भारतीय पंतप्रधानांचे नव्हे जागतिक नेत्याचे भाषण

‘नमस्ते लंडन’ या हिंदी चित्रपटात दाखविण्यात आलेल्या एक सीनमध्ये एक ब्रिटीश नागरिक नायिका कॅटरिना कैफ हिच्याशी संवाद साधतांना भारताची साप पकडणारे व बिन वाजवणार्‍या लोेकांचा देश अशी ओळख सांगत अवमान करतो. यावेळी चित्रपटाचा नायक अक्षयकुमार त्या ब्रिटीशाला सडेतोड उत्तर देतो. मात्र उत्तर देतांना आक्रमकपणा न दाखवता किंवा शिव्या न देता, भारत हा अन्य देशांच्या तुलनेत किती महान व शक्तीशाली आहे. याची तुलना करत गे्रट ब्रिटनला त्यांची जागा दाखवून देता... हा सीन पाहिल्यानंतर प्रत्येक भारतीयाची छाती फुगल्याशिवाय राहत नाही. या ‘रील’ लाईफ सीनचा अनुभव ‘रियल’ लाईफमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेच्या संसदेतील भाषण ऐकतांना आला!

अमेरिकेच्या संसदेत संयुक्त बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण झाले. तेथे भाषण करणारे नरेंद्र मोदी भारताचे सहावे पंतप्रधान ठरले. यापूर्वी पंडीत नेहरु, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहनसिंग या पंतप्रधानांना हा सन्मान मिळाला आहे. मात्र सर्वार्थाने मोदी यांचे भाषण वेगळे ठरले. नरेंद्र मोदी यांचे भारतिय वेळेनुसार रात्री ८ वाजून ४५ मिनीटांनी अमेरिकन कॉंंग्रेसमध्ये आगमन झाले. यावेळी सर्व स्पीकर पॉल रायन यांच्यासह सर्व सिनेटर्सनी उभे राहत तब्बल ३ मिनीट ३६ सेकंद टाळ्या वाजवून भारतीय पंतप्रधानांचे स्वागत केले. मोदी त्यांचे भाषण हिंदीतून करतील किंवा इंग्रजीतील लिखीत भाषण वाचून दाखवतील असा अंदाज वर्तविण्यात येत असतांना त्यांनी इंग्रजी भाषेत उत्स्फुर्त भाषण करत सर्वांना धक्का दिला. त्यांच्या भाषणाची जादू अशी ंहोती की, ४६ मिनिटांच्या भाषणात तब्बल ७२ वेळा टाळ्या वाजल्या व ९ वेळा उभे स्टँडींग ऍव्हिएशन मिळाले. हे पाहिल्यानंतर प्रत्येक भारतियाची छाती ५६ इंचापेक्षा जास्त फुगल्याशिवाय राहिली नसेल!

आपल्या अभ्यासपुर्ण भाषणात त्यांनी मार्टिन ल्युथर किंग यांनी महात्मा गांधींच्या अहिंसेच्या शिकवणीपासून प्रेरणा घेतली होती. असा दाखला देत एकी कडे अमेरिकेच्या भावनेला हात घातला मात्र भारतच अमेरिकेचा गुरु आहे, असे अप्रत्यक्षपणे दाखवून दिले. यावेळी त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या शिकागोमधील भाषणाचा उल्लेख केला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही उल्लेख केला. पाकिस्तानचे नाव न घेता लष्कर-ए-तोएबा, इसिस, अलकायदा यांचा उल्लेख करुन पाकिस्तानचा बुरखा फाडला. दहशतवादाला धर्म नसतो किंवा चांगला वा वाईट असा दहशतवादही नसतो, असेही ठासून सांगत एकाप्रकारे अमेरिकेलाही चिमटा घेतला. कारण गुड आणि बॅड टेररिझम अशी सोईस्कर भुमिका अमेरिकेने घेतली होती. याचवेळी मोदी यांनी भारताची प्रगती यासह अनेक मुद्यांना स्पर्श केला. भारत आणि अमेरिका संपुर्ण जगाला काय देवू शकतात यावर ते बोलले. याच वेळी भारतीय शास्त्रज्ञ, डॉक्टर्स, इंजिनियर्स यांच्यापासून बी-स्पेलींग स्पर्धेतील भारतियांचे वर्चस्व त्यांनी अधोरेखीत केले.

२१ जून हा दिवस संपूर्ण जगभर आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. याचा उल्लेख करत भारतीय योगाचा अमेरिकेवर मोठा प्रभाव असून तीन कोटी अमेरिकन नागरिकांना त्याचा फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले. भारताच्या या प्राचीन आरोग्यविषयक ठेव्यावर भारताने कधीही बौद्धीक संपदेचा दावा केलेला नाही, असे गंमतीने सांगत त्यांनी एका प्रकारे हळदीच्या पेटंटप्रकरणी अमेरिकेला चिमटाही काढला. मोदी यांचे भाषण केवळ भारताचे पंतप्रधान म्हणून नव्हे त ‘जागतिक नेता’ या स्वरुपाचे होते. भाषणानंतर अमेरिकन सिनेटर्स (खासदार) मोदी यांचा ऑटोग्राफ घेण्यासाठी धडपडत असल्याचे पाहून भारतिय असल्याचा गर्व वाटला.


1 comment :

  1. आपल्या बातमीने बातमी डोक्यातून हृदयापर्यत भिडली !

    ReplyDelete

Designed By Blogger