युती-आघाडीची भाषा अन् स्वबळाची चाचपणी


जळगाव जिल्हा परिषद निवडणूकीची आचारसंहिता येत्या आठवडाभरात लागण्याची शक्यता असल्याने राजकिय घडामोडींना वेग आला आहे. यंदा युतीची चर्चा सुरु असतांना भाजपाने ६७ पैकी ४० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करुन स्वळाचा नारा दिला आहे. दुसरीकडे शिवसेनेने पाच गटातील उमेदवार जाहिर करुन भाजपावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र कॉंग्रेस व राष्ट्रवादीने काही तालुक्यात आघाडी करण्याचे संकेत दिले आहे. तर मनसे यंदाही निवडणुकिपासून लांब राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्हा परिषदेत भाजपाचे २४, शिवसेना १४, राष्ट्रवादी २० व कॉंग्रेसचे १० असे पक्षिय बलाबल आहे. येथे गेल्या १५ वर्षांपासून भाजप-शिवसेना युती असली तरी प्रत्येक पंचवार्षिक त्यांनी स्वबळावर लढवली आहे. व सत्तास्थापनेसाठी हात मिळवणी केली आहे. मात्र यंदा भाजपात आ. एकनाथ खडसे व ना.गिरीष महाजन गटातील अंतर्गत कलह आणि शिवसेनेच्या वाढत्या महत्वकांक्षेमुळे संभाव्य हानी टाळण्यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सुरुवातीपासून युतीचा राग आवळला होता. मात्र जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी जि.प., पं.स. निवडणुकीत युती न झाल्यास भाजपा स्वबळावर निवडणुका लढविणार, असे सुचक वक्तव्य करत ४० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट कार्यकर्त्यांना दिले आहे. याच वेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख रवींद्र मिर्लेकर व सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेकडून पाच गटांचे उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात पिंपळगाव शिंदाड गटातून विद्यमान सदस्या कांताबाई मराठे यांचे पती उद्धव मराठे, नगरदेवळा बाळद गटातून विद्यमान कृषी सभापती मीना पाटील यांचे पती रावसाहेब पाटील, लोहटार खडकदेवळा गटातून विद्यमान सदस्य प्रकाश सोमवंशी यांच्या स्नुषा वृंदावली सोमवंशी, लोहारा कुर्‍हा गटातून रेखा राजपुत या चार जणांना उमेदवारी दिलेली आहे. तर रावेर तालुक्यातील निंभोरा तांदलवाडी गटातून भास्कर पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या कुरघोडीच्या राजकारणामुळे युतीशी शक्यता मावळली असल्याचे मानले जात आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी गतवैभव परत मिळवण्यासाठी झगडत आहेत व कॉंग्रेसची अस्तित्वासाठी धडपड सुरु असल्याने यंदा निवडणूक स्वतंत्र न लढता आघाडीत लढण्याचा नेत्यांचा प्रयत्न आहे. यावल, रावेर, चोपडा, जामनेर या तालुक्यात कॉंगे्रसची स्थिती बर्‍यापैकी असल्याने कॉंग्रेसच्या ताब्यातील विद्यमान गटात राष्ट्रवादीतर्फे उमेदवार न देण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्या बदल्यात राष्ट्रवादीचा दबदबा असलेल्या तालुक्यांमध्ये कॉंग्रेस राष्ट्रवादीला मदत करण्याची शक्यता आहे. तसे संकेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ.सतीष पाटील व कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.संदिप पाटील यांनी दिले आहेत. याबाबत पक्ष श्रेष्टींशी चर्चा करुन स्थानिक पातळीवर आघाडी करण्याचे अधिकार देण्यात येणार असल्याचे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे निवडणूक रंगण्याची चिन्हे आहेत.

Post a Comment

Designed By Blogger