१८४३ शाळा, २ लाख विद्यार्थी व ८ हजार शिक्षकांची दररोज व्हॉट्सऍपवर हजेरी


१८४३ शाळा, २ लाख विद्यार्थी व ८ हजार शिक्षकांची दररोज व्हॉट्सऍपवर हजेरी - आयएएस अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांचा देशातील पहिलाच यशस्वी प्रयोग

इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये डोनेशन भरुनही प्रवेश मिळत नाही तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळा विद्यार्थी मिळत नसल्याने बंद पडत आहेत. हा विरोधाभास दुर करण्यासाठी व ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थी गळती राखण्यासाठी जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय (भाप्रसे) यांनी शासनाचा एक रुपयाही खर्च न करता ‘हायटेक’ फंडा विकसित केला आहे. यात व्हॉट्सऍप वर दररोज १८४३ शाळांमधील सुमारे ८ हजार शिक्षक व २ लाख विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जात असून गुणवत्ता सुधारणेवर भर दिला जात आहे. याची सांगड शालेय पोषण आहारसोबत घालण्यात येणार असल्याने पोषण आहारातील भ्रष्ट्राचाराला आळा बसणार आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपुर्ण देशातील हा पहिला प्रयोग सर्वत्र चर्चेचा ठरला आहे.

आस्तिक कुमार पाण्डेय (भाप्रसे) यांनी दि. १४ जानेवारी २०१५ रोजी जिल्हा परिषद, जळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्विकारला. गेल्या दिड वर्षांच्या काळात त्यांनी पारंपारिक प्रशासकिय कामकाजाला ‘हायटेक’ तंत्रज्ञानाची जोड देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजीटल इंडियाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. गेल्या दिड वर्षात त्यांनी ग्रामीण जनेतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाला थेट ग्रामपातळीवर नेत ‘जिल्हा परिषद प्रशासन आपल्या दारी’ हे अभियान प्रभावीपणे राबविले. यासह, जि.प.शाळांसाठी पुस्तकभेट अभियान, लोकसहभागातून निधी उभारणी, कॅन्सर निदानासाठी रोटरीच्या मदतीने मोफत शस्त्रक्रिया शिबिर आदी उपक्रम राबवून गतिमान प्रशासनची प्रचिती दिली. मात्र लालफितीतील प्रशासनाला तंत्रज्ञानाची जोड देत त्यांनी राबविलेले ‘नाविन्यपुर्ण प्रयोग’ राज्यभर चर्चेत ठरले आहेत. यात प्रामुख्याने जि.प.प्राथमिक शाळांमध्ये ई-लर्निंग, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये टेलीमेडीसीनची सेवा, ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी झालेल्या कामांचे व्हिडीओ रेकॉर्डींग, व्हर्च्युअल क्लासरुम ंंया योजनांचा उल्लेख करावा लागेल. मात्र याहून वेगळा अभिनव प्रयोग म्हणजे ‘स्टॉर्म प्रणाली’! स्टॉर्म म्हणजे डूीींशा षेी ढशरलहशीी जपश्रळपश ठशिेीींळपस | चेपळींेीळपस ही प्रणाली व्हाट्सऍपवर आधारीत असून यात जिल्हा परिषदेच्या सुमारे ८ हजार शिक्षकांची दररोज व्हॉट्सऍपवर हजेरी घेतली जात आहे. सुरुवातीला व्हाट्सऍपवर लहान लहान गृ्रप तयार करुन दररोज हजेरी घेण्यास सुरुवात करण्यात आली. यात शिक्षक शाळेवर पोहचल्यानंतर मस्टरवर सही करतांनाचा फोटो व्हॉट्सऍप ग्रृपवर अपलोड करावा लागत होता. मुख्याध्यापक. केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी व नंतर मुख्य कार्यकारी अधिकारी असे टप्पे करुन शिक्षकांची हजेरी घेतली जात होती. याप्रणालीत शेकडो व्हॉट्सऍप ग्रृप तयार करावे लागले. यामुळे दांडीबहद्दर व लेटलतिफ शिक्षकांची माहिती एकत्रित करण्यास खुप वेळ जात होता. ही तांत्रिक अडचण लक्षात आल्यानंतर आस्तिककुमार पाण्डेय यांनी त्यांच्या परिचीत पुण्याच्या एका संस्थेतून एकही रुपया खर्च न करता अगदी मोफत स्टॉर्म प्रणाली विकसीत करुन घेत त्यास व्हॉट्सऍपची जोड दिली. आता या प्रणालीच्या माध्यमातून सुमारे ८ हजार शिक्षक दररोज ऑनलाईन हजेरी देत आहेत.

