नरेेंद्र मोदी आणि तूरडाळ

दोन वर्षांपुर्वी भाजपाने ‘बहुत हुई देश मे महंगाई कि मार, अब कि बार मोदी सरकार’ चा नारा दिला. यामुळे महागाईचे चटके सहन करणार्‍यांनी कमळाला मत दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी महागाई कमी करतील, अशी संपुर्ण देशाला आशा होती मात्र सर्वसामान्यांच्या अपेक्षेपेक्षा उलट घडले... दोन वर्षांपुर्वी महागाईचे चटके सहन करणारे गरीब व मध्यमर्गीय आता महागाईच्या आगीत होरपळू लागले आहेत. गेल्या दीड-दोन वर्षांपूर्वीपर्यंत पाच रुपये पाव किलो दराने मिळणार्‍या पालेभाज्या आता १५ ते २० रुपये पाव किलो दराने मिळत आहेत. ५० ते ५५ रुपये प्रतिकिलो दराने मिळणारी तूरदाळने गेल्या काही दिवसांपुर्वी व्दिशतक पुर्ण केल्यानंतर आता कुठे १२० ते १६० रुपये प्रतिकिलो दराने मिळत आहेत. याच प्रमाणे अन्य वस्तुंचे दरही तिन ते चारपटीने वाढले आहेत. यामुळे सर्वसामान्यांसह मध्यमवर्गीयांचे जगणे कठिण झाले आहे. एकी कडे दिवसेंदिवस महागाई वाढत असतांना आपले अर्थमंत्री अरुण जेटली मात्र जीडीपीचा (देशांतर्गत एकूण उत्पादन) दर वाढत असल्याने आपण महागाईवर मात करून विकासाच्या दिशेने जात असल्याचा दावा करत आहेत. जेटलीसाहेब मोठे अर्थतज्ञ आहेत म्हणून कदाचित ते खरंही बोलत असतील मात्र सर्वसामान्यांना जीडीपी म्हणजे काय? हेच माहिती नसते! त्यांना फक्त आलेल्या पगारातून महिनाभराचा खर्च कसा भागवायचा असतो व कितीही काटकसर करुन महिन्याच्या शेवटी आर्थिक तंगी जाणवायला लागली म्हणजे महागाई वाढली आहे, असा त्याचा साधा आणि सरळ अर्थ कळतो. दैंनदिन गरजेच्या सर्वच वस्तुंचे दर तिन ते चार पटीने वाढले असतील तर पगारात कसे भागेल?

मध्यंतरी भारताचे जीडीपीचे दर फसवे असल्याचं अमेरिकेने म्हटलं होतं. आता गेल्या काही दिवसांपुर्वी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी महागाई कुठे कमी झालेय, ती दाखवा असं टीकाकारांना दिलेलं आव्हान बरंच काही सांगून गेलं आहे. यामुळे कोणं खर बोलतोय आणि कोण खोटं? याच्याशी सर्वसामान्यांना काही घेणं देणं नाही! देशात भाज्या आणि डाळींचे दर आकाशाला भिडले आहेत, तूरडाळ १६० रुपये किलो, तांदूळ ३० ते ४० रुपये किलो, हरभरा डाळही अशीच महागलेली, मूग डाळ पहिल्यापासून महाग, डाळ-रोटी खाऊन आम्ही जगतो, असं म्हणण्याची सोय आता गरिबांना उरलेली नाही. कारण डाळ खाणारे लोक श्रीमंत असतात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. डाळी व पालेभाज्यांचे दर वाढत असतांना शेतकर्‍यांना त्याचा एका पैशाचाही फायदा झाला नाही. सरकारने मोठ्या उद्योगपतींचे ५२ हजार कोटी रुपये माफ केले, पण कच्च्या तेलाच्या दरातील घसरणीमुळे झालेल्या लाख कोटी रुपयांच्या बचतीमधील कोणता फायदा सरकारने शेतकरी आणि गृहिणींना दिला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हाच धागा पकडून कॉंग्रेसचे ‘युवराज’ राहूल गांधी यांनी लोकसभेत आक्रमक भुमिका घेवून मोदी सरकारवर तुफान हल्ला चढविला. लोकसभेत महागाईवरील चर्चेत सहभागी होताना राहुल गांधी म्हणाले की, भाजपने निवडणुकीपूर्वी दिलेल्या ‘हरहर मोदी’ या घोषणेऐवजी आता ‘अरहर मोदी’ (म्हणजे तूरडाळ) अशी घोषणा देण्याची वेळ लोकांवर आली आहे, असा टोमणाही राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभेत मारला. डाळींचे दर २०० रुपयांवर गेले आहेत. ही महागाई कमी कधी होणार याची निश्चित तारीख सांगा, असे आवाहनही राहुल गांधी यांनी यावेळी केले. यावेळी अर्थमंत्री अरुण जेटली व राहूल गांधींमध्ये झालेली जुगलबंदी संपुर्ण देशाने टिव्हीवर पाहिलीच असेल.

जेटलींनी दिलेल्या माहितीनसार देशात डाळींची मागणी २३ दशलक्ष टन आहे, तर उत्पादन फक्त १७ दशलक्ष टन होते. मागणी व पुरवठ्यातील तफावतीमुळे डाळींचे दर भडकले आहेत. असे त्यांचे म्हणणे होते. मात्र गेल्या दोन वर्षातच मागणी व पुरवठा यात तफावत निर्माण झाली का? आधी डाळींचे दर स्थिर का होते? या प्रश्‍नांना त्यांनी सोईस्कर बगल दिली. भाजपा व कॉंग्रेसचे हे राजकिय भांडण असले तरी महागाईच्या आगीत सर्वसामान्य होरपळत आहे. त्याचे कोणालाही देणे घेणे दिसत नाही. कारण अधिवेशन संपल्यावर या विषयावर पुढचे दोन-तिन महिने कोणीच बोलणार नाही.(किमान पुढचे अधिवेशन सुरु होई पर्यंत) मध्यंतरी काही महाभागांनी टीव्हीच्या कॅमेर्‍यासमोर जाहीरपणे वायफळ बडबड केली होती. कुठं आहे महागाई? किरकोळ दर वाढले तर लोक ओरडू लागतात. आतापर्यंत इतर वस्तूंचे दर वाढले तर कोणी काही बोललं नाही. मग डाळीचे दर वाढल्यावर एवढा गहजब कशासाठी? असे निर्लज्जपणाचे प्रश्‍नही काहींनी उपस्थित केले होते. अशा मोदी भक्तांना एकच विनंती आहे कि, आम्हाला आमच्या बँकेच्या खात्यात १५ लाख रुपये नाही मिळाले तरी चालेल मात्र वाढत्या महागाईला आळा घालून सर्वसामान्यांना लवकर ‘अच्छे दिन’ आणा हीच अपेक्षा...


Post a Comment

Designed By Blogger