्वी ही परिस्थिती नव्हती. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने एनडीए घटक पक्षांची बैठक नवी दिल्लीत आयोजित केली होती. यावेळी २०१९ सालची लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली लढण्याचा ठराव घटकपक्षांनी एकमताने मंजूर केला होता. भाजपच्या दुर्लक्षित वागणुकीमुळे नाराज असलेल्या शिवसेनेनेही या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. यानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी मंत्रीमंडळ विस्तारासह अनेक महत्वपूर्ण विषयांवर शिवसेनेला विश्‍वासात न घेतल्याने शिवसेना प्रचंड संतापली आहे. 

भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात, एनडीए ही फक्त कागदावर आणि बैठकांपुरती उरली आहे. प्रत्यक्षात एनडीएचा मृत्यूच झाला आहे,’ अशी जळजळीत प्रतिक्रिया शिवसेनेनचे खासदार संजय राऊत यांनी नुकतीच दिली होती. 'राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीपदासाठी मतं हवी असतात तेव्हा किंवा एखाद्या अधिवेशनापुरती भाजपला एनडीएची आठवण येते. हा सगळा आकड्यांचा खेळ आहे. आज त्यांच्याकडं बहुमत आहे आणि बहुमत अनेकदा पाशवी असतं. त्यांच्याकडं बहुमत नसतं तर त्यांनाही मुंबईला आणि हैदराबादला यावं लागलं असतं.' हे त्यांचे विधान खुप काही सांगून गेलं. यामुळे शिवसेनेची नाराजी दुर करणे भाजपाला आता अवघड झाले आहे. आता एनडीएच्या नाराज घटक पक्षांमध्ये रामविलास पासवान यांचेही नाव जोडले गेले आहे. पासवान सध्या केंद्रात मंत्री आहेत. त्यांचे पुत्र खा. चिराग यांनी राहुल गांधी हे परिपक्व नेते असल्याचे विधान नुकतेच केले होते. त्याआधी मंदिर हा एनडीएचा अजेंडा नसल्याचेही ते म्हणाले होते. लोकसभा निवडणुकांत एनडीएशी जागावाटपावरून लोकजनशक्ती पक्षाचेही मतभेद झाले आहेत. रामविलास पासवान हे हवामानतज्ज्ञ आहेत. वारे कोणाच्या दिशेने वाहत आहेत, कोणत्या पक्षाला सत्ता मिळण्याची शक्यता आहे, याचा त्यांना बरोबर अंदाज येतो व ते मग त्या पक्षाशी युती करतात, असे लालूप्रसाद यादव यांनीही म्हटले होते. यामुळे बिहारमध्ये पासवान यांची साथ सुटणे हे भाजपाला परवडणारे नाही. भाजपाची दिवसेंदिवस होणारी ही पडझड भाजपासाठी येणार्‍या संकटांची चाहुल तर नाही ना? याचा अंदाज घेणे गरजेचे आहे. अन्यथा नरेंद्र मोदींचे पुन्हा पंतप्रधान होण्याचे स्वप्न भंगण्यास वेळ लागणार नाही!

Post a Comment

Designed By Blogger