या नाविन्यपुर्ण प्रयोगामुळे दांडीबहाद्दर शिक्षकांना शाळेत वेळेवर पोहचावे लागत होते. यामुळे सहाजिकच या प्रणालीला शिक्षक संघटनांनी जोरदार विरोध करण्यास सुरुवात केली. याविरोधात आंदोलन, मोर्चा, निदर्शने आदींचे प्रयोग झाले. शिक्षकांकडे ऍन्ड्रॉइड मोबाईल नाही, इंटरनेटचा डेटा पॅक महाग आहे. असा युक्तीवाद करत शिक्षकांनी जोरदार विरोध केला. काहींनी थेट खंडपीठात जनहित याचिकाही दाखल केली. व्हॉट्सऍप हजेरीला एकीकडे विरोध होत असतांना दुसरीकडे या प्रयोगाचे समाजातून कौतुक सुरु झाले. याची दखल थेट राज्यपातळीवर घेण्यात आली. हा प्रयोग संपुर्ण राज्यात राबविता येईल का? याचा अभ्यास विभागिय आयुक्त कार्यालयाने सुरु केला आहे. संपुर्ण राज्यातीलच नव्हे तर देशातील हा पहिला प्रयोग असून यास एकही रुपया खर्च करण्यात आलेला नाही हे विशेष!

सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता तपासणी बाबत आढावा घेतल्यानंतर असे लक्षात आले की, शिक्षक व विद्यार्थी यांची उपस्थिती हा सर्वात महत्वाचा भाग आहे. याकरीता विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी अनेक नाविन्यपुर्ण प्रयोग राबविण्यात आले. त्याचा फायदा होत असल्याचे दिसून आल्याने शिक्षकांच्या उपस्थितकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले. यात शासनाच्या तिजोरीवर भर न पडता व विश्‍वासहार्यता असलेल्या पध्दतीचा शोध घेत असतांना व्हाट्सऍप हजेरीचा जन्म झाला. आता आपल्या प्रत्येकाच्या खिश्यात स्मार्टफोन असतो. याचा स्मार्ट वापर करुन हा प्रयोग राबविण्यास सुरुवात झाली.

या व्हॉट्सऍप प्रणालीत तालुकास्तरावर कार्यरत असलेल्या सर्व केंद्रप्रमुखांनी त्यांचेअतर्ंगत सर्व मुख्याध्यापकांचे व्हाट्सऍप क्रमांकाचा त्यांचा व्हाट्सऍप ग्रुप तयार केला. यानंतर सर्व विस्तार अधिकारी (शिक्षण) त्यांचे अंतर्गत असलेल्या सर्व केंद्रप्रमुखांचे व्हाट्सऍप क्रमांकाचा त्यांचा व्हाट्सऍप ग्रुप तयार करण्यात आला. यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे ९४२२२७५९७४ या क्रमांकाच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर सर्व विस्तार अधिकारी (शिक्षण), शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे व्हाट्सऍप ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात आले. सर्व ग्रुप संबंधित अधिकारी / कर्मचारी यांचेकरवी तालुकानिहाय तयार करून घेण्याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षणाधिकारी (प्राथ) यांच्यांवर सोपविण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या व्हाट्सऍप ग्रुपमध्ये सर्व गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक गट शिक्षणाधिकारी यांचा वैयक्तिक व्हाट्सऍप ग्रुपमध्ये केवळ त्यांचे तालुक्यातील विस्तार अधिकारी (शिक्षण) यांचा समावेश करण्यात आला. प्रत्येक शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या व्हाट्सऍप ग्रुपमध्ये केवळ त्यांचेशी संबंधित केंद्र प्रमुख यांचा समावेश करण्यात आला आहे.

