जळगावच्या केळी व भरित वांग्यांना ब्रॅण्डिंगची गरज


द्राक्ष म्हटले की नाशिक, हापूस आंबा म्हटले की कोकण व स्ट्रॉबेरी म्हटली की महाबळेश्‍वर तसेच केळी आणि भरीताची वांगी म्हटले की, जळगावचे नाव आपोआपच तोंडातून बाहेर पडते. जळगावची केळी आणि भरीताच्या वांग्यांची महती सातासमुद्रापार पोहचली आहे, याचा अभिमान वाटतो. मात्र जसे द्राक्ष, आंबा, स्ट्रॉबेरीची ब्रॅण्डिंग करण्यात आली आहे, तशी आपल्या केळी व वांग्याची का नाही? याची खंतही वाटते. द्राक्षे, आंबा, महाबळेश्‍वर स्ट्रॉबेरी हे संपुर्ण युरोपसह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डंका वाजवत आहे. मात्र त्या तुलनेत जळगावची केळी अजूनही उपेक्षित आहे.

द्राक्ष, आंबासारख्या पिकांना भौगोलिक मानांकन (जिऑग्राफिकल इंडिकेशन, जीआय) असल्याने त्यांना परदेशात मोठी मागणी असते, अशी सोईस्कर पळवाट काढून आपण खान्देशी लोक स्वत:चीच फसवणूक करत आलो आहोत. यामुळे जळगावची केळी मध्यप्रदेश व दिल्लीच्या पुढे सरकायला तयार नाही! रावेर, यावल, फैजपूर मधील काही प्रगतीशिल शेतकरी केळी निर्यात करण्याचा प्रयत्न करतात मात्र त्यांना मोठ्याप्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतो. केळीचीच अशी परिस्थिती असल्याने बिचारी भरिताची वांगी महाराष्ट्राबाहेर देखील निघायला घाबरतात. आता आपल्या केळी पाठोपाठ भरिताच्या वांग्यांनाही जीआय मानांकन मिळाले आहे. यामुळे अन्य फळांप्रमाणे आपले आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रँण्डींग करण्याची कवाडे खान्देशवासियांना उघडी झाली आहेत. यात दुग्धशर्करा योग म्हणजे भारतातून आयात होणार्‍या वांग्यांवर युरोपिय समुदायाने मे २०१४ मध्ये घातलेली बंदी आता उठवण्यात आली आहे. या सुवर्णसंधीचे सोनं करण्यासाठी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

यासाठी जीआय मानांकन म्हणजे काय? व युरोपिय समुदायाने वांग्यांसह आंबा, कारले, पडवळ, अळूच्या भाज्यांवर बंदी का घातली होती? हे समजून घेणे आवश्यक आहे.

कोणत्याही पिकाचे वैशिष्टे हे तेथील हवामान, पाणी व माती यावरून ठरत असते. कारण विशिष्ट हवामानात वेगवेगळी पिके घेतली जातात. यावरून त्या पिकाचा दर्जा व उत्पन्न ठरते. शेतकर्‍यांच्या व्यवस्थापन कौशल्यातून शेतीमालास आकार, चव, रंग, वास हे वेगळेपण प्राप्त होत असते. या दर्जाची खात्री जीआय मानांकनातून मिळते. अशा शेतीमालास ग्राहक अधिक दर देऊन खरेदी करायला तयार असतो. एखाद्या पिकाला जीआय मानांकन मिळाल्यास असा शेतीमाल जागतिक व्यापार संघटना सर्व सभासद राष्ट्रांमध्ये विक्रीस पात्र होतो. जीआय मिळाल्याने जळगाव केळीला अधिक भाव मिळेल. जागतिक ग्राहकांना शुद्धता, गुणवत्ता व जळगावच्या मातीच्या गंधाची हमी मिळेल. याचा फायदा शेतकर्‍यांनाच होईल. परंतू जीआय मानांकन मिळाल्याने नेमके काय फायदे होतात, याबाबत अनेक शेतकरी अनभिज्ञ आहेत, याबाबत प्रबोधन झाल्यास त्याचा मोठा फायदा होवू शकतो. यासाठी स्थानिक पातळीवर पुढाकार घेणे गरजेचे आहे. जसे महाबळेश्वरला स्ट्रॉबेरीपासून तयार होणार्‍या उत्पादनांचे शेकडो कारखाने उभे राहीले, नाशिकमध्ये सर्वाधिक वायनरी उभ्या राहील्या तसे केळीपासून तयार होणार्‍या उत्पादनांचे उद्योग अजूनही उभे राहिलेले नाहीत. जळगावच्या केळीवरील आधारित उद्योग रस्त्याच्या कडेला थाटण्यात आलेल्या केळी वेफर्सच्या पलीकडे जाणे आवश्यक आहे.

आता वळूया भरिताच्या वांग्याकडे, युरोपिय देश विविध देशांकडून भाजीपाला, फळे यांची आयात करत असतात. परंतू युरोपिय देशांमध्ये आरोग्यविषयक तसेच अन्य बाबतीतलेे नियम फार कडक आहेत. आपल्याकडे फळ व पालेभाज्या पिकवतांना मोठ्याप्रमाणात रासायनिक खतांचा व औषधांचा वापर केला जातो यामुळे वांग्यासह आंबा, कारले, पडवळ, अळूच्या भाज्यांमधील काही हानीकारक घटक युरोपच्या जैवसुरक्षेला धोका निर्माण करत असल्याचे कारण देत याच्या आयातीवर युरोपने बंदी घातली होती. शेतमालाच्या उत्पादनात शेतकर्‍यांकडून होणार्‍या चुका टाळण्यासाठी सरकारनेच पुढाकार घेवून शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले पाहिजे. रासायनिक प्रक्रियेएवजी सेंद्रिय शेतीकडे वळायला हवे. जास्तीत जास्त शेतमाल निर्यात करायचा असेल तर गुणवत्तेत तडजोडी करणे बंद झाले पाहिजे, यासाठी शासनाने कडक धोरण आखायला हवे. शेतमालाच्या निर्यातीतून शेतकर्‍यांना चांगला लाभ झाल्यास त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास मदत होईल. शिवाय या निर्यातीतून सरकारला परकीय चलनही मिळेल. याकामासाठी राजकिय इच्छाशक्तीची गरज आहे. जिल्ह्यातील सर्वपक्षिय राजकारण्यांनी एकत्रित येवून शेतकर्‍यांना मार्गदर्शन करावे तसेच नवीन उद्योग सुरु करण्याठी पुढाकार घेत केळी व भरिताच्या वांग्याच्या ब्रँडिंगसाठी धोरणे निश्‍चित करावे, ही अपेक्षा आहे.

Post a Comment

Designed By Blogger