प्रत्येक केंद्र प्रमुख यांच्या व्हाट्सऍप ग्रुपमध्ये केवळ त्यांचेशी संबंधित मुख्याध्यापक यांचा समावेश करण्यात आला. जि.प. शाळेतील मुख्याध्यापक यांनी शाळेमधील प्रत्येक शिक्षक हजेरीपटावर स्वाक्षरी करीत असतांनाचा शिक्षकाचा फोटो, त्यावेळचे लोकेशन (मॅप), त्यासोबत शिक्षकाचे नाव, शाळेचे नाव आणि तालुका इ. तपशिल व्हाट्सऍप वर त्वरीत संबंधित केंद्र प्रमुखास पाठविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

अशी चालते प्रणाली

शिक्षकांचे फोटो काढतांना ते त्याच दिवसाचे हजेरीपटावर स्वाक्षरी करीत असतांना फोटोमध्ये स्पष्ट दिसेल, याची मुख्याध्यापकांनी खात्री करुन सदरचा तपशिल तात्काळ केंद्रप्रमुखास पाठविण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आली आहे. संबंधित केंद्र प्रमुख त्यांचेअंतर्गत सर्व शाळांमधील मुख्याध्यापकांकडून वरीलप्रमाणे तात्काळ मेसेज प्राप्त झाल्यानंतर, याचा पाठपुरावा करतात. त्यानंतर प्रत्येक केंद्र प्रमुख त्यांना प्राप्त झालेल्या फोटोची वेळ पाहून विलंबाने आलेल्या आणि विनापरवानगी अनधिकृत गैरहजर असलेल्या शिक्षकांचे केवळ संंपुर्ण नाव, शाळेचे नाव आणि तालुका आदी तपशिल व्हाट्सऍप वर त्वरीत संबंधित विस्तार अधिकारी (शिक्षण) यांच्या ग्रुपमध्ये पाठवताता. सदर ग्रुपमध्ये फोटो पाठविण्यात येत नाही.

शाळेमध्ये उपस्थित राहण्याची जी विहीत वेळ असते त्यामध्ये १० मिनिटे ग्रेस टाईम धरून त्यावेळेनंतर आलेले शिक्षक उशिराने आलेले आहेत, याप्रमाणे कार्यवाही केली जाते. सदरचा ग्रेस टाईम हा संबंधित मुख्याध्यापक सदरचे फोटो केंद्रप्रमुख यांना पाठवितांना काही कालावधी लागणार आहे, याकरीता देण्यात आलेला आहे. त्यानंतर संबंधित विस्तार अधिकारी (शिक्षण) त्यांचेकडेस प्राप्त झालेल्या उशिराने आलेल्या शिक्षकांचा तपशिल (शिक्षकांचे नाव, शाळेचे नाव आणि तालुका) तसेच अनधिकृत गैरहजर शिक्षकांचा तपशिल (शिक्षकांचे फक्त नाव, शाळेचे नाव आणि तालुका) याची शहानिशा करून अशा शिक्षकांचा तपशिल त्यांचे तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी यांचे ग्रुपमध्ये सादर करण्यात येतो. सदर ग्रुपमध्ये फोटो पाठविण्यात येत नाहीत. सर्व गट शिक्षणाधिकारी त्यांचे ग्रुपमधील तालुक्याचा एकत्रित तपशिल (शिक्षकांचे फक्त नाव, शाळेचे नाव आणि तालुका) मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडील ९४२२२७५९७४ या भ्रमणध्वनी क्रमांकावरील व्हाट्सऍप ग्रुपवर पाठवतात. सदर ग्रुपमध्ये फोटो पाठविण्यात येत नाहीत.

गुगल ड्राईव्ह बॅकअप

केंद्र प्रमुख यांचेकडेस रोज प्राप्त झालेल्या सर्व फोटोचा बॅक-अप गुगल ड्राईव्ह वर अथवा पंचायतसमिती शिक्षण विभागातील संगणकावर अथवा इतर कोणत्याही सोयीस्कर अशा जि.प. शाळेतील संगणकावर तारीखनिहाय सेव्ह करून ठेवतात. सदर माहितीची मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) केव्हाही पडताळणी करतात. विस्तार अधिकारी (शिक्षण) सदर माहितीची वेळोवेळी खात्री करतात. सदर माहितीमध्ये आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे ग्रुपमध्ये प्राप्त झालेल्या माहितीमध्ये तफावत आढळून आल्यास चुकीची व दिशाभूल करणारी माहिती वरिष्ठ कार्यालयास सादर केली म्हणून संबंधितावर शिस्तभंगविषयक कारवाई प्रस्तावित करण्यात येते. या प्रणालीमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना शिस्त लागली असून दांडीबहाद्दरांना पुर्णपणे प्रतिबंध बसला आहे.

१८४३ शाळा, २ लाख विद्यार्थी व ८ हजार शिक्षकांची दररोज व्हॉट्सऍपवर हजेरी १८४३ शाळा, २ लाख विद्यार्थी व ८ हजार शिक्षकांची दररोज व्हॉट्सऍपवर हजेरी Reviewed by Yuvraj Pardeshi on 23:19 Rating: 5

No comments: